esakal | ‘पॉवर’ पॉइंट : स्ट्रगल सांगण्यातला किरकिरेपणा...
sakal

बोलून बातमी शोधा

Struggle

‘पॉवर’ पॉइंट : स्ट्रगल सांगण्यातला किरकिरेपणा...

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

तिला सहज विचारलं होतं, की ‘अगं आज पोचायला उशीर झाला का गं?’ आणि ती घडाघडा ‘सकाळी उठल्यापासून कसं घरचं करून, कसं घाईघाईत आवरून, कसं गर्दीतून यावं लागलं’ याचं रसभरीत वर्णन करायला लागली. मी आतून भयंकर वैतागले होते; पण मला तिला थांबवता येईना. माझ्या शेजारची २-४ माणसंही मग तिच्या या ‘स्ट्रगल’ची गोष्ट ऐकण्यात मश्गूल झाली. तिलाही छान वाटायला लागलं. आणि मग तिचं हे रोजचंच रुटिन झालं. कुठूनही आली की ‘अगं कसं झालं ना...’ असं म्हणून तिचा तोंडाचा पट्टा जो सुरू व्हायचा, तो २-४ माणसांचं लक्ष वेधल्याशिवाय, किंवा ‘अरेरे’ हा शब्द समोरच्याच्या तोंडून येत नाही तोपर्यंत सुरूच राहायचा.

अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला अनेकदा दिसतात. त्यांचा ‘व्हिक्टिम मोड’ सतत ऑन असतो. ‘‘मी कशी झुंज देतीये’’ याची गोष्ट सांगायला त्यांना फार आवडतं; पण खरंतर पठडीपेक्षा वेगळं असं फार काही त्या करत नसतात. रोजच्या रुटिनमध्ये स्ट्रगल करावा लागेल असे प्रसंग जनावरांपासून माणसांपर्यंत कुणालाही चुकले नाहीयेत. मग आपल्या रुटिनचा भाग असणाऱ्या गोष्टींना ‘स्ट्रगल’चं लेबल लावून या व्यक्ती काय साध्य करू पाहतात?... कदाचित अशा व्यक्तींना व्यक्त होण्यासाठी आजूबाजूला खरंचच कुणीच नसावं किंवा आपला स्ट्रगल ऐकल्याशिवाय समोरच्याला आपल्याप्रती आदरभावना निर्माण होणार नाही, असा त्यांचा कयास असावा.

‘अगं, आज सकाळी साडीवरची मॅचिंग टिकली मिळत नव्हती. मग मला किती वेळ शोधावी लागली,’ इथपासून ते, कसा स्वयंपाक करताना बोट चिरलं, कसं बस-ट्रेन-रिक्षा पकडण्यासाठी धावावं लागलं, कसं मी भरभर चालले, कसं गाडीतलं पेट्रोल संपलं होतं, अशा कोणत्याही साध्या गोष्टींना सजवून सांगणं. बरं सांगतानाही त्यात स्ट्रगल शोधणं, हे हस्यास्पद असतं. यातली काही कारणं मुलांसाठीही लागू आहेत. म्हणजे उद्या खरंच यांच्यावर दुर्गम गावातून शहरांत येऊन दोन वेळच्या जेवणासाठी लढण्याची वेळ आली असती, किंवा तत्सम ‘खरा’ स्ट्रगल यांच्या डोक्यावर आला असता, तर त्यांनी कसं आकाश पाताळ एक केलं असतं, या विचारांनीही माझ्या अंगावर काटा येतो.

शेवटी कसंय ना, सतत स्वत:ला ‘व्हिक्टिम मोड’मध्ये ठेवलं तर कालांतरानं आपलं हसं होतं. लोक चेष्टा करायला लागतात. गोष्टीतला चमचमीतपणा चिरकाळ टिकत नाही. पटत नसणाऱ्या गोष्टींना स्वत:च्या निर्णयांनी बदललं, तर त्याचा ढोल वाजवायची गरज पडत नाही. पाहणाऱ्याला आपल्यातला समजूतदारपणा किंवा संघर्ष आपसूक समजून जातो. कौतुकासाठी आसुसलेल्या मुलींची मानसिकता मी समजू शकते; पण त्यासाठी स्वत:ची प्रत्येक कृतीच कौतुकास्पद ठरावी हा अट्टाहास सोडून द्यायला हवा भरल्या घरात, सुरक्षित चौकटीत राहणाऱ्या मुलींना प्रॉब्लेम नसतात असं नाही. स्ट्रगल प्रत्येकीचाच तिच्यातिच्यापुरता मोठा असतो; पण तो व्यक्त करताना कुठे थांबावं हे कळलं पाहिजे.

आपणच निवडलेल्या गोष्टी आपल्यासाठी ‘स्ट्रगल कथा’ होत असतील, तर आपली निवड चुकतीये, हे निश्चित धरून त्यावर सोल्युशन काढावं. नाहीतर रोज त्याच त्याच गोष्टींचा चोथा करून शेवटी दुसऱ्याच्या नजरेत स्वतच्या व्यक्त होण्याला किरकिरेपणाची झाक कधी येते कळतही नाही.

loading image