‘पॉवर’ पॉइंट : अपेक्षांचा ‘पोखरणारा’ डोंगर

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात लहानाचं मोठं होताना असे हजार प्रसंग येतात जेव्हा वाटतं, ‘अरे, यात अडकून माझा वेळ आणि शक्ती दोन्ही वाया जातंय.’
‘पॉवर’ पॉइंट : अपेक्षांचा ‘पोखरणारा’ डोंगर

ठरवून एखाद्या गोष्टीतून, व्यक्तीतून, परिस्थितीतून मन काढून घेणं ही खरंच म्हणावी तेवढी सोपी गोष्ट नसते. कधी इच्छा नसताना नात्यातून बाहेर पडावं लागतं, तेव्हा होणारी वेदना कदाचित आयुष्यभराची बोच देते; पण कधी उलटही होऊ शकतं. एखाद्या गोष्टीत गुंतलेलं मन काढून घेतलं, तर मिळणारं समाधान, मन:शांती अमर्याद असू शकते.

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात लहानाचं मोठं होताना असे हजार प्रसंग येतात जेव्हा वाटतं, ‘अरे, यात अडकून माझा वेळ आणि शक्ती दोन्ही वाया जातंय.’ माझ्या ओळखीच्या अशा अनेक मैत्रिणी आहेत, ज्या माझ्यापेक्षा वयानं जवळजवळ १५-२० वर्षांनी मोठ्या आहेत. म्हणजे त्यांच्या अनुभवांचा अंदाज येण्यासाठी वय सांगतीये. तर अशा माझ्या अनेक मैत्रीणी बऱ्याचदा त्यांच्या मुलांच्या संसारात एवढ्या गुंग असतात, की त्यामुळे सुरू झालेलं ‘नात्यातलं राजकारण’ रोज त्यांचं डोकं पोखरत असतं.

आपण कुणी संत नाही. ‘मला सगळीकडे बोलवलं पाहिजे’, ‘माझी काही किंमत आहे की नाही?’, ‘मला टाळून हे सगळं कसं काय होतंय’ हे विचार अगदी नैसर्गिक आहेत. त्यात गैर काही नाही; पण ते तितकेच घातकही असतात. बरं, हे विचार स्वत:च्याच डोक्यात असतात तोपर्यंतही ठीक; पण हे समोरच्याच्या डोक्यावर थोपवले गेले, तर आपल्यामुळे कुणावर तरी ‘मॉरल प्रेशर’ तयार होतं याचंही भान ठेवलं पाहिजे.

नात्यांत एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, थोडी जास्त जवळीक असण्याची झालेली सवय, यामुळे हळूहळू आपल्याला आता ‘सामावून घेतलं गेलंय’ ही भावना सुंदर असते. मोठ्या कुटुंबात किंवा मित्र-मैत्रिणींच्या प्रचंड घोळक्याचा आपण ‘गाभा’ आहोत ही भावनाही सुखावणारी असते; पण परिस्थिती नेहमी तशीच राहत नाही. समोरच्याच्या गरजांप्रमाणे आपल्याला ‘सामावून घेणं’ बदलू लागलं, की त्या क्षणी त्यातून काढता पाय घेण्यात मला शहाणपण वाटतं. मी स्वत: हे माझ्याबाबतीत अवलंबवायचा अनेकदा प्रयत्न केलाय.

कुठलंही नातं टिकवायला, ते फुलवायला एक ठरावीक वेळ द्यावा लागतो. पहिल्या भेटीचं रूपांतर कितीही वेळा सततच्या भेटीत झालं, तरी एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास निर्माण व्हायला जो वेळ लागतो तो लागतोच. या प्रोसेसमध्ये अशी एक स्टेज असते, जेव्हा आपण एकमेकांचे अगदी खोल खोल जिगरीही नसतो; पण अगदी परकेही नसतो. अशा स्टेजला नातं असताना ‘सामावून घेण्याच्या’, ‘एकरूप होण्याच्या’ अपेक्षा न्यूट्रल राहतायत, की वाढतायत त्यावर त्या नात्याचा जीवही अवलंबून असतो.

पटकन् हक्क दाखवण्याची आपली सवय दुसऱ्याकडून त्याच प्रेमानं स्वीकारली जाईल असं नाही. त्यामुळे नव्याची नवलाई संपल्यानंतर नातं मुरण्यापर्यंतच्या मधल्या काळात पाण्यात पूर्ण स्वतःला झोकून न दिलेलं बरं. किंवा याच काळात स्वत:च्या अपेक्षांवर ताबा ठेवण्याची प्रचंड गरज असते. बहरलेल्या नात्यांचं आपण स्वत:ला मूळ समजत असतो; पण कदाचित समोरच्यासाठी ते ‘फारच घट्ट पकडून ठेवलंय’ असा तक्रारीच्या स्वरातही बदलू शकतं.

आज तुम्हाला हेच सांगावसं वाटलं, की मोकळेपणानं, भरभरून प्रेम जरूर करावं. अनेक नाती जोडावीत. भरपूर मित्र-मैत्रिणी जमवावेत; पण या सगळ्यांनीही त्याच तीव्रतेनं आपल्यावर प्रेम करावं असा अपेक्षांचा डोंगर तयार होत असेल तर वेळीच तो डोंगर उतरायला सुरूवात करावी. खरंच ते नातं आपलं होणार असेल, खरंच आपण त्या व्यक्तीचे होणार असू, तर काहीही प्रयत्न न करताही कुठल्याशा वळणावर तीव्रतेनं एकमेकांना भेटूही. तोपर्यंत अपेक्षांच्या डोंगरावर उभं राहून स्वत:ला मानसिक ‘पोखरणं’ बंद करावं.. नाही का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com