‘पॉवर’ पॉइंट : सुंदर मुखवट्यामागचा चेहरा

‘तुम्ही कसे दिसता’, हेच फक्त ज्या क्षेत्रात महत्त्वाचं असतं, त्या इंडस्ट्रीतल्या मैत्रिणींचा वेगळ्याच पातळीवर स्ट्रगल सुरू असतो.
Power Point
Power PointSakal

‘तुम्ही कसे दिसता’, हेच फक्त ज्या क्षेत्रात महत्त्वाचं असतं, त्या इंडस्ट्रीतल्या मैत्रिणींचा वेगळ्याच पातळीवर स्ट्रगल सुरू असतो. कधी तो स्ट्रगल दिसतो, कधी तो लपवता येतो, कधी तो लपवण्याच्या नादात उघडा पडतो... पण स्ट्रगल असतो. आणि त्यावर मात करायची असेल तर समोर असलेले पर्याय तुलनेनं फार कमी असतात.

गंमत म्हणजे, सुंदर दिसण्याला ‘इंडस्ट्रीची गरज’ मानणारे स्वत: त्या दिसण्याच्या स्पर्धेत असतातच असं नाही. मुलींचा हा स्ट्रगल बाहेरून पाहताना बाकी मैत्रिणींना अगदी सहज सोपा वाटतो. ‘‘त्यात काय एवढं, एवढंच करायचंय ना,’’ असंही वाटतं. मात्र, आत्ता जसे दिसतो, तसेच उद्या, तसंच एक महिन्यानी, तसंच एक वर्षानी आणि तसंच वर्षानुवर्ष दिसण्याची इच्छा, कधी स्पर्धेत बदलते आणि किती मानसिक त्रास देऊ शकते हे इंडस्ट्रीतल्या मैत्रिणी कुणाला सांगू शकत नाहीत.

आपण छान दिसावं हे स्वत:वरचं प्रेम, ‘काहीही होवो, तुला छान दिसलंच पाहिजे’, इथपर्यंत पोचत असेल, तर आपल्या ‘असण्याचं’ महत्त्व संपून केवळ आपल्या ‘दिसण्यापर्यंत’ गरज थांबलीये, हे स्वत:पुरतं नक्की करावं का? एकदा गरज कुठे थांबलीये हे कायमस्वरूपी मान्य केलं, की आयुष्य सोपं होतं. कारण त्याचा भाग व्हायचं की नाही हा निर्णय पटकन घेता येतो. एक मात्र नक्की, की ‘कान्ट हेल्प इट, ही इंडस्ट्रीची गरज आहे’ असं अर्धसत्य सांगून इतर मैत्रिणींची दिशाभूल करू नये. इंडस्ट्रीची ही गरज व्हावी यासाठी आम्हीही आमचा आमचा वाटा टाकलाय, हेही त्यापुढे सांगावं.

पण तरी राहून राहून माझ्या मैत्रिणींना मला मनापासून हेही सांगावंसं वाटतं, की कुठलीही गोष्ट अगदी पॅशनेटली करत असू, तर आपले फक्त डोळे सगळं काही काम करतात. कारण कामातली पॅशन, ती करण्याची जबरदस्त इच्छा, ते काम करतानाचा वेग, उत्साह हे फक्त आणि फक्त तुमच्या डोळ्यातून दिसतं या मताची मी आहे.

शिवाय खूप लोकांनी आपल्याला ओळखावं ही इच्छा असण्यापेक्षा, खूप लोकांनी आपल्याला आपल्या कामामुळे ओळखावं, ही इच्छा मेंदूवर काम करायला भाग पाडते. या दोन वाक्यांत प्रचंड फरक आहे. आपली बुद्धी आपली समज यावर तुफान मेहनत घेतली, तर वयाच्या सीमांमध्ये पाय अडकणार नाही.

दिसणं, सौंदर्य याची परिमाणं वेगवेगळी असतात; पण दिसण्याला महत्त्व असणाऱ्या इंडस्ट्रीत याची परिमाणं कुणीतरी एकानंच ठरवलेली असतात, सेल्फ एस्टिम वगैरे असे भावनिक प्रकार बाजूला ठेवत अनेक जण त्या एकानं सांगितलेल्या फॉर्म्युल्यामध्ये स्वतः सिद्ध करत असतात. खरंतर त्यांचंही कौतुकच आहे. एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला बदलणं यासाठीही मेहनत लागते.

ज्या मुली या सगळ्याकडे बघून ‘वॉव मी पण का नाही तिथे’ असं मनातल्या मनात म्हणत असतील, त्यांना एवढंच सांगीन की, आपलं यश समोरच्याच्या तराजूत ठेवून मोजू नका. तात्पुरती काळाची गरज भागवण्यापेक्षा, काळात बदल घडेल असं काही करण्याचं स्वप्न बाळगा. मग बघा, तुमचे डोळे जे बोलतील ते जगातलं कुठलंच प्रोडक्ट कुणाच्याच चेहऱ्यावर दाखवू शकणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com