आरोग्यमंत्र : अँजिओप्लास्टी आणि आपण

कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे नक्की काय, अँजिओप्लास्टी का केली जाते, तिची तयारी कशी केली जाते आदी गोष्टी आपण गेल्या आठवड्यात बघितल्या.
Angioplasty
Angioplastysakal
Summary

कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे नक्की काय, अँजिओप्लास्टी का केली जाते, तिची तयारी कशी केली जाते आदी गोष्टी आपण गेल्या आठवड्यात बघितल्या.

कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे नक्की काय, अँजिओप्लास्टी का केली जाते, तिची तयारी कशी केली जाते आदी गोष्टी आपण गेल्या आठवड्यात बघितल्या. आता अँजिओप्लास्टीशी संबंधित इतर मुद्द्यांचा विचार करू.

अँजिओप्लास्टीमध्ये रुग्णाला नेमके काय होते आणि काय जाणवते?

या प्रक्रियेमध्ये कोठेही जास्त चिरफाड केली जात नाही, बहुतांशी वेळा एकही टाका दिला जात नाही. पाय, हात किंवा मनगटातील रक्तवाहिन्यावरील त्वचेत अगदी लहान छेद करून एक लहान, पातळ ट्यूब (कॅथेटर) थ्रेड केली जाते आणि ही प्रक्रिया केली जाते. प्रक्रियेतील अडचणी, ब्लॉकेजेसची संख्या आणि काही गुंतागुंत निर्माण झाली आहे की नाही यावर अवलंबून अँजिओप्लास्टीला ४५ मिनिटे ते काही तास लागू शकतात. हृदयरोगविशेषज्ञ (कार्डियोलॉजिस्ट) आणि विशेष हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी परिचारिका आणि तंत्रज्ञांच्या टीमद्वारे कार्डिओक कॅथेटरिझेशन प्रयोगशाळेच्या विशेष ऑपरेटिंग रूममध्ये अँजिओप्लास्टी केली जाते. या खोलीला ‘कॅथ लॅब’ असे म्हटले जाते.

अँजियोप्लास्टी सामान्यत: आपल्या मांडीच्या भागातील अथवा मनगटाजवळील धमनीद्वारे केली जाते. प्रक्रियेपूर्वी, क्षेत्र अँटीसेप्टिक द्रावणासह निर्जंतुक केले जाते आणि आपल्या शरीरावर निर्जंतुक आवरण घातले जाते. कॅथेटर घातला जाईल, त्या भागास लोकल ॲनेस्थेटिक इंजेक्शनद्वारे लोकल भूल दिली जाते. फार कमी वेळेस, पूर्ण भूल किंवा जनरल ॲनेस्थेशिया दिला जातो. आपण प्रक्रियेदरम्यान जागे असाल व आपल्याला प्रक्रिया बघता येते. आपल्या डॉक्टरांनी काही सूचना दिल्यास त्याचे आपल्याला पालन करावे लागते. आपल्या आयव्ही इंट्राकॅथद्वारे औषधे आणि फ्लूइड्स दिली जातील. यानंतर, प्रक्रिया सुरू होते.

मांडीजवळील जागा बधिर केल्यानंतर, आपल्या पाय किंवा हाताच्या धमनीमध्ये प्रवेश करण्यासाठी एक लहान सुई वापरली जाते. त्वचेमध्ये एक लहान कट केला जातो. नंतर त्याठिकाणी एक ‘शीथ’ नामक नळी घातली जाते, तिच्यातून कॅथेटर घालून तो कोरोनरी रक्तवाहिनीमध्ये नेला जातो. कॅथेटर ज्या ठिकाणी घातला आहे, त्या ठिकाणी कदाचित आपल्यास दबाव जाणवेल, परंतु आपल्याला तीक्ष्ण वेदना जाणवत नाहीत. आपल्याला आपल्या शरीरातील कॅथेटरचीदेखील हालचाल जाणवत नाही. कॅथेटरद्वारे एक विशिष्ट डायचे इंजेक्शन दिले जाते. हे आपल्या डॉक्टरांना एक्स-रे प्रतिमांवरील अडथळा पाहण्यास मदत करते.

