esakal | वुमन हेल्थ -  तंदुरुस्त - मन दुरुस्त! 
sakal

बोलून बातमी शोधा

woman-health

शरीर आतून व्याधींने पोखरलेले असल्यावर कोरोनासारख्या संसर्गाला आक्रमण करायला निमंत्रणच मिळते. म्हणजेच काय, तर आरोग्य ही निरंतर अवस्था आहे. आरोग्य रक्षण करणे म्हणजे तातडीचे उपाय करणे नव्हे.

वुमन हेल्थ -  तंदुरुस्त - मन दुरुस्त! 

sakal_logo
By
डॉ. ममता दिघे

आपल्याला साधारणपणे काही त्रास होत नसल्यास आपण आपल्या आरोग्याचा अजिबात विचार करत नाही. बारीकसे काहीतरी दुखले खुपले, तरी आधी दुर्लक्षच करतो. महिलांच्या बाबतीत तर असे ‘अंगावर काढणे’ अगदी सगळीकडे दिसून येते. घराची, घरातल्या सगळ्यांची काळजी घेताना महिला विसरूनच जातात की, ज्यामुळे त्या इतके काम करू शकतात त्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे! आरोग्य चांगले असणे म्हणजे केवळ शरीरात काही आजार नसणे एवढंच नाही, तर holistic healing म्हणजेच सर्वांगीण सुखरूप अवस्था म्हणजे आरोग्य! शरीरात व्याधी नसणे, मन शांत आणि प्रसन्न असणे, हेवे-दावे-असमाधान नसणे, सामाजिक भान असणे, निसर्गाची जपणूक करणे, या सर्व चांगल्या ऊर्जेचे एकत्रित फळ म्हणजे चांगले आरोग्य! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आताच्या कोरोनाच्या प्रकोपामुळे ही गोष्ट जास्तच स्पष्ट झाली आहे. महिलाच नव्हे, तर एकुणच सगळेच तब्येतीच्या बाबतीत काळजीत आहेत. 

पारंपारिक विचारानुसार ज्यामुळे आजार बरा होतो ते औषध! औषध घ्यायचे आणि बरे व्हायचे अशीच विचारसरणी असते. या उलट डब्ल्यूएचओने आरोग्याच्या केलेल्या व्याख्येनुसार, ‘आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य; केवळ आजाराचा अभाव नव्हे!’ इतर सर्व संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण केवळ शारीरिक व्याधीवर लक्ष केंद्रित करायला कधी शिकलो देव जाणे. सर्व बाबींचा नेमका संगम म्हणजे आरोग्य! कोरोनाचे उदाहरण घेतल्यास हा संसर्ग कोणालाही होऊ शकतो, पण अधिक धोका कोणाला आहे? ज्यांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार आहे अशांना जास्त धोका आहे. हे आजार; ताण, चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली यामुळे मागे लागतात. शरीर आतून व्याधींने पोखरलेले असल्यावर कोरोनासारख्या संसर्गाला आक्रमण करायला निमंत्रणच मिळते. म्हणजेच काय, तर आरोग्य ही निरंतर अवस्था आहे. आरोग्य रक्षण करणे म्हणजे तातडीचे उपाय करणे नव्हे. आग लागल्यावर विहीर खणून काय उपयोग? आरोग्य सदैव चांगले राहावे म्हणून आपण काय खातो, किती आणि कसा व्यायाम करतो, आपले नाते-संबंध कसे आहेत, आपण कसा विचार करतो, आपण ताण घेतो का या सर्वाचा एकत्रितपणे विचार करून लक्ष देणे गरजेचे आहे. आजार एका अवयवात दिसला, तरी त्याचा उगम दुसरीकडे असू शकतो. म्हणूनच व्याधीवर उपचार करण्यासाठी सर्व बाजूंचा आणि सर्व घटकांचा एकत्रित विचार करणे गरजेचे असते. सर्वसमावेशक विचार करून जर आरोग्याचे रक्षण केले तर कोणतेही नवनवीन रोग आले तरी तुमचे शरीर तुमचे कवच बनून रक्षण करेल आणि व्याधी झालीच तर त्यातून लवकर बरे व्हायला मदत करेल. 

महिलांनीच नव्हे, तर सगळ्यांनीच आपल्या आरोग्याकडे डोळसपणे बघून शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक अशा सर्वांगीण तंदुरुस्तीकडे लक्ष देण्याची वेळ आज आली आहे!