‘पॉवर’ पॉइंट : नव्या दृष्टीचा अव्याहत प्रवास

‘माझ्या अनुभवातून सांगते’ हे म्हणण्याइतकं माझं वय नाही; पण माझे थोडके अनुभव आणि माझ्या मैत्रिणींचे अनुभव कुठल्याशा बिंदूवर जुळतात ही अफलातून जाणीव या वर्षानं करून दिली.
New Vision
New VisionSakal
Summary

‘माझ्या अनुभवातून सांगते’ हे म्हणण्याइतकं माझं वय नाही; पण माझे थोडके अनुभव आणि माझ्या मैत्रिणींचे अनुभव कुठल्याशा बिंदूवर जुळतात ही अफलातून जाणीव या वर्षानं करून दिली.

रोज जगत असताना दहा जण आपल्याला गृहीत धरतात किंवा आपणही अनेकांना गृहीत धरतो. शेवटी ज्याच्या त्याच्या स्वार्थानुसार जो तो नातं टिकवतो, पुढे नेतो, किंवा पूर्णविरामही देतो. जगण्याच्या अशा गुंत्यातली प्रत्येक भावना खरंच अलगद वेगळी करता येते का? आणि गुंतलेला प्रत्येक धागाच वेगळा करायला गेलो तर किती काय काय बोलता येतं, हे या वर्षानं मला शिकवलं.

‘माझ्या अनुभवातून सांगते’ हे म्हणण्याइतकं माझं वय नाही; पण माझे थोडके अनुभव आणि माझ्या मैत्रिणींचे अनुभव कुठल्याशा बिंदूवर जुळतात ही अफलातून जाणीव या वर्षानं करून दिली. आपले प्रेमाचे, चिडण्याचे, स्वार्थाचे, झोकून देण्याचे बिंदू इतके सारखे असतील, तर आपला पुढे जाण्याचा प्रवासही सारखाच असायला हवा, नाही का? मग काही गोष्टी आता कायमस्वरूपी ठरवूनच घेऊया.

कुणाच्या तरी नजरेत भले असू आपण आक्रमक, याचा अर्थ आपला ठामपणा आपण सोडता कामा नये असा होतो. भले कुणी म्हणो आपल्याला बॉसी; पण आपले नेतृत्वगुण संपले नाही पाहिजेत. कदाचित अनेकांना आपल्यासमोर अवघडलेपण वाटेल; पण तोंडावर खरं बोलण्याची ताकद आपण गमावली नाही पाहिजे. भले समाज म्हणो आपल्याला अती; पण आपलं अवकाश व्यापेपर्यंत पूर्ण शक्तीनं झोकून देऊया. त्यामुळे येणाऱ्या वर्षातच नाही तर पुढच्या अनेक वर्षात लोकांना खूश करायला धावायला नको हे आत्ताच एकमेकींना सांगूयात.

नव्या वर्षात ठरवून स्वत:ला आरशात न्हाहाळा. डोळ्यात डोळे घालून बघा. पाणी दाटून येईल, अस्वस्थ वाटेल; पण जे स्वत:च्या डोळ्यात वाचाल ते तुमचे अनुभव असतील. त्यावर विश्वास ठेवून जर स्वत:च्या नजरेला नजर भिडवू शकलो तर जगात कुणाच्याही डोळ्यात डोळे घालून संवाद साधू शकू.

मला आशा आहे, आपल्या वर्षभराच्या संवादानं किमान आपण स्वत:कडे प्रेमानं बघायला शिकलो असू.. सगळ्यांना आवडणारी, सगळ्यांना पटणारी असं मुळात व्हायचंच नाहीये. स्वत:ला मी पटले पाहिजे. आवडले पाहिजे. आणि स्वत:कडे पाहिल्यावर छान वाटण्यासाठी नटण्या मुरडण्याची, भरजरी कपड्यांची, दागिन्यांची गरज नसते.

दिसणं ही फार कमी काळ टिकणारी गोष्ट आहे, व्यक्तिमत्त्व कायमस्वरूपी राहतं. ते वेगवेगळ्या रूपांत राहतं. स्वच्छंदी, मनस्वी, बेधडक असं काहीसं पैसे कमवून मिळत नाही. ते जगतानाच आपल्यात फुलवायला लागतं. त्याचं बीज तरी आपल्यात रुजवूयात.

आपल्यातल्या संवादानं मला काय दिलं? हे विचाराल तर, मला पुन्हा एकदा पहिला दिवस आठवतो. वर्षाच्या सुरूवातीला काय बोलणं झालं आठवतंय? बाण ताणलेला असताना किती जोरात सोडला हे महत्त्वाचं नाहीये. आपण तो ताणलेला बाण किती काळ खेचून धरू शकतो, त्यात आपली ताकद कळते.

मी हा बाण केव्हाचा ताणून धरलाय असं म्हटलं होतं तुम्हाला. कारण त्याच अवस्थेत नव्या शक्यतांचा जन्म होतो. वर्षाअखेरीस हा बाण ताणून धरायला उरात श्वास पुरेल की नाही याची भीती आता मला वाटेनाशी झालीये. कारण आपल्या संवादातून नव्या शक्यतांची कवाडं अजून खुली झालीयेत.

वर्ष संपत आलंय आणि आपल्यातला हा संवादही. आता पुढच्या वर्षापासून हा संवाद नसला तरी स्वतःमधल्या ताकदीची जाणीव तुम्हालाही झाली असेल याची मला खात्री आहे. त्यावर अव्याहत विश्वास ठेवूया. बाकी जगाच्या कोपऱ्यात कुठे ना कुठे मी तुम्हाला सापडेनच. असंच कधी गप्पा माराव्याशा वाटल्या तर...

(हे सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com