esakal | ‘पॉवर’ पॉइंट : नाती आणि सहजीवन
sakal

बोलून बातमी शोधा

Relation

‘पॉवर’ पॉइंट : नाती आणि सहजीवन

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

नात्याचं नाव बदलून प्रेम, कमिटमेंट, जबाबदाऱ्या बदलत नाहीत. फार फार तर त्याची कायदेशीर चौकट बदलू शकते; पण प्रेम, बांधिलकी त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्या या स्वीकारायची तयारी एकतर असते किंवा नसते. फक्त प्रेम आहे, जबाबदारी नकोय, किंवा फक्त जबाबदारी घ्यायला तयार आहे प्रेम नाहीये, हे असं मधलं काही असेल तर त्या व्यक्तींचा सहवास फारसा प्रामाणिक राहत नाही. आज हे का बोलतीये, माहीत नाही. लग्नसंस्थेवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्यांना कदाचित पटणारही नाही. त्याच्या तात्त्विक मुद्द्यांत मला शिरायचंही नाहीये. आजूबाजूला जे दिसतंय, त्यातून मला जितकं आकलन होतंय, ते मैत्रिणींशी फक्त शेअर करायचंय.

आपल्यासोबत असणारी व्यक्ती पुढेही सोबत कायम असेलच, याची शाश्वतीही नसताना लोक एकत्र राहतात. माझा एक खूप चांगला मित्र त्याच्या घटस्फोटानंतरही त्याच्या ‘एक्स’ बायकोसोबत हल्ली पुन्हा राहतोय. कारण तिचा एकटेपणा त्याला बघवत नाही. फार लांबची स्वप्नं बघताना अनाठायी अपेक्षा झाल्या. त्यातून नात्याची कायदेशीर चौकट मोडली. कायदेशीर चौकट मोडल्यानंतर निम्म्या अपेक्षा, ताण दूर झाल्याचा फील आज दोघांनाही आहे. आज एकमेकांच्या एकटेपणाचा, मानसिक, शारीरिक गरजेचा विचार ते दोघं जास्त भान ठेवून करू शकतायत. तो मला म्हटला, ‘‘अगं, कायद्याच्या चौकटीत नाती उमलतीलच असं नाही.’’ लक्षात घ्या, ही त्याची निवड आहे. आज त्यांच्या नात्याला काय नाव देणार? मी आधीही म्हटलं होतं, नात्यांमध्ये चूक-बरोबर असं काही नसतं. कोण, कधी, कुठल्या वेळी, कुठल्या बाजूनं ते नातं अनुभवतो, त्यानुसार परसेप्शन बदलतं.

अजून एक उदाहरण. एकमेकांच्या स्वभावावरून टोकाचे मतभेद झालेलं एक दाम्पत्य. नातं अगदी ब्रेकिंग पॉईंटला आल्यावर थोडं डोकं शांत ठेवून त्यांनी एकमेकांकडे बघितलं. एकमेकांकडे असं तटस्थपणे पाहून वर्षं लोटली. मैत्री, प्रेम, लग्न, मुलं, संसार या क्रमात अडकल्यावर एकमेकांची अती-ओळख झाली. ‘‘...पण आज तुझ्याकडे अनोळखी नजरेनं पाहिलं, तर तू पुन्हा आवडतीयेस,’’ हे त्याचे शब्द त्यांचं नातं टिकवून गेले. एकमेकांच्या स्वभावावरून केलेला त्रागा. उठलेली वादाची वादळं शमण्याची शक्यता निर्माण झाली. या तटस्थ दृष्टिकोनातून नैतिक-अनैतिकच्या व्याख्याच बदलतील असं दोघांनाही कधी वाटलंच नव्हतं.

मुद्दा एवढाच आहे, की दोन्ही ठिकाणी ताण नात्याचा किंवा व्यक्तीचा कधीच नव्हता. नातं ज्या चौकटीत बांधलंय त्या चौकटीचा ताण होता. लग्न केल्यावर मुलगा/मुलगी सुधारेल ही खात्री अनेक पालकांना असते. काहींच्या बाबतीत हे खरंही होत असावं; पण त्याच चौकटीत नातं घुसमटूही शकतं ही बारीकशी शक्यता अनेकदा तेच पालक डोळेझाक का करतात? नात्यांना नावं देण्याची घाई का होते?

शेवटी सहवास महत्त्वाचा. एखादी व्यक्ती एकेकाळी आपल्यासोबत होती, या कल्पनेत रमून आजही आजन्म तिचा सहवास अनुभवणारे आहेत. ओंगळवाण्या भांडणाचा काळ वगळला, तर ती मला आवडतच होती, ‘कट-पेस्ट’सारखा मधला काळ डिलीट केला, तर आजही कदाचित ती मला नव्यानं भेटली तर आवडू शकेल, या सहवासाची स्वप्नं पाहणारेही लोक आहेत.

त्यामुळे कंटाळा, त्रास, चिडचिड त्या सहवासाची होत आहे, की सहवासाला कुंपण घातलेल्या चौकटीची हा विचार दोघांनी करावा. मानवी संबंध अतिशय गुंतागुंतीचे असतात. चार ओळींत शक्यता लिहून त्या प्रत्येक कोमेजलेल्या नात्याला लावता येणार नाहीत हे मान्य; पण हजार शक्यतांमधली ही एक शक्यता असू शकते ना?

loading image
go to top