आरोग्यमंत्र : हृदयविकाराचे ‘रिव्हर्सल’

हृदयविकारास पूर्णविराम द्यायचा असेल तर आपणास आपली जीवनशैली पूर्ण आणि कायमची बदलावी लागेल.
Heart Sickness
Heart SicknessSakal
Summary

हृदयविकारास पूर्णविराम द्यायचा असेल तर आपणास आपली जीवनशैली पूर्ण आणि कायमची बदलावी लागेल.

स्टेण्ट अँजिओप्लास्टी आणि बायपास इत्यादी उपचारांनंतरदेखील परत हृदयविकार होऊ शकतो का? : होय. या उपचारपद्धती हृदयविकारावरील स्वल्पविराम आहेत. मात्र, आपण नंतर आपली जीवनशैली बदलली नाही, तर भविष्यकाळात नवीन ठिकाणी स्टेनोसिस अथवा अडथळे निर्माण होऊ शेतात. हे या उपचार पद्धतींचे अपयश नाही. हृदयविकारास पूर्णविराम द्यायचा असेल तर आपणास आपली जीवनशैली पूर्ण आणि कायमची बदलावी लागेल.

‘हृदयरोगाचे रिव्हर्सल’ म्हणजे काय?

कोरोनरी हृदयरोग अथवा हृदयरोगामुळे होणारे रोग, जेव्हा कोरोनरी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा उद्‍भवते. या अडथळ्यांना ‘एथेरोस्क्लेरोटिक प्लाक’ म्हणतात. ज्या प्रक्रियेमुळे अडथळे निर्माण होतात, त्या प्रक्रियेला ‘एथेरोस्क्लेरोसिस’ म्हणतात. प्लाक विघटित होतो, तेव्हा कोरोनरी धमनीमध्ये रक्ताची गुठळी बनते आणि हृदयविकाराचा झटका सुरू होतो.

रिस्क फॅक्टर्स आक्रमकपणे कमी केल्यास, आपण ‘एथेरोस्क्लेरोटिक प्लाक’ कमी करू शकतो, असे अभ्यासातून दिसून आले आहे. या प्रक्रियेला ‘कोरोनरी हृदयरोगाचे रिव्हर्सल’ असे म्हणतात. यात कोरोनरी रक्तवाहिनी पूर्णपणे उघडत नाही, ८० टक्क्यांचा अडथळा ५० टक्के होत नाही. मात्र, समजा ६५ टक्के अडथळा असेल, तर ६२ टक्के अडथळ्यामध्ये बदलू शकतो. प्लाकची टक्केवारी थोडीसी कमी झाल्यावरसुद्धा, ते फायदेशीर ठरते -

  • रिव्हर्सल होते, तेव्हा ते मऊ प्लाकमधून कोलेस्टेरॉल कमी करून त्या प्लाकला कडक बनवले जाते. यामुळे प्लाक अस्थिर होऊन त्याचे विघटन होण्याची व रक्ताची गुठळी बनण्याची शक्यता कमी होते. याला ‘प्लाक स्टॅबिलायझेशन’ म्हणतात.

  • अगदी थोड्या प्रमाणात प्लाकची टक्केवारी कमी झाली, तरीही त्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा हृदयाचा रक्तपुरवठा वाढवण्यात होतो. एथेरोसक्लेरोसिसचे रिव्हर्सल टक्केवारीमध्ये नगण्य असले, तरीही त्यामुळे ५० टक्क्यांपर्यंत हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.

जीवनशैली-बदल उपचार

जीवनशैली-बदल उपचाराने कोरोनरी एथेरोस्कक्लेरोसिस हे रिव्हर्स होऊ शकते, हे अमेरिकेतील डॉ. डीन ओर्निश आणि डॉ. एस्सेलस्टाईन यांच्या संशोधनाने सिद्ध झाले आहे.

आरोग्याच्या तंबूचे चार स्तंभ म्हणजे आहार, विहार (व्यायाम), आचार विचार (मानसिक आरोग्य), शास्त्रोक्त औषधे हे आहेत. या चारही स्तंभांना व्यवस्थित न्याय देऊन जीवनशैली बदलली, तर आपल्याला हृदयविकाराला पूर्णविराम नक्कीच देता येईल. त्यासाठी आपल्याला जिद्द आणि चिकाटीने खालील तत्त्वांचे पालन केले पाहिजे.

  • आहार : हृदयविकाराचे जोखीम घटक कमी करण्यासाठी भाज्या, फळे, शेंगदाणे, नट, संपूर्ण धान्य आणि माशांच्या आहारावर भर देणारा आहार घ्यावा. आहारातील सॅच्युरेटेड फॅटची जागा मोनोअनसॅचुरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटने घेतल्यास हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. थोडक्यात वनस्पतीजन्य आणि मुबलक प्रमाणात फळांचा समावेश असलेला आहार हृदयविकार ‘रिव्हर्स’ करण्यासाठी उपयुक्त आहे.

  • व्यायाम : प्रौढांनी प्रत्येक आठवड्यात किमान १५० मिनिटांचा एकत्रित मध्यम तीव्रतेचे किंवा ७५ मिनिटे जास्त तीव्रतेचे एरोबिक व्यायाम (ट्रेडमिल, चालणे, स्विमिंग अथवा सायकल) दर आठवड्यात करावे. आठवड्यातून दोन वेळा स्ट्रेंग्थ ट्रेनिंग व योगासने करावीत. सौम्य योगासने आणि प्राणायाम हृदयविकारापासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. वजन कमी करणे हे हृदयविकार आणि मधुमेहापासून दूर जाण्यासाठी अत्यावश्यक आहे

  • मानसिक आरोग्य व तणावमुक्ती : तणाव हा हार्ट ॲटॅकसाठी महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. तणावाखालील व्यक्तीच्या रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाणदेखील जास्त असते. उच्च रक्तदाबदेखील स्ट्रेसमध्ये लवकर नियंत्रणाखाली येत नाही. अशा व्यक्तींनी समुपदेशन आणि गरज पडल्यास औषधांचा वापर करावा.

  • तंबाखू आणि धूम्रपान : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका असतो. सिगारेट धूम्रपान आणि तंबाखूसेवन हा कोरोनरी हृदयरोग असलेल्या रुग्णांवर अचानक हृदयविकाराने मृत्यू ओढवणारा एक शक्तिशाली स्वतंत्र रिस्क फॅक्टर आहे. कुठल्याही प्रकारचे तंबाखूसेवन हानिकारकच आहेत. ते पूर्णपणे थांबवण्यासाठी समुपदेशन आणि औषधे यांचा वापर केला पाहिजे.

  • नियमित औषधोपचार : डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्व औषधे नियमितपणे आणि न चुकता घ्यावीत. अशास्त्रीय उपचारांच्या मोहात ना पडता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. किरणने अँजिओग्राफी करून घेतली. त्यामध्ये त्याला ५० टक्के अडथळा अढळला. यानंतर त्याने जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करून आपला आहार, विहार म्हणजे नियमित व्यायाम, योगासने प्राणायाम, वजन घटवणे, तणाव कमी करणे आणि शास्त्रोक्त औषधोपचारांचा उपयोग करून हृदयविकारांना पूर्णविराम दिला.पुढील भागांमध्ये जीवनशैलीमधील प्रत्येक घटकाचा हृदयविकार निर्मूलनासाठी कसा उपयोग करता येईल, ते तपशीलवार पाहूयात.

(क्रमश:)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com