आरोग्यमंत्र : हृदयविकाराचे निदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart disease
आरोग्यमंत्र : हृदयविकाराचे निदान

आरोग्यमंत्र : हृदयविकाराचे निदान

मागील भागात आपण अँजिओग्राफी या चाचणीविषयी माहिती घेतली. या चाचणीव्यतिरिक्त इतरही अशा काही चाचण्या आहेत, की ज्यांच्यामुळे हृदयविकाराचे निदान होऊ शकते. त्यांची आज आपण माहिती घेऊयात.

ईसीजी इलेक्ट्रोकार्डिओग्रॅम ही एक अत्यंत उपयुक्त आणि सर्वत्र उपलब्ध असलेली चाचणी आहे. जेव्हा एखाद्या रुग्णाला छातीमध्ये दुखते, त्या वेळी ही चाचणी एक सर्वप्रथम प्राथमिकरीत्या करता येते. या चाचणीची उपलब्धता आणि त्याला लागणारा कमी खर्च यामुळे ही एक अतिशय उपयुक्त अशी प्राथमिक (screening) चाचणी आहे. या चाचणीमध्ये हृदयाच्या इलेक्ट्रिकल अवस्थेचा आलेख काढला जातो. जर हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असेल किंवा बंद पडला असेल तर यामध्ये कधी बदल दिसून येतात, की ज्यामुळे डॉक्टरांना हृदयविकाराचे निदान करणे शक्य होते. छातीत दुखत असताना ईसीजी नॉर्मल आल्यास ३० मिनिटांनंतर परत एखादा ईसीजी काढून घ्यावा. लागोपाठ दोन ईसीजींमध्ये काही दोष नसल्यास आपल्याला हृदयविकाराचा त्रास त्या क्षणी असण्याची शक्यता कमी संभवते. तथापि ज्या वेळेस आपल्याला छातीत दुखणे, छाती भरून येणे, अस्वस्थता वाटणे आणि जळजळ वाटणे अशी लक्षणे दिसतात, तेव्हा त्वरेने ईसीजी काढून घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला गॅस अथवा ॲसिडिटी समजून डॉक्टरांना संपर्क ना करता ही दुखणी अंगावर काढल्यास पुढे जाऊन गंभीर गुंतागुंत होण्याची शक्यता असते. अशा वेळी ईसीजीसारखी चाचणी ही अतिशय उपयुक्त आणि जीव वाचवणारी ठरू शकते.

स्ट्रेस टेस्ट

ईसीजी हा झोपून स्थिर अवस्थेत काढला जातो; पण ज्यावेळी तो ट्रेडमिल अथवा सायकल चालवून व्यायाम करताना काढला जातो, त्याला ‘स्ट्रेस टेस्ट’ असे म्हणतात. ज्या वेळी स्थिर अवस्थेतील ईसीजीमध्ये दोष दिसत नाही; पण डॉक्टराना शंका असते, की आपल्याला हृदयविकार आहे- तेव्हा स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली जाते. ही चाचणी करण्यास साधारणतः १५ते २० मिनिटे लागतात. या चाचणीमध्ये काही दोष आढळला नाही, तर आपल्याला हृदयविकार असण्याची शक्यता फारशी नसते. पण जर या तपासणीमध्ये दोष आढळला, तर मात्र त्याची खात्री करण्यासाठी अँजिओग्राफीसारखी इन्व्हेझिव्ह चाची करणे क्रमप्राप्त असते. ही चाचणी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच केली गेली पाहिजे. या चाचणीमध्ये २५०० मध्ये एखाद्या रुग्णाला गंभीर धोका संभवतो- कारण ही एक हृदयाला नियंत्रितरीत्या उत्तेजित करून केलेली चाचणी आहे.

ज्या रुग्णांना व्यायाम करताना काही कारणास्तव- उदाहरणार्थ गुडघेदुखी, अंशतः पॅरालिसिस इत्यादी कारणांमुळे अडचण येते- अशा रुग्णांसाठी इतर काही तपासण्या करता येतात.

