दिलखुलास : मनाचे बळ

मंडळी, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातानाच्या आपल्या भावना आणि नवजात अर्भकाला पाहायला जातानाच्या भावना या किती भिन्न असतात नाही?
Power of Mind
Power of MindSakal
Summary

मंडळी, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातानाच्या आपल्या भावना आणि नवजात अर्भकाला पाहायला जातानाच्या भावना या किती भिन्न असतात नाही?

- कांचन अधिकारी

मंडळी, एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जातानाच्या आपल्या भावना आणि नवजात अर्भकाला पाहायला जातानाच्या भावना या किती भिन्न असतात नाही? आपण ज्या परिस्थितीत जात असतो, त्याचा परिणाम आपल्या भावभावनांवर अगोदरपासूनच तयार होत असतो. माणसाचं मन जे कुठल्याही संशोधनात दिसत नाही (म्हणजे थोडक्यात कुठल्याही एक्सरेज, सिटीस्कॅनमध्ये दिसू शकत नाही); पण त्यांचे परिणाम मात्र शरीरावर होताना दिसतात. खूप दिवसांपासून या गोष्‍टींचा कल्लोळ माझ्या मनात चालला होता. आता उदाहरण द्यायचं झालं, तर आपल्याला लागेल, बोचेल, टोचेल असं जर कुणी आपल्याला बोललं, तर लगेचच आपल्याला ते लागतं. प्रसंगी डोळ्यांतून पाणीही येऊ लागतं. हे असं का घडतं? तर ती जी एक अदृश्य वस्तू आहे ना- जिचं नाव आहे मन- ती खट्टू होते. मग या आपल्या मनावर बाह्य कुठल्याही प्रसंगाचा परिणाम होणार नाही, यासाठी कोणती साधना केली पाहिजे, याचा विचार मी करू लागले. अगदी साधी गोष्ट मी सांगते, मी माझ्या अगदी जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलांना भेटायला गेले होते, तेव्हा मी मनानं इतकी कमकुवत झालेले होते, की मी तिचं अंतिम दर्शन न घेताच परत आले. मी तिच्या मुलांना हेही सांगितलं, की मी तिची शेवटची आठवण तीच ठेवू इच्छिते, जेव्हा मी दोन दिवसांपूर्वी तिला भेटायला आलेले होते आणि ती माझ्याकडे पाहून हसली, बोलली होती. तिचा देह इतका क्षीण झाला होता, की ती पलंगावर पडूनच होती; पण तरीही तिचा अंतरात्मा जिवंत होता.

त्यामुळे त्यात मनाचाही वास होता. माझ्या डोळ्यांतून झिरपणाऱ्या माझ्या भावना तिचे डोळे टिपून घेऊ शकत होते आणि तिच्या डोळ्यांत तेव्हाही माझ्याविषयीचं प्रेम मी अनुभवू शकत होते. आणि अगदी हीच देवाणघेवाण मी माझ्या मनात साठवून ठेवू इच्छित होते. त्यावर दुसऱ्या कुठल्याही स्मृतींची छाया पडू नये, असं माझं मन मला सांगत होतं. म्हणजेच दुसऱ्या अर्थी माझं मन कमकुवत होतं. जे सत्य आहे ते स्वीकारूनही आपल्याला त्यातून सहजी बाहेर काढण्याची ताकद (मानसिक) माझ्यात नव्हती. थोडक्यात बाह्य परिस्थितीचा आपल्या मनावर म्हणजेच पर्यायानं आपल्या शरीरावर परिणाम होऊ द्यायचा नाही, ही कला मला अवगत नाही. पण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टींचा आपल्याला सतत सामना करावा लागणारच आहे. म्हणजेच मला माझ्या मनावर विजय मिळवता आलाच पाहिजे. मग मी काय करू शकते, याचा विचार माझं मन झपाट्यानं करायला लागलं. कारणच तसं होतं ना.

आपल्याला आपला आत्मसन्मान दुखावणारं कुणी तरी भेटणारच आहे. आपला अपमान कधीतरी, कुणीतरी करणारच आहे, मग त्यावर विजय कसा मिळवायचा? ही एक खूप मोठी कला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे, ‘निर्लज्जम सदा सुखी.’ मग निर्लज्ज व्हायचं का? कुणी म्हणतं, ‘अहो, लक्ष द्यायचं नाही,’ तर कुणी म्हणतं, ‘गेंड्याची कातडी करायची,’ तर कुणी म्हणतं, ‘मंडळीपासून दूर राहायचं.’ थोडक्यात काय, तर ‘जहां नहीं चैना वहां नहीं रहना। दुःखी मन मेरे सुन मेरा कहना।’

एखाद्या सिद्धी प्राप्त केलेल्या योग्यासारखं बनणं इतकं सोपं आहे का ही? तर नाही! त्यासाठी खूप मोठ्या साधनेची गरज आहे. जर त्यातल्या त्यात तुम्ही स्वतःला सुखात, आनंदात ठेवू इच्छित असाल, तर आपल्या मनाला हे सतत-सतत समजावत राहा, की ही बाह्य परिस्थिती आहे आणि माझ्या आतली ही माझी ‘अंतःस्थिती’ आहे आणि बाह्य स्थितीचा मी माझ्या अंतःस्थितीवर कुठलाही परिणाम होऊ देणार नाही. हेही इतकं सोपं नाही; पण प्रयत्नांची परमेश्वर! आपलं मन जर आपल्या एखाद्या नवजात बालकाप्रमाणे करून घ्यायचं असेल- ज्याच्यात राग, लोभ, मद, मोह, मत्सर काहीच नाहीये, तर त्याची सुरुवात मी सांगितलेल्या या उपायापासून करायला काहीच हरकत नाहीये- कारण एका सुदृढ मनालाच एक सुदृढ शरीर लाभते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com