‘पॉवर’ पॉइंट : ज्याचा त्याचा ‘गोतावळा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relations

‘पॉवर’ पॉइंट : ज्याचा त्याचा ‘गोतावळा’

‘आमच्या घरात नातेवाइकांचा फारच गोतावळा आहे,’ ८० टक्के घरातल्या कार्यांमध्ये आपण हे वाक्य ऐकतो. अनेक घरात स्त्री-पुरुष या ‘गोतावळ्याचं’ प्रेशर घेऊन अधिकच्या दहा गोष्टीही करत असतात. हा गोतावळा शब्द मला फार आवडतो. घर भरल्याभरल्यासारखं वाटतं. मी एकत्र कुटुंबात बरीच वर्षं वाढल्यामुळे ‘घर भल्यागत असणं चांगलं’ ही आजीची शिकवण. कुणीही उठून कितीही वाजता घरात यावं, घराचे दरवाजे फक्त रात्रीच बंद व्हावेत, गॅसवर चहाचं एक भांडं सदैव उकळतच असावं, भांड्याच्या गडद होत जाणाऱ्या काळवंडलेपणातून गोतावळा किती वाढत गेला, याची जाणीव व्हावी, अशा वातावरणात वाढलेल्यांना मी काय म्हणतीये हे कनेक्ट होईल.

गंमत बघा, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा गोतावळा बदलत जातो. कारण आपण बदलत जातो; पण जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत सोबत असणाऱ्या गोतावळ्यामध्ये एका हाताच्या बोटावर मोजल्या जातील एवढ्याच व्यक्ती असतात- ज्या कायम सोबत असतात. शाळेत ग्रुप तुटूच नये वाटत असताना, कॉलेजात ग्रुप मोठा होतो. आधीच्या व्यक्ती काहीशा लांब गेल्याची दुखरी भावना मनात लपवत आपण पुढच्या पुढच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात जोडत जातो. शाळा, कॉलेज, नोकरी, लग्न, मूल या समाजानं लावलेल्या चढत्या क्रमात आपण इतके बदलत जातो, की आपल्याप्रमाणे चढत्या क्रमाचा स्पीड मॅच न झालेल्या व्यक्ती आपल्या गोतावळ्यातून दूर होत जातात.

नवीन देशात, किंवा नवीन शहरांत आल्यावर तर स्वत:हून असा गोतावळा तयार करावा लागतो. पण यावेळी आपण प्रॅक्टिकल झालेलो असतो. किती गुंतायचं हे आपल्याला चांगलं कळलेलं असतं. मग आपण हे गोतावळे स्मार्टली हँडल करायला लागतो. समोरची व्यक्ती आपल्यासोबत आत्ता आहे, दोन वर्षांनी असेलच असं नाही, हे मनाला आधीच पटलेलं असतं. त्यामुळे नात्यांची घट्ट वीण असतानाही, एक धागा आपण समजुतीनं आधीपासूनच सैल ठेवलेला असतो. अगदी आपल्याही नकळत.

आता हे सगळं मी का बोलतीये असं तुम्हाला वाटत असेल. तर परवा एक मैत्रीण फोनवर बोलता बोलता सांगत होती, ‘अगं, काय माहिती काय होतं, नातेवाईकांचे, मित्र-मैत्रिणींचे एवढे ग्रुप्स झालेत; पण स्वत:हून उठून त्यांच्यासाठी झोकून देऊन काही करावं असं हातून घडतंच नाही गं फार.’ तेव्हा तिला समजावताना (फुकटचा सल्ला देताना!), मला हे सगळे विचार मनात आले. एका पायरीवरून पुढे जाताना आपल्यातही खूप बदल झालेला असतो. प्रत्येक वेळी विविध नात्यांसाठी झोकून देऊन हातून काही घडेल असं नाही. आणि अशी सतत अपेक्षा स्वत:कडून करण्यालाही काही अर्थ नाही. सतत गोतावळ्यात राहायला आवडणाऱ्या व्यक्तींनाही, काही काळानंतर, एक हात लांब राहून त्याकडे बघायला आवडू लागतं. यात काही गैरही नाही. माणूस समाजप्रिय प्राणी असला तरी तो सतत गोतावळ्याचा भाग होऊ शकत नाही. याला उद्धटपणा किंवा आपल्या माणसांची किंमत नाही, अशा अर्थानं मी बघत नाही. तर मला हा समंजसपणा वाटतो. खूप माणसांत असूनही, वाढत्या अनुभवांतून,आपल्या पायाखालची चौकट फारशी न सोडण्याचा समंजसपणा यायला लागतो, तेव्हा गोतावळा अधिक हवाहवासा वाटू लागतो आणि त्याचा जाच कमी होऊ लागतो.

loading image
go to top