वुमन हेल्थ : स्तनातील गाठीविषयी जाणून घेऊया!

डॉ. ममता दिघे
Saturday, 9 May 2020

सकाळपासून मीना अस्वस्थ होती. अंघोळ करताना तिला अचानक स्तनात काहीतरी टणक लागले. ती गाठ कॅन्सरची तर नसेल, या शंकेने तिचे मन पोखरून निघाले होते. स्तनात गाठ हाताला लागली, तर कोणतीही महिला लगेच घाबरून जाते. मात्र, याविषयी नीट माहिती मिळवणे खूप गरजेचे आहे. स्तनातील गाठ म्हणजे इतर मांसल भागापेक्षा हाताला वेगळा लागणारा टणक भाग किंवा सूज. स्तनात गाठी निर्माण होण्याची अनेक कारणे असतात. यापैकी बऱ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात आणि त्यांच्यामुळे काहीच धोका नसतो. 

सकाळपासून मीना अस्वस्थ होती. अंघोळ करताना तिला अचानक स्तनात काहीतरी टणक लागले. ती गाठ कॅन्सरची तर नसेल, या शंकेने तिचे मन पोखरून निघाले होते. स्तनात गाठ हाताला लागली, तर कोणतीही महिला लगेच घाबरून जाते. मात्र, याविषयी नीट माहिती मिळवणे खूप गरजेचे आहे. स्तनातील गाठ म्हणजे इतर मांसल भागापेक्षा हाताला वेगळा लागणारा टणक भाग किंवा सूज. स्तनात गाठी निर्माण होण्याची अनेक कारणे असतात. यापैकी बऱ्याच गाठी कॅन्सरच्या नसतात आणि त्यांच्यामुळे काहीच धोका नसतो. 

कारणे 

 • संसर्गामुळे झालेली वाढ 
 • अडेनोमा किंवा फायब्रोअडेनोमा 
 • सिस्ट 
 • मेदाचा साठा 
 • लायपोमा – कर्करोग नसलेली मेदाची गाठ 
 • फायब्रोसिस्टीक ब्रेस्ट – स्तनात गाठ जाणवणे आणि वेदना होणे 
 • स्तनाचा कॅन्सर 

कॅन्सरची गाठ 
कॅन्सरची गाठ टणक, घट्ट आणि न हलणारी असते. ही गाठ बहुतांश वेळा अजिबात दुखत नाही, विशेषतः सुरुवातीच्या काळात काहीच वेदना नसते. काही प्रकारच्या कॅन्सरच्या गाठी मात्र दुखऱ्या असतात. 

स्तनात होणारे बदल 
साधारणपणे स्तनाचा वरचा आणि बाहेरचा भाग घट्ट आणि आतला व खालचा भाग अधिक मऊ असतो. पाळीच्या वेळी स्तन अगदीच नाजूक किंवा जास्त घट्ट होऊ शकतात. वय वाढत जाते, तसे स्तनाचा घट्टपणा कमी होऊ लागतो आणि स्तन शिथिल व्हायला लागतात. स्तनात गाठी कोणत्याही वयात होऊ शकतात. हार्मोन्समुळेही अशा गाठी येऊ शकतात आणि बऱ्याच वेळा त्या आपोआप निघूनही जातात. मात्र, पुढील लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांना दाखवणे श्रेयस्कर असते. 

 • स्तनात टणक भाग हाताला लागणे
 • इतर भागापेक्षा स्तनाचा एखादा भाग वेगळा जाणवणे
 • पाळी झाल्यावरही न जाणारी गाठ दिसणे
 • गाठ बदलत किंवा वाढत जाणे
 • स्तनावर काही कारण नसताना जखम होणे
 • स्तनाची कातडी लाल होणे किंवा सोलवटून निघणे
 • स्तनाग्रे (निप्पल) अचानक उलटे होणे
 • त्यामधून रक्तासारखा स्राव येणे
 • यांपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास डॉक्टरना लगेच भेटावे. प्रत्येक महिलेने स्तनाची स्वतः तपासणी केली पाहिजे. 

निदान 
शारीरिक परीक्षण 
कॅन्सरची गाठ आहे का नाही, हे तपासण्यासाठी हाताने स्तनाचे परीक्षण करणे ही पहिली पायरी आहे. गाठ आहे हे केव्हा, समजले हेही डॉक्टर तुम्हाला विचारतील. शारीरिक परीक्षण करून शंका असल्यास पुढे या तपासण्या सांगितल्या जातील. 

 • मॅमोग्राम 
 • अल्ट्रासाउंड 
 • एमआरआय 
 • फाईन नीडल अॅस्पिरेशन : स्तनातील गाठीमधला द्रवपदार्थ सुईने काढता येतो. त्याचे लॅबमध्ये परीक्षण केले जाते. 
 • बायोप्सी : यात स्तनाचा टिश्यू काढून परीक्षण केले जाते. 

उपचार 
स्तनात गाठ आहे, असे वाटल्यास लगेच डॉक्टरकडे जाणे श्रेयस्कर असते. मात्र, अनेक प्रकारच्या गाठी धोकादायक नसतात आणि त्यांच्यावर कोणताच उपचार करायची गरज नसते. गाठीचे कारण काय आहे, ते पाहून उपचार करायचे का नाही आणि काय करायचे ते डॉक्टर ठरवतात. गळू असल्यास सुईने ते छेदून डॉक्टर ते ड्रेन करतात आणि मग औषधे देतात. डॉक्टरांना कॅन्सरची गाठ असल्याची शंका आल्यास ते बायोप्सी करायला सांगतात आणि कॅन्सर निघाल्यास लम्पेक्टमी, मॅसेक्टमी या शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन हे उपचार गरजेनुसार केले जातात. अधिकांश वेळा स्तनातील गाठी कॅन्सरच्या नसतात, पण योग्य वेळी वैद्यकीय तज्ज्ञांकडून परीक्षण आणि त्यांच्या सल्ल्याने उपचार घेणे हे कधीही हिताचे असते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lets learn about breast lumps