
दिलखुलास : संसार तुटल्यानंतर...
- कांचन अधिकारी
सध्या घटस्फोटांचं प्रमाण वाढल्यानं परित्यक्ता स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परित्यक्ता म्हणजे ज्यांचा घटस्फोट झालेला नाहीये, पण पतीनं जबाबदारी नाकारली आहे अशा स्त्रिया. या परिस्थितीत या स्त्रियांना ना धड पोटगी मिळते, ना दुसऱ्या लग्नाचा पर्याय उपलब्ध होतो. अशा स्त्रीला नाइलाजानं परत आपल्या माहेरच्याच आश्रयाला जावं लागतं. माहेरी परत आली म्हणून समाजात होणारी मानहानी, तसंच ‘माहेरच्यांचा जाच’ सहन करावा लागतो. भावजय असेल, तर अनेकदा तिला परत आलेली नणंद डोळ्यात कूस खुपावे तशी खुपते आणि ती काहीही करून घर सोडून जावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करते. अनेकदा परत आलेल्या मुलीला तिचे सख्खे आई-वडीलही नीट वागवत नाहीत. त्यांना त्यांच्या म्हातारपणात त्यांची सूनच सांभाळणार आहे, असं वाटत असल्यामुळे ते सुनेचीच बाजू उचलून धरतात. त्या वेळला तर त्या परित्यक्तेला धरणीनं आपल्याला पोटात घ्यावं, असं वाटायला लागतं.
खरंतर अनेकदा लग्नापूर्वी संपूर्ण कुटुंबाची चौकशी केली जात नाही. अर्ध्या माहितीवर लग्न लावून दिलं जातं. बायका एक साडी खरेदी करतानासुद्धा खूप चिकित्सा करतात, पण लग्नात मात्र फक्त कुंडली जुळली किंवा क्वचित प्रसंगी जुळवून घेतली, की सरळ लग्न लावून द्यायच्या मागे लागतात. लग्नाआधी बऱ्याचशा गोष्टी लपवल्या जातात व लग्नानंतर त्या हळू हळू समोर यायला लागतात.
कधी मुलाला काही आजार असतात, तर कधी मुलगा खूपच कर्जात बुडालेला असतो. व्यसनाधीनता तर प्रमुख कारण आहे. कित्येकदा थोरला दीरच नववधूवर हात टाकतो व वरून तिच्याविरुद्धच डांगोरा पिटतो. कित्येकदा लग्नानंतर नववधूला कळतं, की आपल्या नवऱ्यात पौरुषत्व नाहिये आणि हे ती चटकन् कुणापुढे बोलूही शकत नाही. एक ना अनेक कारणांनी पुढे लग्न मोडू शकतं. पूर्वीच्या काळी कायद्यानं घटस्फोटाची सोय असली, तरी समाजात आपली पत खाली जाऊ नये, म्हणून मुलींना तसंच खितपत सासरी राहण्याचा सल्ला दिला जायचा.
एकदा का लग्न झालं, की मुलीचं माहेर संपतं आणि आता तुझं घर तेच आहे, असं माहेरच्यांकडूनच सांगण्यात येतं. मुलीला जन्माला घालून तिच्या शिक्षणावर पैसा खर्च करायला लागला, तरी घरचे नाराज असतात. एकदा का मुलगी सात-आठ वर्षांची झाली, की तिनं घरातली बरीचशी कामं केली पाहिजेत ही पण अपेक्षा माहेरी केली जाते. अशा कित्येक मुली आहेत- ज्या दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी कामं करतात आणि आई-बापाच्या संसाराचा भार स्वतः उचलतात.
आपल्याकडे मुलीला लक्ष्मी मानतात. पहिली बेटी धनाची पेटी असंही म्हणताल; पण ते केवळ म्हणण्यापुरतंच. काही कुटुंबं याला अपवाद असतीलही, पण सर्वसाधारणपणे समाजात स्त्रीचं चित्र हे मी वर म्हटल्याप्रमाणंच अजूनही आहे. जर मुलीला माहेरी पाठिंबा मिळाला, तर तिचं जगणं खूप सुकर होऊ शकतं. तेव्हा कृपया परत आलेल्या मुलींचा माहेरी जाच करू नका.
Web Title: Kanchan Adhikari Writes Broken The Family Life Divorse
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..