French Fries
French FriesSakal

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : ‘फ्रेंच फ्राइज’ची ‘कुरकुरीत’ कथा

फ्रेंच फ्राइजचं मूळ कुठलं याबाबत अनेक कथा आहेत. फ्रान्स, स्पेन, बेल्जियम हे तिन्ही देश फ्राइजचा शोध लावल्याचा दावा करतात; पण कोणालाही ठोस माहिती नाही की नक्की याच उगमस्थान कोणतं आहे.

बटाट्याचा सर्वांत प्रसिद्ध आणि आवडता पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे फ्रेंच फ्राइज. तळलेल्या कुरकुरीत खमंग फ्राइजसोबत टोमॅटो सॉस किंवा आजकालच्या ट्रेंडप्रमाणे वरून चीज सॉस प्रत्येक पार्टीचा आकर्षण बिंदू असतो. कोणी कितीही म्हणो फ्राइज ‘अनहेल्दी’ असतात; पण समोर आलेल्या गरमागरम फ्राइजना कोणी नाकारत नाही. 

याचं सर्वांत प्रसिद्ध नाव फ्रेंच फ्राइज असलं तरी याची वेगवेगळ्या देशांत निरनिराळी नाव आहेत. जसं की ‘पटाटा फ्रिताझ’, ‘पांपस फ्राइट्स’ किंवा खुद्द फ्रान्समध्ये याला ‘फ्रेंच फ्राइट्स’ म्हटलं जातं. सोबत फ्राईड पोटॅटो किंवा वेजेस, आणि असे प्रकार आहेत. 

फ्रेंच फ्राइजचं मूळ कुठलं याबाबत अनेक कथा आहेत. फ्रान्स, स्पेन, बेल्जियम हे तिन्ही देश फ्राइजचा शोध लावल्याचा दावा करतात; पण कोणालाही ठोस माहिती नाही की नक्की याच उगमस्थान कोणतं आहे. फ्रेंच लोक दावा करतात, की सन १७८९मध्ये फ्राइट्स पॅरिसच्या एका ब्रिजवर विकले जात असत. दुसरीकडे बेल्जियन्स असं म्हणतात, की युद्धात मदत करण्यासाठी अमेरिकन आर्मीनं बटाटे प्रथम तिथं आणले आणि तेव्हापासून आम्ही फ्राइज तयार करायला लागलो. स्पॅनिश लोकांचा दावा आहे, की दक्षिण अमेरिकेतून बटाटा आम्ही प्रथम युरोपमध्ये आणला म्हणून फ्राइज आम्ही सर्वांत आधी तयार केल्या. रसगुल्ला जसा कोणी शोधला यावरून अनेक वर्षे बंगाल आणि ओडिशामध्ये वाद सुरू होता, तसाच या विषयावरही या तिन्ही देशांत हा वाद कायम राहणार असे दिसतेय. 

अमेरिकेचं फ्रेंच फ्राइज वेड तर सर्वश्रुत आहे. वर्षाकाठी सरासरी १६ किलो फ्रेंच फ्राइज अमेरिकन माणूस खातो; पण त्यावरही कडी म्हणजे बेल्जियन वर्षाकाठी सरासरी ८० किलो फ्राइज खातो. आहे की नाही गंमत?  मॅक्डोनाल्ड कंपनीच्या फ्राइज जगप्रसिद्ध आहेत. ते जगभरात प्रचंड प्रमाणात फ्राइज विकतात त्याचसोबत अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बटाट्याच्या उत्पन्नातील ७ टक्के बटाटे एकटी मॅक्डोनाल्ड कंपनी विकत घेते. या साध्याशा दिसणाऱ्या फ्रेंच फ्राइज रेसिपीमध्ये मॅक्डोनाल्ड कंपनी २० घटक वापरते आणि या रेसिपीचादेखील एक सिक्रेट फॉर्म्युला आहे म्हणे. ऐकावं ते नवलच नाही?

