

कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे काय, ती केव्हा करावी लागते, तिच्यासाठी तयारी काय करायची आदी गोष्टी आपण गेल्या आठवड्यातील लेखात बघितल्या. आता इतर गोष्टींवर नजर टाकू...
कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे काय, ती केव्हा करावी लागते, तिच्यासाठी तयारी काय करायची आदी गोष्टी आपण गेल्या आठवड्यातील लेखात बघितल्या. आता इतर गोष्टींवर नजर टाकू...
अँजिओग्राफी कशी केली जाते?
आपल्याला अँजिओग्राफी तपासणीआधी काही औषधे दिली जाऊ शकतात. नंतर आपल्याला कॅथलॅब म्हणजेच हृदय प्रयोगशाळेत नेले जाते. येथे आपल्याला एका टेबलवर झोपविले जाते. या टेबलच्या भोवताली एक C आकाराचा कॅमेरा असतो. या C मधून क्ष किरण येतात आणि कॅमेरा त्याचे चित्रीकरण करतो. अँजिओग्राफी हा एका प्रकारचा चलत एक्स-रे फोटोग्राफ आहे. या कॅमेऱ्याद्वारे आपले हृदयाचे चित्रीकरण केले जाते. डॉक्टर आपल्या मांडीवर किंवा हातावर मनगटाजवळ एक जागा भूल देऊन बधीर करतात आणि धमनीमध्ये हृदयापर्यंत एक पातळ ट्यूब (कॅथेटर) घालतात. यानंतर ‘डाय’ नावाच्या एका विशेष द्रवाचे इंजेक्शन कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये दिले जाते. या डायमुळे एक्स-रेवर रक्तवाहिन्या चांगल्या दिसतात. आपल्याला आपला श्वास रोखून ठेवण्यास किंवा खोकला करण्यास सांगितले जाऊ शकते. ही प्रक्रिया चालू असताना आपण जागे असता व ती पाहू शकता. फार क्वचितच, इमर्जन्सीमध्ये पूर्ण भूल दिली जाते. आपण चाचणी दरम्यान किंवा नंतर स्क्रीनवरील एक्स-रे चित्रे पाहू शकता.
अँजिओग्राफी करताना मला काय वाटेल?
कोरोनरी अँजिओग्राम ही वेदनादायक प्रक्रिया नसते, परंतु काहीवेळा आपल्याला छातीत थोडीशी वेदना होऊ शकते किंवा गरम वाटू शकते. कॅथेटर घातल्यामुळे थोडासा दबाव येऊ शकतो. क्वचितच, डाय आत जाताना छातीत थोडीशी अस्वस्थता येते. लघवी करण्याची इच्छा होऊ शकते. कोणत्याही वेदना झाल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास कृपया डॉक्टरांना ताबडतोब कळवा.
अँजिओग्राफीनंतर काय होते?
कॅथेटर बाहेर काढला जाईल. एक नर्स किंवा डॉक्टर संबंधित भाग १५ मिनिटांसाठी दाबून ठेवतील व रक्तस्राव थांबवला जाईल. कॅथेटर घातला गेला, तेथे जास्त अंतर्गत रक्तस्राव होत नाही याची खात्री केली जाईल. आपली तपासणी पायांच्या मार्गे केली असेल, तर पाठीवर साधारणपणे सहा तास पाय न हलविता झोपण्यास सांगितले जाईल. हातांच्या मार्गे अँजिओग्राफी केली असेल, तर झोपून राहण्याची आवश्यकता नसते. आपल्याला हॉस्पिटलच्या खोलीत किंवा सीसीयूमध्ये परत पाठवले जाईल. पुढील कुठल्याही प्रक्रियेची आवश्यकता नसेल, तर आपल्याला डिस्चार्ज दिला जातो. यानंतर आपले डॉक्टर आपल्याशी निष्कर्षांबद्दल बोलतील. दुसऱ्या दिवशीपासून आपण आपले नियमित काम चालू करू शकता. ट्यूब (कॅथेटर) जिथून घातली आहे, तिथे काही जखम होऊ शकते, किंवा नंतर वेदना होऊ शकते. पेरासिटामॉलसारखे पेनकिलर हे कमी करण्यास मदत करतील. डिस्चार्जनंतर अँटिबायोटिकही दिले जाऊ शकते.
