‘पॉवर’ पॉइंट : डिटॅच होताना घाई नको... | Detached | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पॉवर’ पॉइंट : डिटॅच होताना घाई नको...
‘पॉवर’ पॉइंट : डिटॅच होताना घाई नको...

‘पॉवर’ पॉइंट : डिटॅच होताना घाई नको...

‘मी आता त्याच्यात गुंतणार नाहीये. झालं तेवढं पुरे झालं,’ असं जवळपास ओरडत ती सांगत होती. त्याचवेळी खरं तिला समजावत होते, की ‘अगं, तू असं कितीही म्हटलीस, तरी परत तू त्याच्यात अडकणारच आहेस. इतके वर्षं तेच तर होत आलंय. त्यामुळे आता तुझे शब्द आणि तुझी कृती यांच्यातला विरोधाभास तुझा तुला कळला तरी पुरे.’ मात्र, ती ठाम होती. मग एकदम मला असं जाणवलं, की जो आपल्याला विरोधाभास वाटतोय, तो तिच्यासाठी खूप मोठा स्ट्रगल आहे. जी गोष्ट मला सोपी वाटतीये, ती हाताळताना तिची होणारी धडपड मला दिसत का नाहीये?

एखाद्या गोष्टीपासून, व्यक्तीपासून, प्रसंगापासून स्वत:ला परावृत्त करणं, डिटॅच करणं, खऱंच सोपं असतं का? काही माणसं पटकन ‘स्विच ऑफ’, ‘स्विच ऑन’ होऊ शकतात. वैयक्तिक मी पटकन कुणापासून ‘स्विच ऑफ’ होऊ शकते. म्हणजे हा दुर्गुणच असावा; पण अनेकदा त्याचा मला फायदा होतो म्हणून मी हा दुर्गुण असूनही जपलाय.

तरीदेखील हेही तितकंच खरंय, की ‘स्विच ऑफ’ होण्याची प्रक्रिया फास्ट असली, तरी कुठेतरी पीळ बसतोच. प्रेम करण्यासाठी जितक्या तीव्रतेनं, म्हणजे पॅशनेटली, प्रयत्न झालेत, अगदी तितकीच शक्ती लागते त्या व्यक्तीमधून, प्रसंगामधून बाहेर पडण्यासाठी. एखाद्यापासून डिटॅच होण्याची प्रक्रिया फार त्रासदायक असते. त्यात आपण कुणाला दूर केलं असेल, तर पावशेर गिल्ट फिल आपल्याच माथ्यावर साचलेला असतो आणि आपल्याला कुणी दूर केलं असेल, तर मधूनच चुकून आपल्याकडून अगतिकता दाखवली जाणार नाही ना, याचा ताण असतो.

माझं तर असं हजारदा झालंय. माझ्या डोळ्यासमोर बाजूला सारलेलं दिसत असतं. बुद्धीला पटत नसतं; पण मनानं अजूनही त्या नात्यांमध्ये अडकल्यानं उगाच समंजसपणाही डोकावत असतो. ‘आपलीच माणसं, मग कसा सेल्फ एस्टिम, अन् कसलं काय’ असा नको तितक्या चांगुलपणाचा मनाचा सल्ला घेऊन मी पुन्हा पाटी कोरी करायला घेते; पण पाटी कोरी करण्याची गरज फक्त आपल्यालाच आहे, हे पुनःपुन्हा अधोरेखित होतं. त्यामुळे नातं एकतर मनानी टिकवावं, नाहीतर बुद्धी वापरून पुढे न्यावं. प्रत्येक नातं टिकवताना, आपली बुद्धी आणि मन हातात हात घालून असेलच असं नाही.

‘बास. आता याच्यापुढे मी धावू शकत नाही,’ असं आपण आपलं ठरवल्यानंतर खरंतर मोकळं वाटायला पाहिजे; पण अनेक मैत्रिणींचा खडतर मानसिक प्रवास कदाचित या पॉईंटपासून सुरू होत असेल. समोरची व्यक्ती आपल्याशी कितीही वाईट वागली, तरी आपल्याला प्रेमाचे उमाळे येण्याचं कारण काय? या प्रश्नाचं खरंचच उत्तर नाही. उपजत चांगुलपणा कधी कधी आपल्यालाच नडतो, त्यातलाच हा प्रकार.

मुद्दा एवढाच आहे, की ‘तू काय परत बोलायला जाशीलच,’ अशी एखाद्या बाबतीत खात्री बाळगण्याआधी दहा वेळा विचार करायला हवा. समोरची व्यक्ती कुठल्या नात्यामधून बाहेर पडू इच्छित असेल आणि ते तिला अवघड जात असेल, तर तिच्या मानसिक घालमेलीवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक जण आपल्याला हव्या त्याच गतीनं डिटॅच होऊ शकत नाही. त्यामुळे ‘तू असलीच आहेस,’ हे वाक्य पूर्णविरामासारखं फेकून विषय सुटणार नाही. नाही का?

loading image
go to top