बेल्जियममध्ये फ्रेंच फ्राइजचें एक म्युझियम आहे. तिथं बटाटा आणि फ्राइजचा इतिहास जाणून घेऊ शकतो आणि जुन्या रेसिपीप्रमाणे तयार केलेल्या  फ्राइजसुद्धा तिथं चाखता येतात.  सतराव्या शतकातील चार्ल्स डिकन्सनं त्याच्या पुस्तकात फ्राइजचा उल्लेख केलेला आढळतो. तो म्हणतो ‘husky chips of potato, fried with some reluctant drops of oil.’ असे अनेक संदर्भ मिळतात, तरीही फ्राइजचा शोध नक्की कधी लागला हे मात्र जगाकरता गुपितच बनून राहिलं आहे. शोध कोणीही लावो; पण हाडाच्या खवय्यांकडून त्या अगम्य शोधकर्त्याचे मनोमन आभार.  एका सर्व्हेनुसार लहान मुलांची सर्वांत आवडती भाजी बटाटा आहे आणि त्यातही फ्राइज हा त्यांचा सर्वांत आवडता पदार्थ आहे. लहान काय, मोठेसुद्धा फ्राइजच्या प्रेमात असतात. जगभर फ्रेंच फ्राइज या नावानं सर्वांत जास्त प्रसिद्ध असणाऱ्या या पदार्थाचं नाव बदलायचा प्रयत्नसुद्धा झाला बरं का. झालं असं, की २००३ मध्ये अमेरिकेनं इराकवर केलेल्या हल्ल्याचा  फ्रान्सनं कडाडून निषेध नोंदवला.

मित्रराष्ट्र फ्रन्सचा विरोध अमेरिकेला काही रुचला नाही. तेव्हा त्यांच्या संसदेत असा ठराव पास झाला, की या पुढे ‘फ्रेंच फ्राइज’चं नाव बदलून त्याला ‘फ्रीडम फ्राइज’ असं म्हणावं. देशभरात सगळीकडे फ्रेंच फ्राइज नाव जाऊन फ्रीडम फ्राइज असं झालं; परंतु अमेरिकन जनतेला ते काही फार रुचलं नाही.  या नावबदलावरून अमेरिकन टीव्हीवर यथेच्छ थट्टा केली गेली. ‘सॅटर्डे नाइट लाइव्ह’ या शोमध्ये विनोदानं म्हटलं गेलं, की In France, American cheese is now referred to as ''idiot cheese.'' अशी अनेक स्तरांवर थट्टा झाल्यानंतर २००६मध्ये फ्राइजचं नाव पूर्ववत करण्यात आलं आणि नावबदल करायला नको होता असं तिथल्या मंत्र्यानं कबूल केलं. अशा या खमंग कुरकुरीत पदार्थाच्या सोबत अनेक चुरचुरीत कथाही जोडल्या गेल्या आहेत. या कथा वाचत वाचत फ्राइजची खमंग रेसिपी पाहूयात.

मुंबई खिमा चीज फ्राइज

साहित्य : अर्धा किलो बटाटे फ्राइजकरता उभे कापलेले, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, तेल, तयार खिमा मसाला/ पनीर भुर्जी, चीज, तळलेला कांदा, कोथिंबिर, चाट मसाला, हिरवी मिरची, तंदुरी मसाला

कृती :

  • फ्राइज तयार करण्यासाठी बटाटे उभे कापून घ्या आणि त्यावर कॉर्नफ्लोअर भुरभुरावे.

  • गरम तेलात फ्राइज तळून घ्या आणि त्यावर थोडे मीठ घाला.

  • पॅनमध्ये थोड्या तेलावर तयार खिमा/ पनीर भुर्जी, हिरवी मिरची, चाट मसाला, तंदुरी मसाला, कोथिंबिर टाकून गरम करून घ्या.

  • मोठ्या प्लेटमध्ये फ्राइज ठेवा, त्यावर भरपूर चीज किसून घाला आणि वर खिमा/ भुर्जी टाका, त्यावर तळलेला कांदा, कोथिंबीर, थोडा चाट मसाला टाकून सर्व्ह करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com