
उद्या म्हणजे २० फेब्रुवारीला, एक महत्त्वाचा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस. ‘समाज’ हा काही वेळा मला बिनचेहऱ्याचा शब्द वाटतो. माझ्या अवतीभोवती, माझ्या अनेक मैत्रिणी अजूनही ‘समाजमान्य’ असतील त्याच गोष्टी करण्यात धन्यता मानतात.
उद्या म्हणजे २० फेब्रुवारीला, एक महत्त्वाचा दिवस आहे. आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिवस. ‘समाज’ हा काही वेळा मला बिनचेहऱ्याचा शब्द वाटतो. माझ्या अवतीभोवती, माझ्या अनेक मैत्रिणी अजूनही ‘समाजमान्य’ असतील त्याच गोष्टी करण्यात धन्यता मानतात. किंवा त्यांच्या आयुष्याचं सार्थक त्यातच शोधतात. ‘या’ वयातही लग्न झालं नाही, ‘या’ वयातही मूल झालं नाही तर समाज काय म्हणेल, अशी वर्षानुवर्ष परंपरागत चिकटलेली अट्टाहासी वाक्यं अजूनही हजारो मुली ऐकत असतील.
लग्न, मूल तर फार वरवरच्या गोष्टी मी सांगितल्या. अगदी कोणत्या शाळेत दाखल करायचं इथपासून, घरी येणाऱ्या मैत्रिणींच्या तुलनेत मित्रांचा रेशो किती आहे, चारचौघांत कपडे कसे घालते, टेरेसवर किती काळ घुटमळते, गाडी कुठली चालवते, नटण्याची हौस किती जपते, अशा असंख्य चौकटींत मुलीला बसवून यातलं कुठलं ‘समाजमान्य’, आणि कुठलं ‘अमान्य’ याची गणितं मांडण्यात काही पालकांचा हात कुणीच धरू शकत नाही.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
‘माझ्या मुलीला इतका छान पगार आहे, आणि त्यातून खरेदी केलेले फॅन्सी कपडे घालून ती समाजात फिरते, तेव्हा मला अभिमान वाटतो’ असं म्हणणारे पालक, मुलीचं यश या बिनचेहऱ्याच्या समाजाच्या नजरेतूनच बघत असतात. मग हा अभिमान काय कामाचा? गंमतीचा भाग म्हणजे, ‘शक्यतो मुलीचा पगार तिच्या होणाऱ्या नवऱ्यापेक्षा जरा कमी असावा, निदान त्याच्यापेक्षा जास्त असू नये म्हणजे समाजात हसं होणार नाही,’ असा विचार करून क्षणार्धात मिरवलेला अभिमान मातीमोलही करतात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
माझ्या आजूबाजूच्या कित्येक मुली ‘सामाजिक न्याय’ वगैरे या शब्दापासून कोसो दूर आहेत. ‘न्याय’ मिळण्यासाठी ‘अन्याय’ होतोय याचं आधी रिअलायझेशन तर व्हायला हवं ना! पण आपली व्यवस्थाच इतकी साचेबद्ध आहे, की आत्ता समोर असलेल्या गोष्टी ‘अन्यायी’ नाहीत तर समाजानं ठरवलेल्या नियमांचा एक भाग आहेत, अशाच पद्धतीनं मुलींच्या डोक्यात कोंबलेल्या असतात. ‘शक्यतो’ या शब्दानं अडनिड्या वयातल्या मुलींचा खूप घात केलाय असं मला वाटतं. ‘शक्यतो’ इकडेच शिक्षण घे, ‘शक्यतो’ इतक्या वाजायच्या आत घरी येच, ‘शक्यतो’ पाहुण्यांसमोर पूर्ण कपडे घाल, ‘शक्यतो’ आपल्यातलाच बघ, ‘शक्यतो’ चान्स घेच’, असे पर्याय दिल्याच्या थाटात आपलं म्हणणं रेटणारे पालक मी स्वत: माझ्या आजूबाजूला बघितले आहेत. ‘तुमची मुलगी आम्ही काय बोलू?’ या विचारानं कुणी बाहेरचं मग चुका दाखवायला जातही नाही. ही ‘शक्यता’ सामाजिक कल कोणत्या बाजूने आहे, यावर आधारित असते याचीही कल्पना त्या मुलीला नसते. याचा अर्थ पालक अन्याय करतात असं माझं म्हणणं नाही. But it’s not fair for a girl too.
मुक्त माळरान मिळाल्यावर हवं तसं उधळायला मुली म्हणजे काही घोडे नाहीत. माणूस आणि प्राणी यात फरक असतो. त्यामुळे जरा मोकळीक दिली, समाज नावाच्या बिनचेहऱ्याची भीती नाही दाखवली, तर हजारो माळरानं निर्भीडपणे तुडवण्याची ताकद मुलींमध्ये असते. आता सो कॉल्ड ‘समाज’ त्याला ‘उधळणं’ म्हणत असेल आणि मुलीला ते ‘स्वातंत्र्य’ वाटत असेल, तर तो ज्याच्या त्याच्या न्यायाच्या कल्पनांचा परीघ समजावा.
Edited By - Prashant Patil