दिलखुलास : शबरीची बोरं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kande Pohe

मला आठवतंय मी लग्नाआधी घरी साधे कांदे पोहे केले, तरी माझे वडील कितीतरी वेळा माझं कौतुक करायचे. ‘वा! ताई मस्तच झालेत हां पोहे!’ म्हणायचे.

दिलखुलास : शबरीची बोरं

- कांचन अधिकारी

मला आठवतंय मी लग्नाआधी घरी साधे कांदे पोहे केले, तरी माझे वडील कितीतरी वेळा माझं कौतुक करायचे. ‘वा! ताई मस्तच झालेत हां पोहे!’ म्हणायचे. मग मलाही हुरूप यायचा करायला. आईला विचारलं, की ती म्हणायची, ‘हां! ठीक आहेत.’ पुढे लग्न झालं, तेव्हा कांदे पोहे अगदी मटार घालून केले; पण समोरून नवरोबांचं काहीच म्हणणं ऐकू आलं नाही. त्याच्या समोरून उगाचच दोनदा फेऱ्याही मारल्या, जणू काही मी काही तरी आवरतेच आहे अशागत. मला पाहूनही तो काहीच बोलला नाही. शेवटी न राहवून मीच त्याला विचारलं, ‘अरे पोहे कसे झालेत? तर तो म्हणाला, ‘खा रहा हूँ, मतलब अच्छेही बने है।’ खरंच सांगते, मला मनातून वाईट वाटलं आणि माझे अण्णा मला आठवले, जे प्रत्येक घासागणिक माझं कौतुक करायचे. मग मी म्हणायची, ‘अजून आणते ना अण्णा,’ तर ते म्हणायचे, ‘हो आण. मला खरंच आवडलेत.’

आपण काही पदार्थ केला, की त्यात नुसते श्रम घालून चालत नाही, तर त्या पदार्थात प्रेमही घालावं लागतं. तेव्हाच तो पदार्थ चविष्ट बनतो. कित्येक प्रेमवीर असेही असतात, की पदार्थाला चव नसेल तरीही ते त्या माणसाची व पदार्थाची तोंड फाटेपर्यंत स्तुतीच करतात व तो करणारा माणूस जेव्हा तो पदार्थ स्वतः चाखून बघतो, तेव्हा त्याला कळतं, की अरे यात आपण मीठच घालायला विसरलोय आणि तरी समोरची व्यक्ती केवळ आपल्या प्रेमाखातर चवीचवीनं तो पदार्थ खातेय. तेव्हा मात्र पदार्थ करणारा माणूस ओशाळतो व समोरच्या व्यक्तीचं आपल्यावर किती प्रेम आहे हे जाणतो.

आपल्याला शबरीच्या उष्ट्या बोरांची कथा माहीतच आहे. प्रिय रामाला सर्व मधुर बोरं मिळावीत म्हणून शबरी प्रत्येक बोर चाखून बघत होती. मीसुद्धा पदार्थ बनवताना जरा हातावर घेऊन चाखून बघते. म्हणजे त्यात काय कमी व काय जास्त घालायला हवंय याची कल्पना येते. जेणेकरून खाणाऱ्या व्यक्तीला तो पदार्थ चविष्टच लागेल. अर्थात नेवैद्याचा स्वयंपाक बनवायचा असतो, तेव्हा मात्र गृहिणींचा अगदी कस लागतो. कारण तेव्हा पदार्थ आपण बनवताना चाखून बघू शकत नाही.

देवाला नेवैद्य हा गोडच मानून घ्यावा लागतो. अशांसाठी एक नामी कल्पना आली आहे माझ्या डोक्यात. ती म्हणजे आदल्या दिवशी तो पदार्थ थोडा बनवून बघायचा, म्हणजे आपला हातही त्यावर बसतो नाही का? व आयत्या वेळेला पदार्थही बिघडत नाही.

मी एक जपानी चित्रपट बघत होते, त्यात नायिका एका रेस्टॉरंटमध्ये कामाला असते. तिची मानसिक अवस्था चांगली नसते, त्यामुळे ती रडतरडत न्युडल्स बनवत असते. जेव्हा तिनं बनवलेले न्युडल्स बाहेरच्या गिऱ्हाईकांना देण्यात येतात, तेव्हा ते खाऊन तेही रडायला लागतात. तिला शिकवणारा शेफ बाहेरची गिहाईकांची अवस्था तिला दाखवतो आणि तिला स्माईल करायला सांगतो. एक छोटीशी कृती खूप मोठा परिणाम साधते.

कोणताही पदार्थ बनवताना बनवणाऱ्याची मानसिक अवस्था कशी आहे? म्हणजे त्याची मानसिकता आनंदी असेल आणि तो मन लावून पदार्थ बनवत असेल, तर समोरच्याला तो नकीच आवडणार. अर्थातच शबरीला रामभेटीची खूप आस लागली होती, आणि जेव्हा प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र भेटीला येणार असं तिला समजतं, तेव्हा तिची मानसिकता पराकोटीच्या आनंदात पोचली असणार.

Web Title: Kanchan Adhikari Writes Kande Pohe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Womens Corner
go to top