esakal | ‘पॉवर’ पॉइंट : रोजची ‘प्लस लिस्ट’

बोलून बातमी शोधा

Plus List
‘पॉवर’ पॉइंट : रोजची ‘प्लस लिस्ट’
sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

‘दिवस कंटाळवाणा जातोय, नकारात्मक जातोय, भीतीचा जातोय’, या भावनांमधून आपण सगळेच जात आहोत. परिस्थितीच अशी आहे, की अट्टाहास करूनही खळखळून हसणं होत नाहीये. या विचारांच्या गर्तेतून कसं बाहेर पडायचं? याची उत्तरं माझ्याकडे नाहीत; पण एक छोटी ट्रिक आज नक्की शेअर करू शकेन.

पत्रकारिता शिकत असताना, दिवसांतले ८-८ तास अभ्यासात डुंबून जायला लागेल, अशी काही परिस्थिती नव्हती. मग सकाळचं कॉलेज झालं, की दुपारी छोटा-मोठा जॉब किंवा इंटर्नशिप, पुण्यासारख्या ठिकाणी वाढल्यामुळे ‘संध्याकाळी काय करू?’ असा प्रश्न सहसा पडतच नाही. तर असं गावभर फिरून रात्री घरी आलं, की आई विचारायची, ‘‘आजच्या दिवसात ‘प्लस’ काय केलंस?.’’ खरंतर मला कळायचं नाही, की ‘प्लस’ असं काय असणार?; पण आईला वेगळं काहीतरी अपेक्षित असायचं. दिवसातल्या सगळ्यात कंटाळवाण्या क्षणांमध्ये शोधली गेलेली एखादी गोष्ट तिला अपेक्षित असायची.

हळूहळू दिवसातल्या कंटाळवाण्या क्षणांमध्येही जगलेल्या छान गोष्टींची बेरीज रात्री झोपायच्या आधी करायची सवयच झाली. मी आज नेहमीच्या रूटिनपेक्षा ‘काहीतरी वेगळं’ करण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची, खूप लोकांना भेटण्याची वगैरे कशाचीही गरजच नसते हे कळायला लागलं. अगदी साधं काहीतरी करूनही छान वाटू शकतं. म्हणजे अगदी सकाळी उठून हवी तशी चहा-कॉफी करून घेतली आणि उंबरठ्यावर किंवा खिडकीत एकटी बसून ती एन्जॉय केली, हे माझ्या प्लस लिस्टमध्ये येऊ शकतं. किंवा खूप दिवसांत बोलले नाही अशा मित्राशी/मैत्रिणीशी फोनवर बोलले, रेंगाळवाण्या दुपारी पांढरं शुभ्र बेडशीट अंथरून लोळले, घरातलं कपाट आवरायला काढलं, जुने फोटो अल्बम बघत बसले, काहीतरी छान लिहिलं, खूप दिवसांत न्याहाळलं नसेल तर आपलंच शरीर एकदा आरशात नजरभर न्याहाळलं, यातलं काहीही अगदी काहीही या लिस्टमध्ये येऊ शकतं.

दिवसभर करायला काहीच नाहीये, त्यामुळे अस्वस्थपणा येतोय ही फेज तुमच्यापैकी कुणाची आली आहे का? मी अशा फेजेसमधून अनेकदा गेलीये; पण आईचा हा ‘प्लसचा फॉर्म्युला’ अशावेळी सगळ्यात जास्त उपयोगी पडलेला आहे. ठरवून हातातलं सगळं सोडून दुसरं काहीतरी शोधायला दुसऱ्या देशात, किंवा शहरांत येतो, तेव्हा मुळात मेंदूत पहिल्यांदा अस्वस्थता सुरू होते भवतालच्या शांततेनं. मात्र, या शांततेतही आपल्याला आवाज, दंगा हवा असेल तर आपल्याच कृतीतून हा दंगा घालावा लागतो. हळूहळू एकेक कृती स्वत:पुरती का होईना, अर्थपूर्ण होऊन जाते.. बिलिव्ह मी, समोरच्याला वाटतं, ‘‘अरे, ही व्यक्ती तर काहीच करत नाहीये.’’ पण त्या व्यक्तीलाच माहिती असतं, की आत्ता नुसतं आरशात न्याहाळतानाही ती व्यक्ती तो क्षण परिपूर्ण जगत असते. कारण त्या क्षणाकडे पाहण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोनच आता बदलेला असतो. तो क्षण आता त्या व्यक्तीच्या ‘प्लस लिस्ट’मध्ये गेलेला असतो.

मला मान्य आहे, की हे सांगणं आणि खरंच जगणं यात फरक असू शकेल; पण यातल्या अनेक गोष्टी मी अनुभवल्या आहेत, पुढेही अनुभवीन. पण आता कुठलाही क्षण ‘युजलेस’ वाटत नाही. ‘‘काय राव जगतेय’’ असं होत नाही. कारण आहे त्यात ‘प्लस’ काय आहे हे शोधण्याची आता मेंदूलाही सवय झालीये. सध्या ‘पॉझिटिव्ह’ शब्दाची भीती वाटायला लागलीये; पण अशी रोजच्या रोजची ‘प्लस लिस्ट’ ‘पॉझिटिव्ह’ शब्द ऐकून आलेल्या निगेटिव्हिटीपासून जरूर दूर ठेवेल.