esakal | ‘पॉवर’ पॉइंट : नातं ‘कस्टमाईज’?

बोलून बातमी शोधा

Customise
‘पॉवर’ पॉइंट : नातं ‘कस्टमाईज’?
sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

आज शेअर करणारी गोष्ट प्रत्येकालाच लागू होणार नाही. प्रत्येक घरातल्या कथा वेगळ्या असतात. त्यामुळे अगदी पर्सनल घेऊ नका; पण नातं नैसर्गिकरित्या फुलत नसतं तेव्हा अनेकदा ते ‘कस्टमाईज’ करून फुलवलं जातं, हे वास्तव आहे. आता ‘कस्टमाईज’ म्हणजे काय? तर आपण निवडलेल्या, आपल्या चॉईसच्याच गोष्टी एकमेकांत सांधून, त्यातून एक परिपूर्ण गोष्ट तयार होणं. मला असं वाटतं- कोणतंही नातं आयुष्यभर नैसर्गिकरित्या फुलत नसतं, त्याला कालांतरानं कस्टमाईज करून पुढे न्यावं लागतं. कदाचित माझं म्हणणं तुम्हाला पटणार नाही. योग्यही वाटणार नाही. काही हरकत नाही.

परवा एक मैत्रिण सांगत होती, ‘‘लग्नाचं वय झालंय, शोधतीये मुलं; पण माझ्यासारखा कुणी मिळतच नाहीये. म्हणजे किमान माझ्या आवडीनिवडी मॅच होतील असा..’’ या वाक्यात काहीच चूक नाही; पण खरंचच आपल्यासोबत असलेली व्यक्ती आपल्यासारखी किंवा आपल्या आवडीनिवडी जुळतील अशीच असते का? मला वाटतं, जगातलं सगळ्यात सुखी दाम्पत्यही एकमेकांसारखं कधीच नसतं. एकमेकांना पूरक होणं ही त्यांची चॉईस असू शकते. आपल्यासारखीच आवडनिवड असणारी व्यक्ती आयुष्यात दीर्घकाळ राहायला लागल्यावर काहीवेळा नातं सपकही होत जात असावं.

नुकताच ‘अजीब दास्तां’ नावाचा सिनेमा पाहत होते. त्यात आदिती राव-हैदरी आणि कोंकणा सेन-शर्मा या दोघींचा अभिनय असलेली एक गोष्ट आहे. आदिती साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचा नवरा इतका चांगला आहे, की तिच्या वाढदिवसाला तिच्यासाठी खास केक बनवतो, तिचे कपडे इस्त्री करून तयार ठेवतो, वगैरे वगैरे. ...पण त्याचवेळी कोंकणा सेन-शर्मा या मैत्रिणीशी बोलताना आदितीचं एक वाक्य आहे. ती म्हणते, ‘‘तो इतका चांगला आहे, की मला त्याचा इतका चांगुलपणाही सहन होत नाही.’’

सर्वसाधारण आयुष्यात पटकन कुणीही म्हणेल ‘कर्म तुझं..’; पण दुसऱ्या बाजूनं पाहिलं तर खरंचच अशी फेज येत असावी का? फक्त स्त्रियांच्याच बाजूने नाही, पुरुषांच्याही. म्हणजे एक चूक, दुसरा बरोबर याच्याशी पलीकडचं काहीतरी असतं. प्रत्येक वेळी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण नातं पाहू शकत नाही; पण त्याला/तिला मी आवडलो/आवडले पाहिजे यासाठी दाखवलेला चांगूलपणा, नंतर ओझं वाटायला लागतो, आणि ते कुणासमोर बोलताही येत नाही अशी फेज स्त्रियांची किंवा अगदी पुरुषांचीही होत असेल का? बरं, समोरच्याचा चांगूलपणा यामुळे मुळीच वाईट किंवा चुकीचा ठरत नाही; पण त्याच्या जोडीदाराला तो पचत नाही, अशी स्टेज येत असेल का?

‘ती खूप छान स्वभावाची आहे, तो खूप छान समजून घेतो.’, ‘ती खूप छान हसून बोलते, तो छान शांतपणे बोलतो.’... यातल्या ‘छान’ फॅक्टरला काही काळानंतर मर्यादा येतात. कधी त्या जाणवतात, कधी नाही. कधी त्या जाणवूनही दुर्लक्षित केल्यानं नात्यांमध्ये अपेक्षांचा ढीग लागतो.

‘सगळं चांगलं मिळत असूनही किरकिर किती..’ या वाक्यांनी कान पिटायच्या आधीच दोघांपैकी एक जण समोरच्याची सवय करून घेतो. हे अर्थात सरसकट नाही; पण काही नात्यांत हे मी होताना बघितलं आहे. आणि म्हणून जिथून सुरुवात केली तिथेच आपण परत येतो- की कोणतीही व्यक्ती अगदी आपल्यासारखी नसतेच. तुझ्या दोन गोष्टी, माझ्या दोन गोष्टींची बेरीज करून पुढे जाण्याचा चॉईस मात्र आपला असतो. नातं असं ‘कस्टमाईज’ असू शकतं, आणि त्याला समाजानं ठरवलेल्या ‘चूक-बरोबर’चे नियम लागू होत नाहीत. अनेक नैसर्गिक उर्मींवर मात करत अधिकाधिक ‘सभ्यता’ शिकवणाऱ्या समाजात, दोन व्यक्तींमधलं नातं मात्र आयुष्यभर नैसर्गिकरित्या फुलावं, ही अपेक्षाच त्यामुळे काहीशी विरोधाभासी वाटते.