
मी माझ्या एका मैत्रिणीकडे चार दिवस राहायला गेले होते. तिला भेटायला तिची एक मैत्रीण आली होती- जिचं नाव सारा होतं. ती एक विदेशी महिला होती.
- कांचन अधिकारी
मी माझ्या एका मैत्रिणीकडे चार दिवस राहायला गेले होते. तिला भेटायला तिची एक मैत्रीण आली होती- जिचं नाव सारा होतं. ती एक विदेशी महिला होती. दिसायला अतिशय सुंदर, गोरी पान, निळेशार डोळे, लालचुटुक ओठ. ती तिच्याशी खुर्चीत बसून बोलत होती. तिच्या मांडीवर तिची छोटीशी पर्स होती. बाजूला एक ट्रायपॉड काठी होती. तिचं बोलणं इतकं जीवनाशी भरभरून होतं, की समोरच्याचा उत्साह पण वाढेल. अतिशय Positive approach होता तिचा जीवनाविषयी. त्यांच्या गप्पात अर्थातच मीही सामील झाले. तिच्याशी थोड्या गप्पा मारल्यावर मला ती लगेचच आवडली. गप्पांच्या ओघात मी तिला तिचं वय विचारलं- कारण तिच्य खुर्चीच्या बाजूला जी काठी होती ती पाहून मी बुचकळ्यात पडले होते. तिचं रूप तिचं वय सांगूच शकत नव्हतं. तिला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘I am 83.’’ माझ्या तोंडून चटकन बाहेर पडलं, ‘‘What?? you don''t look at all.’’ त्यावर तिनं स्मित केलं आणि म्हणाली, ‘‘Oh!! Thanks.’’
मला तिच्याविषयी खूपच उत्सुकता वाटली, म्हणून तिचं आतापर्यंतचं आयुष्य कसं गेलं आहे, हे जाणून घ्यावंसं वाटलं. त्यावर ती म्हणाली, ‘आम्ही ज्यू आहोत. मी माझ्या आईच्या पोटात असताना हिटलरने ज्यू लोकांवर खूप अन्याय केले. त्यात आम्हाला आमचं घरदार सर्व सोडून दुसऱ्या देशात पायी चालत प्रयाण करावं लागलं. त्यातच माझा जन्म झाला. जन्म झाल्याझाल्या माझ्या आईला काही दिवसांची विश्रांती घ्यायला सांगितली होती, म्हणून आम्ही त्याच देशात काही दिवसांसाठी स्थिरावलो. तिकडचे लोक खूप चांगले होते- शिवाय तिथलं तापमानही माझ्या आई-वडिलांना खूप आवडलं. तेव्हा तिथेच स्थाईक होण्याचा माझ्या आई-वडिलांनी निर्णय घेतला. वडिलांना प्रथम कुठे काम मिळेना. पूर्वी आमचं किराण्याचं दुकान होतं; पण आता तात्पुरते ते एका शाळेत शिक्षक म्हणून लागले. आईपण मिळेल ते काम करायची व कसाबसा आमचा गुजारा होत असे. वडिलांची नोकरी काही दिवसांनी गेली. मग त्यांनी दुसऱ्या गावी नोकरी पकडली. परत आम्ही सर्व त्याठिकाणी स्थाईक झालो. तिथे आम्ही काही वर्षे राहिलो. माझ्या आईला तिथे आणखी एक मूल म्हणजे मुलगा झाला. मी व माझा भाऊ यांच्यात पाच वर्षांचं अंतर आहे. मी पंधरा वर्षांची असताना माझा विवाह झाला व वीस वर्षांची होईपर्यंत मला दोन मुलंही झाली.’
तिची ही सर्व कहाणी ऐकताना मला सतत माझं मन सांगत राहिलं, की हिच्या कहाणीपेक्षा कितीतरी साधं, सोप्पं, सरळ माझं आयुष्य गेलेलं आहे आणि तरीही ही स्त्री सतत हसतमुख आहे. ती तिच्या वयाइतकी दिसतही नाही. याचं गणित काय आहे? हे मला जाणून घ्यायची खूप इच्छा होत होती आणि खरंतर म्हणूनच मी तिला तिची कहाणी सांगण्यास सांगितली. त्यावर ती हसत एवढंच म्हणाली, ‘‘माझ्या आजूबाजूला काहीही होवो. मी सतत आनंदातच राहायचा प्रयत्न करते.’’ One should keep oneself happy inside what so ever may be the outside situation. बाहेर काहीही घडलेलं असेल तरीपण आपण आपल्या मनावरचा ताबा कधीच सोडायचा नाही. बाह्य घटना आपल्या मनावर स्वार होऊ द्यायच्या नाहीत. आपण आपल्या मनाशी चांगल्याच गोष्टींचा संवाद करायचा. पूर्वायुष्यातील घटनांवर विचार करायचाच नाही आणि भविष्याची चिंता मनाला भेडसावू द्यायची नाही. गौतम बुद्धांची शिकवणही हीच होती नाही का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.