ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : मसाल्यांचा राजा वेलदोडा

भारतीय सणांकरता वेलदोडायुक्त तिखट-गोड पदार्थ तयार केले जातात. वेलदोडायुक्त श्रीखंड, बासुंदी, खीर, करंजी, लाडू, पुरणपोळी या सर्व गोड पदार्थात वेलदोड्याचा वापर सढळ हस्ते केला जातो.
Cardamom Nuts
Cardamom NutsSakal

मिरीला मसाल्यांची राणी मानले जाते, तर वेलदोड्याला मसाल्यांचा राजा. एकेकाळी जगाची अर्थव्यवस्था मसाल्यांवर आधारित होती. मसाल्यांच्या शोधात जगभरातून मोहिमा काढल्या गेल्या, युद्धे झाली, सत्ता पालटल्या गेल्या, अमाप पैसा खर्च केला गेला तो केवळ या मसाल्यांकरता. या मसाल्यांची खाण मात्र होती भारतात. उगाच नाही म्हटले जात, की ‘भारतात सोन्याचा धूर निघत असे’- इतकी सुबत्ता होती. चहूबाजूंनी व्यापार चाले तो मुख्यतः मसाल्यांच्या जोरावर आणि आजही मसाल्यांची सद्दी कायम आहे. 

भारतीय सणांकरता वेलदोडायुक्त तिखट-गोड पदार्थ तयार केले जातात. वेलदोडायुक्त श्रीखंड, बासुंदी, खीर, करंजी, लाडू, पुरणपोळी या सर्व गोड पदार्थात वेलदोड्याचा वापर सढळ हस्ते केला जातो. जायफळ, केशर असे सुगंधी मसाले असले, तरी वेलदोडा मात्र जोडीला हवा. भारतीय मसाल्यांची मोहिनी संपूर्ण जगावर आहे. त्यातही मिरी, वेलदोडा असे काही विशेष मसाले त्यांच्या स्वाद आणि गंधामुळे फारच भाव खाऊन जातात.  

वेलदोडा हा प्राचीन मसाल्यांपैकी एक आहे. हा मूळ भारतीय मसाला दक्षिणी घाटावरील जंगलात मुबलक पिकतो. गेल्या काही शतकात श्रीलंका, गौटामाला, चीन आणि टांझानिया येथेही त्याचे पीक घेतले जाऊ लागले. परंतु भारतीय वेलदोडा मात्र आजही जगावर राज्य करतो. भारतीय वेलदोड्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक ‘मलबार वेलदोडा’ आणि दुसरा ‘म्हैसूर वेलदोडा.’ यातील म्हैसूर वेलदोडा त्याच्या प्रखर गंधामुळे सर्वोत्तम मानला जातो. वेलदोडा केशराखालोखाल महाग असतो- त्यामुळे त्यात बरेचदा दुय्यम जातीच्या वेलदोड्याची भेसळ केली जाते. वेलदोड्याच्या इतर जातींपैकी सीआम, नेपाळ, विंग जावा वेलदोडा भेसळीकरता वापरला जातो. 

वेलदोड्याचा वापर आपण भारतीय अतिशय छान पद्धतीने करतो. गोड पदार्थांमध्ये तर अग्रणी आहेच- सोबत तिखट चमचमीत पदार्थांमध्येदेखील वेलदोड्याचे महत्त्व आहे. मसाला चहा, कॉफी आणि मसाला पानात वेलदोड्याचा सर्रास वापर होतो. तांदळाच्या खाशा रेसिपीज जसे पुलाव, बिर्याणीसारख्या सुगंधी पदार्थांत वेलदोडा म्हणजे स्टार प्लेयर आहे. हिरव्या वेलदोड्यासोबत काळा किंवा बडी वेलदोडा मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे, परंतु त्याचा गंध अतिशय प्रखर असल्याने त्याचा वापर सीमित असतो. याचसोबत बिर्याणी वेलदोडा किंवा मराठी मोग्गू नावाचासुद्धा एक वेलदोडा येतो. कर्नाटकात तयार होणारा हा मराठी मोग्गू आंध्र प्रदेशातील बऱ्याच रेसिपीजमध्ये वापरला जातो आणि हैदराबाद बिर्याणीमध्ये याचा खासकरून वापर होतो. सोबत सफेद वेलदोडासुद्धा बाजारात उपलब्ध असतो, परंतु त्याचा वापर तितका प्रचलित नाहीये. 

प्राचीन इजिप्शियन लोक मुखस्वास्थ्याकरता वेलदोडा तोंडात चघळत असत, ग्रीक आणि रोमन अत्तर तयार करण्यासाठी वेलदोडा वापरत असत. युरोपातील अतिउत्तरेकडील देश म्हणजे नॉर्डीक प्रदेशात याचा वापर सढळ हस्ते केला जातो. इजिप्तच्या एबर्स पायपरस या प्राचीन पुस्तकात वेलदोड्याचा उपयोग औषध आणि धार्मिक गोष्टींकरता केला जाई असा उल्लेख आहे. राणी क्लिओपात्राचे दालन वेलदोड्याने सुगंधित केले जाई. विष्णुगुप्त चाणक्य यांनी वेलदोडा ही प्रेम आणि आदरभाव दर्शवण्यासाठी भेट म्हणून उत्तम वस्तू आहे असे त्यांच्या ग्रंथात सांगितले आहे. चरकसंहिता आणि सुश्रुतसंहितेमध्ये वेलदोड्याला अन्न आणि औषध म्हणून उत्कृष्ट मानले गेले आहे. 

आजही हा जादुई मसाला अनेक प्रथितयश शेफना नवीन पदार्थ तयार करण्यासाठी प्रेरणा देत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक नवीन प्रयोगात वेलदोड्याच्या स्वादाचा वापर फार कल्पकतेने केला गेला. मागील काही वर्षांत वेलदोड्याचा स्वाद हा ट्रेंडिंग आहे. निरनिराळे पदार्थ, सॉस, ग्रेव्ही, पेस्ट्रीज, केक, आईस्क्रीम, कॉकटेल्समध्ये नवीन कॉम्बिनेशनसोबत सर्व्ह केला जात आहे. आज अशा या गुणकारी वेलदोड्यासोबत एक खास रेसिपी पाहूयात.

फ्लेवर्ड नट्स

दुकानात जे महागडे फ्लेवर्ड काजू, बदाम मिळतात तसे घरी करणे अगदी सोपे आहे. आज त्यातील एक रेसिपी पाहूयात. 

साहित्य : पाव कप साखर, १ टीस्पून ताजी वेलची पावडर, १ टेबलस्पून पाणी, १ कप भाजलेले मिक्स नट्स, चिमूटभर मीठ, २ चिमूटभर बेकिंग सोडा. 

कृती :

  • मिक्स नट्स कोरडे भाजून घ्यावेत.

  • एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर, पाणी, वेलची पावडर, मीठ एकत्र करून त्याचा घट्ट पाक करून घ्या. 

  • गॅस बंद करून त्यात बेकिंग सोडा टाका आणि मिक्स करा. त्याचा फेस होईल, त्याच वेळी त्यात नट्स टाका आणि मिक्स करून घ्या. 

  • नंतर ते एका ट्रेमध्ये काढून वेगवेगळे पसरून ठेवा. थंड झाल्यावर चिकटले असतील, तर एकमेकांपासून सोडवा आणि काचेच्या बरणीत भरून ठेवा.  हे कुरकुरीत वेलचीच्या चवीचे नट्स अतिशय चविष्ट लागतात आणि पौष्टिकसुद्धा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com