कॅथेटरमधून एक छोटी वायर कोरोनरी रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेसच्या पलीकडे नेऊन ओवली जाते. गया वायरवरून एक सूक्ष्म फुगा (बलून) ओवला जातो आणि तो ब्लॉकच्या मध्यभागी नेऊन फुगविला जातो. या दबावामुळे, ब्लॉक दाबला जाऊन कमी होतो. आपले डॉक्टर कदाचित बलून काढण्यापूर्वी बऱ्याच वेळा फुगवू शकतो आणि प्रत्येक वेळी धमनीला आणखी थोडा ताणतो.

आपल्याला अनेक ब्लॉकेजेस असल्यास, प्रत्येक अडथळ्यावर ही प्रक्रिया पुन्हा केली जाऊ शकते. बलून आपल्या हृदयाच्या भागावर रक्ताचा प्रवाह तात्पुरता थांबवतो. अशा वेळेस छातीत दुखण्याचा संभव असतो, ते दुखणे बलून काढल्यावर कमी होऊ शकते.

अँजिओप्लास्टीमध्ये काही धोके असतात का?

  • साधारणतः अँजिओप्लास्टीमध्ये बायपास सर्जरीपेक्षा कमी धोके असतात. तरीदेखील ही प्रक्रिया पूर्णपणे धोकाविरहित नाही.

  • रीस्टेनोसिस (हृदयामध्ये त्याच जागेवर परत ब्लॉकेज निर्माण होणे) : स्टेंटशिवाय रीस्टेनोसिस सुमारे तीस टक्के प्रकरणांमध्ये होते. रीस्टेनोसिस कमी करण्यासाठी स्टेन्ट्स विकसित केले गेले. बेअर-मेटल स्टेंट्समुळे रीस्टेनोसिसची शक्यता सुमारे पंधरा टक्क्यांपर्यंत कमी होते आणि ड्रग-इल्यूटिंग स्टेंटचे रीस्टेनोसिस हे साधारणपणे दहा टक्के असते. जर एकाधिक प्रमाणात स्टेंट्स असतील, तर हे प्रमाण वाढते.

  • स्टेंट थ्रोम्बोसिस (स्टेंटमध्ये रक्ताची परत गुठळी होणे) : अँजिओप्लास्टी प्रक्रियेनंतरही स्टेंटमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. या गुठळ्या कोरोनरी रक्तवाहिनी बंद करू शकतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. स्टेंट थ्रोम्बोसिस हे पहिल्या २४ तासांत आणि पहिल्या महिन्यात होण्याची शक्यता जास्त असते. ॲस्पिरिन, क्लोपीडोग्रेल, प्रासुग्रेल किंवा टीकाग्रेलोर या प्रकारची रक्त पातळ करण्याची औषधे ही अत्यंत जागरूकपणे न चुकता घेणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही क्षुल्लक कारणास्तव अथवा काही ऑपेरेशनसाठीदेखील पहिल्या सहा महिन्यांमध्ये ही औषधे थांबवू नयेत. दाताच्या प्रक्रिया अथवा नियोजित सर्जरीच्या वेळेस आपल्या कार्डिओलॉजिस्टला विचारूनच या गोळ्या थांबविण्याचा लिखित सल्ला घ्यावा. या गोळ्या थांबवल्यास स्टेंट थ्रोम्बोसिस होऊन परत हृदयविकाराचा झटका येण्याचा संभव असतो. या गोळ्या खूप दिवस आणि काही रुग्णांमध्ये कायमस्वरूपीसुद्धा घेण्याची गरज भासू शकते. याबद्दल आपल्या कार्डिओलॉजितशी चर्चा करावी.

इतर काही धोके; तसेच अँजिओप्लास्टीनंतर काय करावे आदी गोष्टींनंतर माहिती घेऊ पुढच्या आठवड्यात.

(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com