२-डी इकोकार्डिओग्राफी

ज्याप्रमाणे आपण पोटाची अल्ट्रासोनोग्राफी करतो, त्याप्रमाणे हृदयाची अल्ट्रासाऊंडद्वारे केलेली चाचणी म्हणजे २डी इकोकार्डिओग्राफी. या तपासणीमध्ये अल्ट्रासाऊंड ध्वनिलहरींद्वारे हृदयाचे होणारे काम, त्यातील झडप अथवा काही हृदयाचे होणारे कार्य हे डॉक्टराना प्रत्यक्ष काहीही ना टोचता नॉन-इन्व्हेझिव्ह प्रकारे बघता येते. यामध्ये आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेला असेल, तर त्याचे निदान होऊ शकते. या व्यतिरिक्त, हृदयाच्या आतील झडप, पडद्यामधील छिद्रे अथवा काही जन्मतः असलेल्या गुंतागुंतींविषयी खूप माहिती प्राप्त होते. हृदयाची पंपिंग क्षमता ही इंजेक्शन फ्रॅक्शन या संज्ञेने ओळखली जाते. हृदयविकार अथवा काही कारणांमुळे ही क्षमता कमी होऊ शकते. याचे निदान २-डी इकोकार्डिओग्राफीद्वारे सहजरित्या हाऊ शकते.

बऱ्याच वेळी स्ट्रेस टेस्ट आणि २डी इको एकत्र सांगितल्या जातात- कारण या तपासण्यांमुळे वेगवेगळी माहिती उपलब्ध होते. २-डी इकोमुळे भूतकाळ आणि वर्तमानाविषयी माहिती मिळते, तर स्ट्रेस टेस्टमुळे थोड्या फार भविष्याविषयी अंदाज येतो. त्यामुळे या तपासण्या पर्यायी नसून, पूरक आहेत हे लक्षात ठेवावे. जर काही कारणास्तव स्ट्रेस टेस्ट करता येत नसेल, तर डॉक्टर

औषधांचे इंजेक्शन देऊन स्ट्री इको नावाची चाचणीदेखील करू शकतात.

कार्डियाक एंझाइम टेस्ट

काही तपासण्या रक्तामधूनदेखील केल्या जातात. याला ‘कार्डियाक एंझाइम टेस्ट’ असे म्हणतात. यामध्ये सिरम CPKMB, TROPT या तपासण्यांचा समावेश होतो. छातीत दुखत असते आणि ईसीजीमध्ये दोष सापडत नाही, अशा वेळेस या तपासण्यांचा आधार घेतला जातो. साधारणपणे ३० मिनिटांमध्ये या तपासण्यांचा निकाल आपल्या हाती येतो. हृदयाला इजा पोचते, त्यावेळी या एंझाइम्सची रक्तातील पातळी वाढते आणि त्या अनुषंगाने हृदयविकाराचे निदान करण्यास मदत होते.

यातील प्रत्येक तपासणी वेगवेगळी माहिती देते, त्यामुळे रुग्णाच्या अवस्थेप्रमाणे या तपासण्या वेगवेगवेग्ळ्या अथवा एकत्र सांगितल्या जाऊ शकतात. या सर्व तपासण्या प्राथमिक स्वरूपाच्या आहेत आणि त्यातील निदानाची खात्री करून घेण्यासाठी अँजिओग्राफीसारख्या टेस्टचा आधार घेतला जाऊ शकतो.

डॉक्टर उगाचच अनावश्यक चाचण्या करतात, हा गैरसमज करून न घेता, आजच्या या माहितीमुळे आपल्याला योग्य ती तपासणी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करून घेणे शक्य होईल.

पुढील भागामध्ये आपण हृदयविकाराच्या विविध उपचारपद्धतींबद्दल माहिती घेऊयात.