
‘सोबत असणं’ ही खूप छान भावना असते. कधी कुणी आपल्या सोबत असणं, कधी आपण कुणाची तरी सोबत असणं. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत पोचेपर्यंत असलेली आई- बाबाची सोबत, वर्गात भेटलेल्या पहिल्या मैत्रिणीची सोबत, घरी जाताना मिळालेली कुणाची तरी सोबत आश्वासक असते. एखाद्या व्यक्तीची दवाखान्यात सोबत मिळाली नसती तर सोडून गेलेल्या व्यक्तीचं दुःख अधिक तीव्रतेनं बोचलं असतं; परीक्षा काळात मैत्रिणीची सोबत नसती, तर समोरचा पेपर बघून रडू फुटलं असतं; बक्षीस समारंभात कुणी सोबत नसतं, तर इतर टाळ्यांनी तितका आनंद झाला नसता; कंटाळवाण्या रविवारी दारावर मैत्रीण आली नसती, तर दिवसही मग छोटा वाटला असता; अडनिड्या पायवाटेवर पुढे चालणारी व्यक्ती नसती तर रस्त्याचा अंदाज आला नसता; निर्मनुष्य रस्त्यावर तुफान पावसात आडोशाला उभं राहिल्यावर समोरील घरातल्या दिव्यानंही व्यक्तीची जागा घेतलीये.
अशा अनेक वेळेला अनेक व्यक्तींनी आपल्याला आश्वासक सोबत दिलेली असते. कधी दिवस फुलवलेले असतात, कधी बोच बोथट केलेली असते, कधी आनंद द्विगुणित केलेला असतो, तर कधी एकटेपणा घालवलेला असतो. अशा व्यक्ती कायमस्वरूपी लक्षातही राहतात, आणि त्यांना विसरूही नये. कारण दिवस निघून गेला, तरी त्या क्षणी ती व्यक्ती सोबत नसती तर? हा स्वत:चं स्वत:ला विचारलेला प्रश्न त्या व्यक्तीचं महत्त्व अधोरेखित करतो.
पण जर ती व्यक्ती नसती, तर मी तशीच वागले असते का, जशी मी वागले आहे? हा प्रश्नही एकदा स्वत:ला विचारायला हवा. ती व्यक्ती नसती, तर त्या ठराविक वेळी मी काही वेगळी वागले असते का? मी काही वेगळ्या शक्यतांचा विचार केला असता का? कुणाच्या तरी सोबतीची नकळत आपल्याला सवय होत आहे का? हेदेखील प्रश्न स्वत:चे स्वत:ला एकदा विचारायला हवेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रत्येक वेळी आपल्याला कुणाची सोबत असेलच असं नाही. कुणी आपल्याबरोबर नसण्यानं आपल्या प्रवासाचा वेग कमी होता कामा नये. एखाद्याच्या सवयीमुळे येणारं अवलंबत्व म्हणजे डिपेन्डन्सी, इतर अनेक शक्यता मारते, अशा मताची मी आहे. दु:खाच्या, तणावाच्या प्रसंगी एकटं असतानाही तितक्याच खंबीरपणे मला तो क्षण हाताळता यायला हवा.
आनंदाच्या क्षणी भलेही एकटं असू पण तितक्याच संयमानं आनंदही हाताळता यायला हवा. शिणलेल्या दिवशी, भर पावसात, अडनिड्या वाटेवर कुणी नसतानाही मला पुढं जाता यायला हवं. ‘कुणाला तरी सोबत घेऊन जा गं,’ ही सवय खासकरून मुलींना लहानपणीपासून काहीवेळा उगाचच लावलेली असते. त्याबाबतीत ग्रामीण भागातील मुलींचं मला फार कौतूक वाटतं. कित्येक अशा मुली अगदी छोट्याशा गावांतून एकट्या येऊन शहरात मनसोक्त वावरत असतात. अगदी लहान वयात ज्या मुलींवर शाळेतल्या मैत्रिणी, कुटुंब, सवयीच्या पायवाटा, हे सगळं सोडून शहरात येण्याची वेळ आलेली असते त्यांच्या डोळ्यातली चमक आणि निडरपणा काही वेगळाच असतो.
अनेकदा सवयीचा भाग म्हणून आपण अनेक गोष्टी करतो. अगदी सवयीचा भाग म्हणून काही व्यक्तींनाही उगाचच प्रतिसाद देत राहतो. एकदा बसून अशा सवयींची यादी करायला हवी. सवय लागलेली व्यक्ती किंवा गोष्ट चांगली की वाईट हे ठरवण्यापेक्षा, ती व्यक्ती किंवा गोष्ट माझ्या आयुष्यात आत्ता नसेल, तर मी काही अधिक शक्यता पडताळीन का? असा विचार केला, आणि उत्तर मिळालं तर तो क्षण आपला.
सरसकट सगळ्याचीच सोबत खोडून काढत नाहीये; पण सरसरकट सगळ्यांचीच सोबत सवयीचा भाग होऊ नये यासाठी हा लेख. ‘मला कुणाची तरी सोबत हवी’ आणि ‘मी माझं करायला खंबीर आहे’ या दोन वाक्यांत एका ‘अवलंबत्व’ आहे, एकात ‘आत्मविश्वास’ आहे. ‘फाजील आत्मविश्वास’ जसा नडू शकतो, तसं ‘फाजील अवलंबित्व’ इमोशनली दोन पावलं मागे नेऊ शकतं. असं होऊ द्यायचं नसेल, तर स्वत: स्वत:साठी वाटा शोधूया. अडखळू, पडू; पण सावरायला कुणी नसेल तर आपलं आपल्याला पटकन सावरताही येईल.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.