‘पॉवर’ पॉइंट : प्रेम आहे की नाही ? Love | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

love
‘पॉवर’ पॉइंट : प्रेम आहे की नाही ?

‘पॉवर’ पॉइंट : प्रेम आहे की नाही ?

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

परवा मला मोबाईल ॲपवर एका लेखाचं नोटिफिकेशन आलं. लेख होता जोडीदाराबाबत. ‘तुमचा जोडीदार तुमच्यावर मनापासून प्रेम करतोय हे ओळखण्याची ७ लक्षणं.’ ‘सर्वाधिक वाचनात आलेला लेख’ असं लेबल तिथे लटकवलं होतं. ‘हा लेख वाचून डोळे उघडले’ वगैरे असं सांगणाऱ्या काही स्त्रियांच्या कमेंट्स त्याखाली होत्या. आश्चर्यच आहे ना! ज्या जोडीदाराबरोबर दिवस-रात्र काढूनही त्याचं प्रेम खरं आहे की नाही हे कळत नसेल, ते ३०० शब्दांत मांडणारी ही काय जादू असेल? नात्यातलं प्रेम ओळखणारे हे रेफरन्सेस कोण, कुठून, कसे शोधत असेल?

लेखातला पहिलाच मुद्दा होता : ‘जेव्हा तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काहीही करायला तयार असेल’. तिथेच एकतर मी कपाळावर हात मारला. दुसरा मुद्दा होता, ‘जेव्हा तुमचा जोडीदार त्याच्या आयुष्यातली अगदी प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत असेल.’ आता मला आयडिया आली, की नव्याच्या नऊ दिवसांत जगणाऱ्या व्यक्तीनं हा लेख लिहिलाय. मग बाकी लेखानं माझी पुढची २ मिनिटं मजेत गेली. ‘जेव्हा फक्त तुम्हीच त्याची प्रायोरिटी असाल, काहीही घडलं तर पहिल्यांदा तो/ती तुमच्याकडेच येईल वगैरे वगैरे.’

हा लेख लिहिलेल्या व्यक्तीचा जोडीदार जर खरंच असं वागत असेल, तर तो जोडीदार बिचारा किती तणावात असेल, हे चित्र अगदी डोळ्यासमोरून आलं. मजेचा भाग सोडा. नंतर विचार करताना वाटलं, की माझ्या मैत्रिणी हे वाचून कुठल्याशा सिंड्रेलाच्या जगात तर रमणार नाहीत ना?

माझ्या पार्टनरचा आणि माझा एका गोष्टीवर विश्वास आहे, की लग्नाआधीचं नातं एकमेकांची सर्वाधिक आकर्षक बाजूच दाखवत असतं; पण एकमेकांची काहीशी काळोखी, फारसा अभिमान वाटणार नाही अशी बाजू ‘लग्न’ दाखवतं. त्या ‘आकर्षित होऊच शकणार नाही’ अशा बाजूला आपलंसं करण्याची तयारी आपल्याकडचं कुठलंही शिक्षण देत नाही.

प्रेम आहे की नाही हे ओळखणारं कुठलं ‘२१ अपेक्षित’ नसतं. जाणीवेच्या पातळीवर अनुभवायची ही गोष्ट. आणि आत्ता जाणवत असलेलं प्रेम अजून काही वर्षांनी जाणवेलच याची शाश्वती वरून बह्मदेव आला तरी देऊ शकत नाही. मग इतक्या नाजूक भावनेचे असे रेफरन्सेस गोळा करून चांगलं नातं कैदेत का घालवायचं? आयुष्यातली प्रत्येक गोष्ट माझ्या जोडीदारानं मलाच सांगितली पाहिजे, हा अट्टाहास कशासाठी? प्रत्येक वेळी आपणच त्याची प्रायोरिटी असायला हवं, हा आग्रह का? जोडीदारावर मालकी हक्क गाजवण्याची मानसिकता कधी संपणार आहे?

फक्त जोडीदाराशीच बोलायचं, फक्त त्याला/तिलाच प्राधान्य द्यायचं, हे सलग महिनाभर करून बघा. जोडीदारचा उबग येण्याची शक्यताच जास्त. अर्थात ‘उबग आलाय’, हे तुम्ही इतर सामाजिक, नैतिक, लग्नसंस्थेच्या दबावात बोलू शकणार नाही ही गोष्ट वेगळी.

मैत्रिणींनो, स्त्रियांवरच्या बंधनांविरोधात आपण बोलतच असतो आणि बोलायलाच हवं; पण आज दुसऱ्या बाजूनंही एकदा बघू, पुरूष जोडीदारानं सतत प्राधान्य दिलं पाहिजे हा आग्रह एकदा सोडून बघा. शारीरिक आकर्षण तात्पुरतं असतं. मानसिक ओढ, माया, आपुलकी आयुष्यभर टिकते. सतत हक्क दाखवण्याच्या अट्टाहासातून तात्पुरतं सुख आयुष्यभर टिकणारी गोष्ट नाहिशी करेल. प्रेमाची व्याख्या जितकी वास्तववादी कराल, तितकं ते टिकण्याची शक्यता जास्त. बाकी जागतिक पुरुष दिनाच्या सर्व मैत्रिणींनाही शुभेच्छा. आपले बदलते विचार अचूक कळू शकणारे मोजके पुरुष प्रत्येकीच्या आजूबाजुला असतीलच, आज त्यांना प्राधान्य द्या.

loading image
go to top