दिलखुलास : आधी स्वतः जगा!

मंडळी, मी जे इथं माझे विचार मांडणार आहे, ते आता ज्यांची मुलं मोठी झालेली आहेत व कमवायलाही सुरुवात केलेली आहे, अशांची ही कथा आहे.
Live
LiveSakal
Updated on
Summary

मंडळी, मी जे इथं माझे विचार मांडणार आहे, ते आता ज्यांची मुलं मोठी झालेली आहेत व कमवायलाही सुरुवात केलेली आहे, अशांची ही कथा आहे.

- कांचन अधिकारी

मंडळी, मी जे इथं माझे विचार मांडणार आहे, ते आता ज्यांची मुलं मोठी झालेली आहेत व कमवायलाही सुरुवात केलेली आहे, अशांची ही कथा आहे. कारण खऱ्या अर्थानं कात्रीत सापडल्यासारखी अवस्था या पिढीची झालेली आहे. या पिढीला त्यांच्या आई-वडिलांकडून फारशी इस्टेट मिळालेली नाहीये. त्यांना त्यांच्याच स्वबळावर स्वतःचा संसार उभा करावा लागलेला आहे. अगदी स्वतःचं स्वतंत्र घर घेण्यापासून ते घरातली भांडीकुंडी घेण्यापर्यंत मुलांना जन्म देऊन त्यांना मोठं करायचं, त्यांना नोकरीला लावायची जबाबदारीही उचलायची, एखाद्याला समजा नोकरी करायची नसेल तर व्यवसाय उभा करण्यासाठीही पैसे द्यायचे; स्वतःच्या सर्व इच्छा, आवडी-निवडी या पिढीने मारलेल्या असतात. का? तर मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यासाठी आयुष्यभर पै पै वाचवत फिरायचं, स्वतः बसनं प्रवास करायचा. दोन वेळा फक्त भाजी-पोळी किंवा आमटी-भातच खायचा. का? तर मुलांना शिकवायचंय, त्यांना परदेशी पाठवायचंय आणि त्या सर्वांत या पिढीनं स्वतःसाठी काहीच केलेलं नसतं. साधा एक परदेश प्रवासही केलेला नसतो. अशांची मुलं मोठी होतात आणि परदेशी स्थायिक होतात. इकडे आई-वडिलांना अगदी आपलं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटतं. अशी मुलं आपल्या आई-वडिलांच्या पैशांनीच लग्न करतात व आपल्या पत्नीसकट परदेशी जातात. मग त्यांना आपल्यासाठी अनंत खस्ता खाल्लेल्या आपल्या आई-वडिलांची आठवणही होत नाही. अगदी बोलावलंच, तर त्यांना जेव्हा मूल होतं ते सांभाळण्यासाठी बोलावतात. येण्याचं तिकीट जरी पाठवलं तरी खूप समजायचं. नाही तर तेही आई-बापाला स्वत:लाच काढावं लागतं.

ही मुलं परदेशी गेली, की त्यांना आपण फारच कर्तृत्ववान आहोत असं वाटायला लागतं. आई-बापानं किती कष्ट केलेत त्यांच्यासाठी, याची साधी जाणीवही त्यांना नसते. आई-वडील इकडे भारतात परत आल्यावर ‘मान सांगावा जनाला आणि अपमान सांगावा मनाला’ या उक्तीप्रमाणे आपल्या मित्रांच्यात आपला मुलगा आता एवढे कमावतो सांगण्यात मोठेपणा मानतात; पण त्यानं एवढं कमावलेल्यातलं तो मुलगा आई-वडिलांना किती पैसे देतो, हे विचारलं, की आई-वडीलच म्हणतात, ‘नाही, आम्हाला तशी काही गरज नाहीये. आमचे पैसे आम्हाला पुरतात.’... पण पुरतात म्हणजे परत आमटी-भातालाच! चैन अजूनही ते करू शकत नाहीत. याला कारण इतकी वर्षं अशीच जगायची सवय लागून गेलेली असते. मुलं मात्र मनमानी जगत असतात. वडिलांनी दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर अमाप पैसा कमावला, तरी इकडे आई-वडिलांची सांपत्तिक स्थिती ३० वर्षांपूर्वी होती तशीच असते. का बरं असं प्रत्येकाला वाटत नाही, की मी ज्या ऐशोआरामात राहतो, तेच सर्व आराम मी माझ्या आई-वडिलांना दिले पाहिजेत?

कित्येकदा वडिलांना त्यांच्या स्वतःच्या धंद्यात नुकसान झालं, तर त्यांना इतकं अपराधीपणाचं वाटतं, की जणू काही त्या पैशांवर खरा अधिकार यांच्या मुलांचा होता व केवळ त्यांच्या मूर्खपणामुळे त्यांना पैशाचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे ते त्यांच्या मुलांसमोर अपराधीपणाने वागतात. मला आपली पिढीजात भारतीय संस्कृती कळतही नाही आणि पटतही नाही. या पृथ्वीवरचे आपणही एक (मानव) प्राणी आहोत. इतर कुठला प्राणी आपल्या मुलांची जबाबदारी त्याच्या वयाच्या २५ ते ३० वर्षापर्यंत उचलतो? मानव प्राण्यालाच हा उपद्व्याप आहे. आपण आपल्या मुलांसाठीच जगतो व मरतो. स्वतःसाठी कधी आणि किती वेळ जगता? सांगा आठवून. आता प्रत्येकानं यातून बाहेर यायला हवं. मुलाला शिक्षण दिलं, की त्यानं त्याच्या पायावर उभं राहायला हवं. मुलगा शिकला, की त्यानं त्याचा संसार त्याच्या बळावर थाटला पाहिजे. आपणही आपल्या स्वतःच्या मुलांमधील मानसिक गुंतवणूक कमी करून स्वतःच्या आनंदासाठी वेळ काढला पाहिजे. First you have to leave yourself. Then think for others.

माणूस माणसाला हवा असतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. मात्र, सगळ्या या इतर गोष्टींत माणूस स्वतःलाच विसरत चालला आहे. स्वत:साठी केवळ पाच मिनिटं काढा आणि मी माझ्या आवडलेल्या गोष्टी कधी केल्या का? बायकोला तिच्या आवडी-निवडी कधी करू दिल्या का? प्रत्येकाच्या जाण्याचा दिवस नक्की असतो असं म्हणतात. मग त्याच्या आधी मनसोक्त जगण्याचे किती दिवस जगलात? याचा विचार मात्र आपल्या मनाशी जरूर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com