धोके किंवा साइड इफेक्ट्स
बहुतेक साइड इफेक्ट्स किरकोळ असतात. ज्या जागेतून कॅथेटर नळी घातली जाते, तिथे थोडे काळे निळे अथवा रक्तस्राव होऊन रक्ताची गाठ होऊ शकते. डायला कधीकधी ऍलर्जी येऊ शकते. अँजिओग्राफीनंतर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात; पण ते दुर्मीळ आहेत. प्रक्रियेदरम्यान काही लोकांना स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फ्रक्शन) होऊ शकतो. तसेच, क्वचितच, कॅथेटर हृदयाची (कोरोनरी) धमनी खराब करू शकतो. ज्या लोकांना तीव्र प्रमाणात हृदयरोग आहे, अशांना दुष्परिणाम होण्याचा जास्त धोका असतो. परंतु विचार केल्यास, अँजिओग्राफीमुळे होणारे फायदे तोट्यांपेक्षा जास्त आहेत. तथापि अँजिओग्राफीचा निर्णय हे आपले डॉक्टर सर्व गोष्टींचा विचार करून घेतात. तथापि, काही समस्या असल्यास आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
अँजिओग्राफीनंतर काय निष्कर्ष निघतात?
अँजिओग्राम आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये काय दोष आहे ते दर्शवते. किती कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये कुठे ब्लॉकेजेस आहेत, ते दिसते. त्याचे प्रमाण म्हणजे पर्सेंटेज कळते. हे प्रमाण विविध बाजूंनी पाहिल्यास वेगवेगळे दिसू शकते. त्यावरही सरासरी धरून निष्कर्ष केले जातात. यामध्ये पर्सेंटेजबरोबरच रुग्णाची अवस्था, हार्ट ॲटॅक आला आहे का नाही, तेसुद्धा महत्त्वाचे असते. साधारणपणे तीन प्रकारचे निष्कर्ष असू शकतात :
1) ६० ते ७० टक्क्यांपेक्षा कमी ब्लॉक असल्यास साधारणपणे पुढे काही करावयाची गरज नसते. योग्य औषधोपचार आणि जीवनशैली बदलल्यास हृदयरोग नियंत्रणामध्ये येतो.
2) ७० टक्क्यांपेक्षा जास्त ब्लॉकेजेस असल्यास अँजिओप्लास्टी किंवा बायपास शस्त्रक्रिया करावी लागू शकते. साधारणपणे तीनपर्यंत ब्लॉक्स असल्यास स्टेंट अँजिओप्लास्टीचा उपयोग होऊ शकतो.
3) खूप जास्त प्रमाणात आणि बरेच ब्लॉक्स असल्यास बायपास शस्त्रक्रिया करावी लागू शकते. कधी कधी हृदयाच्या प्रमुख (लेफ्ट मेन) रक्तवाहिनीमध्ये दोष असेल, तर त्वरेने बायपास करावी लागू शकते.
नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त ब्लॉक असेल, तर त्याच वेळेस अँजिओप्लास्टी करावी लागू शकते. अन्यथा आपण विचार करून निर्णय घेऊ शकतो.
अँजिओग्राफीमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे, डॉक्टर कुठल्या प्रकारची उपचारपद्धती योग्य आणि सुरक्षित आहे ते वस्तुनिष्ठरित्या ठरवू शकतात. गरज भासल्यास आपण अँजिओग्राफीचे रिपोर्ट आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून सेकंड ओपिनियन घेऊ शकता. आजकाल मेल आणि व्हाट्सॲपच्या माध्यमातून सेकंड ओपिनियन घेणे सोपे झाले आहे. फक्त त्यामध्ये जास्त वेळ ना दवडता पुढचा निर्णय घ्यावा. कधी कधी इमर्जन्सीमध्ये मिनीटसुद्धा महत्त्वाचे असते.
अँजिओग्राफी झाली, की प्रत्येक वेळेला अँजिओप्लास्टीच लगेच करावी लागते हा गैरसमज आहे. बऱ्याच वेळेला एकत्र अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करणे हे सोयीचा भाग असतो; गरज नाही. त्यामुळे रुग्णाची अवस्था, निकड, धोका आणि गरज भासल्यास सेकंड ओपिनियन याचा विचार करून पुढील निर्णय आपल्या डॉक्टरांना द्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.