esakal | ‘पॉवर’ पॉइंट : हृदय-संवाद I Power Point
sakal

बोलून बातमी शोधा

Letter

‘पॉवर’ पॉइंट : हृदय-संवाद

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

प्रिय मैत्रीण,

आज म्हटलं, तुझ्याशी पत्रातून बोलावं. फक्त तुझा माझा संवाद. असा संवाद ज्यावर हृदय चिकटवायला, अंगठा दाखवायवा कुणीही नको. काय बाकी मुहूर्त बघ आपल्या गप्पांचा. ज्या दिवशी वाटलं, तुझ्या घालमेलीवर, अस्वस्थतेवर थोडी फुंकर मारावी, त्या दिवशी, तर तुला मखरात बसवलं असेल नाही का? काही काळासाठी तू किती सर्वशक्तिमान वगैरे आहेस यावर गप्पा रंगल्या असतील. मग आपला संवाद कसा होणार?

अगं, पण येत्या रविवारी एक विशेष दिवस आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित. घरी सांगितलंस का गं, त्या दिवशी चारचौघात एकदम चिडलीस त्याची कारणं? नाही, कारण घरचे बोलत होते तुझ्याबद्दल नंतर.. म्हटले- ‘‘हिला कुठे काय बोलावं या वेळ-काळाचं भानच नाही.’’

बोलायला हवं होतं त्यावेळी नेमकी शब्द जुळवण्यात गुंतलीस बघ तू. आणि वेळेची गाडी चुकली. पण तू काळजी करू नकोस. तालाची अर्धी मात्राही चुकवणार नाहीस, आणि कुठल्याही मात्रेवर सुरुवात केलीस तरी सम हलवणार नाहीस, अशीच तू मला माहिती आहेस. त्यामुळे तुला ‘काळ-वेळेचं भान नाही’ यावर माझा विश्वास नाही.

तुला पूर्ण समजूनही घेता येत नाही. बरं, जितकी समजलीस तेवढीही झेपणार नाहीस, अशी घरच्यांसाठी तू झालीयेस. आता चिडलीस तू माझ्यावर. अगं, पण परवा एका लग्नात, उघड्या कपाळानं ओटी भरायला गेलेल्या तुझ्या काकूला माईनं जोरात बाजूला सारलं. त्यावेळी घरच्यांना नेमकं काय पेलवलं नाही, ते पाहिलं ना मी माझ्या डोळ्यांनी.

पण तू स्वत:ला एकटं समजू नकोस. तू पाय रोवून तिथेच उभी राहा. तशी राहिलीस, की ते वाट बघतील तुझा दगड होण्याची.. तुला शेंदूर फासण्याची. पण तू मोठ्ठा वटवृक्ष हो.. ज्याच्या फाद्यांमध्ये तुझ्यासारख्या असंख्य जणींना पहुडता येईल. जो एका नजरेत मावणारच नाही मुळी. जो प्रत्येकाच्या वळणावरची न पुसता येणारी खूण असेल. ज्याची मुळं पसरत पसरत तुझ्याच घराच्या जमिनीला उंचवटा आणतील. त्यात त्यांचा पाय अडखळेल, तेव्हा त्यांना तू जाणवशील.

एकेकाळी रात्रीत सोसावे लागलेले घाव विसरू नकोस. पानपानभर लांबलचक गणितं हौसेनं सोडवायचीस, तसे या घावांचे लांबलचक हिशेबही जरूर चुकते कर. पण म्हणून रात्रीला दोष देत बसू नकोस. स्वत:कडे प्रेमानं बघितलंस की हरवलेला प्रत्येक क्षण कुठेतरी दुसरीकडे सापडले तुला.

कुणीतरी रात्रभर जागून तुझाच विचार करत बसावं, अशी आहेस तू. फक्त निवडीचं स्वातंत्र्य तुझ्याच हातात ठेव. तू दुसऱ्याची निवड बनून फरफटू नकोस. तू एखाद्यासाठी सूर्योदय आहेस, तू एखाद्यासाठी हक्काची सावली.. एखाद्यासाठी तू कुणीच नाहीएस, हे बघण्यापेक्षा ज्यांच्यासाठी तू महत्त्वाची आहेस अशांसाठी जग.

परवा मोठ्या तोऱ्यात म्हटलीस, ‘‘पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली आणि अखेरीस माईच्या हातून तुझ्या हातावर टेकवलेली नथ नको मला. नाकासाठी जड होईल.’’ तीच नथ लगेच धाकटीच्या हातावर टेकवलीस मग. पिढ्यान्‌पिढ्यांचं प्रेम पुढे नेलंस, न झेपणारी झूल तिथेच काढलीस. छान वाटलं मला हे बघून.

बाकी ही मखर आजच्यापुरतीच हं. उद्यापासून पुन्हा बोलता येईल तुला. चारचौघात एकदम चिडताही येईल तुला, हवं तेव्हा पानं सळसळवता येतील, घावांचे राहिलेले हिशेब घेता येतील, उघड्या कपाळी बिनदिक्कतपणे उभं राहता येईल. झालंच नव्याचे नऊ दिवस..थोडाच वेळ अजून...

तुझीच...

loading image
go to top