Video : वुमन हेल्थ : कोरोना व्हायरस आणि गर्भधारण

डॉ. ममता दिघे
Saturday, 4 April 2020

1) घरीच राहा. 
2) भेटायला येणाऱ्यांवर निर्बंध घाला सतत हात धुवा. नीट पद्धतीने आणि २० सेकंद हात धुतले गेले पाहिजेत.
3) खोकताना-शिंकताना तोंड, नाक झाकून घ्या. कोणाशीही बोलताना एक मीटर अंतर नक्की राखा.
4) कोरोनाच्या संसर्गाचे संकट जागतिक स्तरावरचे आहे, पण योग्य ती सर्व काळजी घेऊन गर्भवती महिला या संसर्गापासून स्वतःचा बचाव करू शकतात. काळजी करू नका पण सावध रहा! 

नव्याने समोर आलेल्या कोरोनाचा संसर्ग होण्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे. गर्भवती स्त्रियांना जास्त धोका आहे का? गर्भवती महिलांना COVID-१९ चा अधिक धोका आहे, असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही आणि अशा स्त्रियांना संसर्ग झालाच, तर त्यांनाही इतरांप्रमाणे सर्दी-खोकला एवढाच त्रास होतो. आत्तापर्यंतच्या पाहणीत केवळ गर्भवती असल्याने COVID-१९ च्या संसर्गाची केस न्यूमोनियापर्यंत पोचल्याचा पुरावा नाही. मात्र ज्या गर्भवती स्त्रियांना मधुमेह, स्थूलता, श्‍वसन-विकार, वाढलेले वय किंवा अजून काही गुंतागुंत आहे, त्यांना या व्हायरसचा संसर्ग झाला तर त्याचे न्यूमोनियात रूपांतर होऊन धोकादायक होण्याची शक्यता असू शकते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय लक्षात ठेवावे?
कोरोना संसर्ग होण्याची भीती असलेल्या या काळात, गर्भवती स्त्रियांनी नेहमीच्या नियमित तपासणीसाठीही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. काही शंका असतील तर फोन, ऑनलाइन माध्यमे यांचा जास्तीत जास्त वापर करावा. ज्या महत्त्वाच्या टप्प्यांवरील अल्ट्रासाउंड वगैरे टेस्ट असतील, फक्त तेवढ्या करून घेण्यापुरतेच बाहेर पडावे. गर्भवती स्त्रियांना खोकला, ताप वगैरे कोरोना संसर्गाची लक्षणे जाणवत असतील, त्यांनी नुकताच परदेश प्रवास केला असेल किंवा प्रवास केलेल्या कोणा व्यक्तीशी त्यांचा संपर्क आला असल्यास त्यांनी लगेच परीक्षण करून घेऊन डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

संसर्ग झालाच तर?
गर्भवती स्त्रीला संसर्ग झालाच, तर तिला आयसोलेट करून विशेष काळजी घेतली जाते. हाय-रिस्क डिलिव्हरीला जी काळजी घेतात ती सर्व अशा स्त्रीसाठी रुग्णालयात घेतली जाते. त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकतात आणि बाळंतपण सुखरूप होते.

बाळाला धोका किती?
कोरोना-बाधित गर्भवती स्त्रीच्या गर्भाला नाळेतून किंवा योनीमार्गातील स्रावातून संसर्ग होतो याचा आत्तापर्यंतच्या संशोधनात कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच कोरोना संसर्ग झालेल्या स्त्रीच्या गर्भात काही विकृती किंवा वाढ थांबणे, असेही झाल्याचा पुरावा नाही. या संसर्गामुळे गर्भपात होण्याची किंवा वेळेआधी प्रसूती होण्याचाही पुरावा नाही. इतर काही गुंतागुंत असेल आणि वेळेआधी प्रसूती झालीच आणि वेळीच काळजी घेतल्याने ती योग्य प्रकारे केली जाते.

स्तनपानातून संसर्ग होतो का?
स्तनपान देणाऱ्या मातांच्या दुधातूनही हा संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी अतिशय आवश्यक असल्याने संसर्ग झालेल्या मातेने डॉक्टरचा सल्ला घेऊन स्तनपान देत राहण्याचा निर्णय घेतला, तर बाळाला हात लावताना हात स्वच्छ धुवावे. स्वच्छ हाताने वा पंपाने दूध काढून ते निरोगी व्यक्तीला बाळाला देण्यास सांगावे. 

आहार काय असावा?
गर्भवती स्त्रीने एकुणच निरोगी राहण्यासाठी व संसर्गाला प्रतिकार करण्यासाठी हाय-प्रोटीन आणि सायट्रस फळे जास्त असलेला आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चिंता करण्यापेक्षा योग्य प्रकारे काळजी घेणे जास्त शहाणपणाचे असल्याने पुढील गोष्टी नक्की करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr mamta dighe article on Corona virus and pregnancy