esakal | संघर्ष विधवांच्या सन्मानासाठीचा
sakal

बोलून बातमी शोधा

संघर्ष विधवांच्या सन्मानासाठीचा

सकारात्मक संवाद करून, या विरोधाचे रूपांतर पाठिंब्यात होऊ शकते, हेच सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आटपाडीजवळच्या आवळाई येथील लता बोराडे यांनी सिद्ध केले आहे.

संघर्ष विधवांच्या सन्मानासाठीचा

sakal_logo
By
संपत मोरे

वेगळ्या वाटा
रुढी परंपरेच्या विरोधातील लढाई खूपच अवघड असते. त्यांना आव्हान देताना आधी आपल्या जवळच्या लोकांशी दोन हात करावे लागतात. अर्थात, त्यात त्यांची काही चूक नसते, रुढीचा पगडा त्यांच्या मनावर असतो म्हणून ते आपल्याला विरोध करतात. सकारात्मक संवाद करून, या विरोधाचे रूपांतर पाठिंब्यात होऊ शकते, हेच सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आटपाडीजवळच्या आवळाई येथील लता बोराडे यांनी सिद्ध केले आहे. आटपाडीसारख्या ग्रामीण भागात त्यांनी विधवांच्या आत्मसन्मानासाठी त्यांना कुंकू लावता यावे, सौभाग्याचे दागिने परिधान करता यावेत म्हणून चळवळ उभी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लता बोराडे यांचा मूळचा स्वभाव बंडखोर नाही. त्यांना कोणी सांगितले असते की, तुम्ही एक चळवळ उभी कराल तर त्यांनाच काय त्यांच्या घरातील कोणालाच हे पटले नसते. ‘आयुष्यात येणारी संकटे माणसाला खूप काही शिकवतात. पहिल्यांदा ती लढायला शिकवतात,’ असे त्यांचे म्हणणे. विधवांना सन्मान मिळावा, अशी चळवळ उभी करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेक शोकांतिकांनी भरलेला आहे.

एका शेतकरी कुटुंबातील मुलीचे लग्न होते. लग्नानंतर ती सासरी जाते. अशाच एका शेतकरी वडिलांची मुलगी असलेल्या लता यांचे लग्न झाले. त्यांचे पती मुंबईला होते. मुंबईचा पती मिळणे ही ग्रामीण भागातील मुलींना आनंद वाटणारी गोष्ट. लग्न झाल्यावर त्या सासरी गेल्या. सुखाचा संसार सुरू झाला; पण एक अनपेक्षित घटना घडली. त्याने लताचे आयुष्य उद्‍ध्वस्त झाले. त्यांच्या पतीचे अपघाती निधन झाले. या घटनेतून सावरायला अनेक महिने गेले. हा काळ खूप कठीण होता. या दिवसांत लता यांना पांढऱ्या पायाची म्हणून हिणवले जाऊ लागले. शुभकार्यांत त्यांना दूर ठेवले जाऊ लागले. विधवेपणाचे ओझे वागवावे, एवढे त्यांचे वयही नव्हते. याच काळात विधवेला देण्यात येणारी वागणूक पाहून त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी उभ्या केलेल्या चळवळीचे बीज त्याकाळात त्यांच्या मनात रुजले. त्यांनी ठरवले, ‘विधवांसाठी आपण भविष्यात काहीतरी करायचे.’

त्यानंतरच्या काळात माहेरी आल्या. राहिलेले शिक्षण पूर्ण केले. डीएड केले. शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी आयुष्य पुन्हा उभे केले. त्यानंतर त्यांनी विधवांच्या आत्मसन्मानाची चळवळ उभी केली. विधवेने कुंकू लावणे ही गोष्ट समाजाला पटणारी होती;पण त्यांनी आपला उपक्रम सुरूच ठेवला. नंतरच्या टप्प्यात हा उपक्रम विधवेकडून सुवासिनींनी कुंकू लावून घेणे आणि त्यांना कुंकू लावणे येथवर पोचला. समाजाचा विरोध मावळत चालला आहे. माणसे लता बोराडे यांच्या पाठीशी उभी आहेत. छोटा वाटणाऱ्या या उपक्रमाचे मोठेपण समजावून घ्यायचे असल्यास रुढी व परंपरांत अडकलेल्या ग्रामीण भागातच जायला हवे. लता बोराडे एखाद्या आडवळणावरच्या वस्तीवर जातात आणि तीस चाळीस वर्षांपूर्वी विधवा झालेल्या एखाद्या आजीला कुंकू लावतात. तिला हिरव्या बांगड्या देतात. तेव्हा त्या आजीने मिठी मारून ढाळलेले आनंदाचे अश्रू पाहून सगळे गहिवरून जातात...

loading image
go to top