esakal | Video : आईशी संवाद : महत्त्व स्तन्यपानाचे
sakal

बोलून बातमी शोधा

breastfeeding

आई व बाळासाठी पहिल्या ६ महिन्यांत फक्त आणि फक्त स्तन्यपान देण्याची पद्धत आणि त्यानंतर २ ते ३ वर्षांपर्यंत वरच्या अन्नाबरोबर सुरू ठेवलेले स्तन्यपान खूप महत्त्वाचे असते. म्हणून याचे महत्त्व आईला बाळाच्या जन्माअगोदरच पटवून सांगणे गरजेचे असते.

Video : आईशी संवाद : महत्त्व स्तन्यपानाचे

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

आई व बाळासाठी पहिल्या ६ महिन्यांत फक्त आणि फक्त स्तन्यपान देण्याची पद्धत आणि त्यानंतर २ ते ३ वर्षांपर्यंत वरच्या अन्नाबरोबर सुरू ठेवलेले स्तन्यपान खूप महत्त्वाचे असते. म्हणून याचे महत्त्व आईला बाळाच्या जन्माअगोदरच पटवून सांगणे गरजेचे असते.

1) सुरुवातीच्या तीन-चार दिवसांमध्ये येणारे दूध : पहिल्या तीन-चार दिवसांमध्ये येणाऱ्या दुधाला कोलोस्ट्रम असे म्हटले जाते. हे दूध स्तनातील नंतर येणाऱ्या दुधापेक्षा अधिक गुणकारी असते. या दुधाची घनता जास्त असते, त्यामुळे थोड्या दुधात बाळाचे पोट भरते. इतकेच नव्हे, तर बालकाचा आतड्यांचे कार्य वेगाने सुरू होते. या दुधात रोगांपासून संरक्षण करणारे घटक असतात. उदाहरणार्थ, इम्याग्लोबल इन लॅक्टॉफरीन. म्हणून या दुधाला बाळाच्या जन्मानंतरची पहिली लस म्हटले जाते. बऱ्याचदा या दुधाविषयीच्या गैरसमजापोटी हे दूध फेकून दिले जाते किंवा ते कमी आहे असे समजून बाळाला इतर गोष्टी, उदा. गुल्कोजचे पाणी, गूळ-मधपाणी, पाजल्या जातात. या गैरसमजुतींना बळी न पडता पहिल्या तीन-चार दिवसांमध्ये कोलोस्ट्रम पाजावे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2) स्तन्यपानची पद्धत : नवीन आई झालेल्या स्त्रीला स्तन्यपान कसे द्यायचे हे माहीत नसल्याने तिला भीती वाटते. बाळ भुकेमुळे रडू लागते, तेव्हा स्तन्यपान करण्यास द्यावे; बळजबरी पाजू नये. पाजायला घेताना आधी निपल बाळाच्या खालच्या ओठाला लावावे. त्यामुळे तोंड उघडते त्यानंतर बाळाच्या तोंडात निपल अशा पद्धतीने द्यावे, की तिचा काळा गोलाकार भाग बाळाच्या ओठांनी पूर्ण झाकला जावा. निपल बाळाच्या टाळूला लागायला हवे. हे करत असताना गरज वाटल्यास बोट व अंगठ्याने बाळाच्या तोंडात असलेल्या भागाला आधार द्यावा. फक्त निपल बाळाच्या तोंडात देऊ नये, कारण ते हाताने दाबले गेल्यास त्याला चिरा पडतात. पीत असता बाळाची हनुवटी स्तनालगत असल्यास चांगली पोझिशन आहे, असे समजावे. काही वेळा स्तनाचा आकार मोठा असल्यास बाळाचा श्वास गुदमरतो, असे वाटत असल्यास बाळाच्या नाकाभोवतीचा स्तनाचा भाग बोटांनी वर उचलावा.

3) स्तन्यपान करण्याची स्थिती : दोन्ही हातांनी बाळाला पकडून (कंट्रोल पोझिशन) दोन्ही हातांचा पाळणा करून किंवा झोपून कसेही पाजता येते. फक्त झोपेत पाजण्याची सवय लावू नये. कारण रात्री स्तन बाळाच्या तोंडात देऊन आई झोपली व सकाळपर्यंत स्तन बाळाच्या चेहऱ्यावरच दाबून त्याचा जीव गुदमरला, अशा केसेस घडल्या आहेत. बाळाला व आईला अनुकूल अशा कुठल्याही स्थितीत स्तन्यपान दिले तरी चालते.

4) स्तन्यपान कोणत्या बाजूने करावे? : आई बाळाला पाजते तेव्हा सुरुवातीला पातळ दूध देते व शेवटी घट्ट दूध देते. हे दोन्ही बाळाला मिळायला हवे, यासाठी दोन्ही बाजूंनी आळीपाळीने पाजावे. मात्र एका बाजूचे पूर्ण पाजून झाल्यावर दुसऱ्या बाजूला पाजायला द्यावे. दोन्ही बाजूंना सुरुवातीला येणारे दूध थोडे थोडे पाजणे योग्य नाही. बऱ्याच मुलांना एकाच बाजूला पिण्याची सवय लागते, ही सवय मोडून दुसरीकडेही प्यायची सवय लावावी. 

loading image
go to top