
आरोग्यमंत्र : कोलेस्टेरॉल आणि आपण
गेल्या दोन किंवा तीन वर्षांपासून आपल्याला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसत आहे. ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयरोग होत नाही’ अशा काही चुकीच्या पद्धतीची माहिती सोशल मीडियाद्वारे पसरत आहे-ज्यामुळे सर्वसामान्य माणसांची दिशाभूल होत आहे. आपण यात काही शास्त्रीय तथ्य आहे का ते पाहू. आम्ही डॉक्टर मंडळी ‘एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन’ म्हणजेच शास्त्रीय पुराव्याआधाराचे मेडिसिन पालन करतो. यामध्ये वैद्यकीय पाठ्यपुस्तके, शास्त्रीयरित्या केलेल्या ट्रायल्स, आंतराष्ट्रीय शोधनिबंधांची जर्नल्स व आंतरराष्ट्रीय हृदयविषयक संस्थांच्या नियमावली (गाईडलाईन्स) समाविष्ट असतात. हे डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षण चालू ठेवण्याचे स्रोत आहेत, अनियंत्रित सोशल मीडिया नाही. कोणत्याही डॉकटरांचा सल्ला हा वरील गोष्टींवर आधारित असतो, सोशल मीडिया अथवा इंटरनेट नाही.
तर, या विवादामध्ये पडण्याआधी आपण काही कोलेस्टेरॉलविषयक मूलभूत गोष्टींचा अभ्यास करूयात.
कोलेस्टेरॉल म्हणजे काय? ते काय करते?
कोलेस्टेरॉल म्हणजे रक्तातील चरबीचे प्रमाण. कोलेस्टेरॉल हे प्राथमिकरीत्या वाईट अथवा धोकादायक नाही. योग्य प्रमाणात ते शरीरातील विविध प्रक्रियांसाठी आवश्यक आहे. उदाहरणार्थ, स्मरणशक्ती, पेशींची वाढ इत्यादींसाठी कोलेस्टेरॉलची शरीराला गरज असते. परंतु, जास्त प्रमाणात शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचा संचय झाल्यास ते हृदयासाठी हानिकारक असते.
कोलेस्टेरॉल दोन स्रोतांमधून येते. आपले यकृत आपल्याला आवश्यक असलेले कोलेस्टेरॉल बनवते. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल उर्वरित प्राणिजन्य पदार्थांमधून येते. उदाहरणार्थ, मांस, पोल्ट्री आणि फुल-फॅट डेअरी उत्पादनांमध्ये कोलेस्टेरॉल असते, ज्याला आहारातील कोलेस्टेरॉल म्हणतात.
या कोलेस्टेरॉलचे काही उपप्रकार आहेत ते आपण समजून घेऊयात.
एलडीएल कोलेस्टेरॉल - यालाच वाईट अथवा धोकादायक कोलेस्टेरॉल म्हणतात. हे कोलेस्टेरॉल लिव्हरमधून फॅट्सना कोरोनरी आर्टरीच्या भिंतीमध्ये नेऊन अथेरोस्क्लेरॉसीस निर्माण करतात. जास्त प्रमाणात एलडीएल कोलेस्टेरॉल हे अथेरोस्क्लेरॉसीसला ठिसूळ बनवते (व्हल्नरेबल प्लाक) आणि रक्ताची गुठळी होऊन हार्ट ॲटॅकची शक्यता कित्येक पटींनी वाढविते. थोडक्यात जेवढी जास्त एलडीएल कोलेस्टेरॉलची मात्रा तेवढा जास्त हृदयविकाराचा धोका असतो
एचडीएल कोलेस्टेरॉल - हे चांगले अथवा उपयुक्त कोलेस्टेरॉल आहे. याचे काम म्हणजे कोलेस्टेरॉल अथेरोस्क्लेरॉसीस प्लाकमधून काढून घेऊन लिव्हरद्वारे त्याचे विघटन करणे. थोडक्यात एचडीएल कोलेस्टेरॉल हे रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा कमी करण्यास मदत करते. यालाच ‘रिव्हर्स ट्रान्सपोर्ट’ असेही म्हणतात. एचडीएल कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी ही हृदयविकाराची संरक्षक असते. काही औषधे आणि आहार घटक हे पातळी वाढवण्यास मदत करतात. नियासिन हे जीवनसत्त्व, मासे, ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स, नियमित व्यायाम, धूम्रपान थांबवणे, काही प्रकारची तेले या गोष्टी एचडीएल कोलेस्टेरॉल वाढविण्यास मदत करतात.
ट्रायग्लिसरायड्स - हा आपल्या रक्तातील चरबीचा प्रकार आहे. आपले शरीर त्यांना उर्जेसाठी वापरते. चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला काही ट्रायग्लिसराइड्सची आवश्यकता आहे. परंतु, उच्च ट्रायग्लिसरायड्समुळे हृदयरोगाचा धोका वाढू शकतो आणि मेटाबोलिक सिंड्रोमचे चिन्ह असू शकते. मेटाबोलिक सिंड्रोम हा उच्च रक्तदाब, उच्च रक्त शर्करा, कंबरेमध्ये खूप जास्त चरबी, कमी एचडीएल (‘चांगला’) कोलेस्टेरॉल आणि उच्च ट्रायग्लिसरायड्स यांचे मिश्रण आहे. मेटाबॉलिक सिंड्रोममुळे हृदयरोग, मधुमेह आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. टाईप २ मधुमेहामध्ये ट्रायग्लिसरायड्सचे प्रमाण वाढलेले असते. लठ्ठपणा, अनियंत्रित मधुमेह, हायपोथायरॉईडीझम, किडनी रोग, बर्न करण्यापेक्षा नियमितपणे जास्त कॅलरी खाणे, भरपूर दारू पिणे या कारणांमुळे ट्रायग्लिसरायड्स पातळी वाढते. अति उच्च ट्रायग्लिसरायड्स प्रमाण झाल्यास स्वादुपिंडास सूज (पॅनक्रियाटायटिस) येऊ शकते- जी धोकादायक असते.
कोलेस्टेरॉलविषयक काही गैरसमज, त्यांची पातळी कमी करण्यासाठी काय करायचे आदी गोष्टींबाबत पुढील लेखात पाहू.
(लेखक ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ आहेत.)
Web Title: Dr Rutuparn Shinde Writes Cholesterol And We
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..