esakal | ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : एका सॉसची चविष्ट कथा I Sauce Story
sakal

बोलून बातमी शोधा

meyonij Sauce

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : एका सॉसची चविष्ट कथा

sakal_logo
By
मधुरा पेठे

भारतीय लोकांच्या हाती एखादी वस्तू पडली, की ते त्याचा इतका सर्जनशीलतेने उपयोग करतात आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मेयोनीज. आजकाल मेयोनीज इतक्या पदार्थांत वापरले जाते, की जणू त्याशिवाय ते पदार्थच तयार होत नाहीत. सिक्किमी मोमोजपासून अगदी आजकाल वडापावपर्यंतसुद्धा मेयोनीजचा वावर आहे. सगळ्यात मजेदार म्हणजे चीजला पर्याय म्हणून पिझ्झामध्येदेखील अनेक जण मेयोनीज वापरतात. चीज सॉस म्हणूनसुद्धा पास्ता मेयोनीजमध्ये मिक्स केला जातो. असे विचित्र प्रयोग बघून मात्र प्रत्येक पदार्थांच्या सीमा रेखाव्यात असे वाटून जाते. ‘मॅक्डोनाल्ड बर्गर जॉइन्ट्स’ भारतात आले. त्यांच्या बर्गरमध्ये हे किंचित आंबट, थोडे गोड मेयोनीज असे. सर्वसाधारण भारतीयांनी मेयोनीजची चवक ‘मॅक बर्गर’मध्येच प्रथम चाखली. क्रिमी मुलायम छानशा चवीचे हे मेयोनीज भारतीयांना न आवडले तरच आश्चर्य.

तरीही सुरुवातीच्या काळात अनेक वर्षे ते बर्गरपुरते सीमित राहिले. नंतर हळूहळू सँडविच, किंवा तळलेल्या चमचमीत पदार्थांसोबत द्यायची पद्धत रुढ झाली. गुजरातमधील अहमदाबाद शहर फ्युजन फूडची पंढरी आहे. तेथून अनेक नवीन फ्यूजन पदार्थ दर वर्षी बाहेर पडतात, गेल्या काही वर्षांत मेयोनीज वापरून अनेक फ्युजन पदार्थ अहमदाबादमध्ये तयार झाले आणि अल्पावधीतच संपूर्ण भारतभर याचे लोण पसरले. आजमितीस भारतात रोल्स, सँडविच, तळलेले स्नॅक्स, पिझ्झा, मोमोज, तळलेले चायनीज स्नॅक्स, भारतीय स्नॅक्स, वडापाव, सॅलड, अरेबिक पदार्थ अशा अनेक पदार्थांत मेयोनीज वापरले जाते किंवा सॉस म्हणून दिले जाते.

या मेयोनीजबाबत घडलेली एक गंमत सांगते. सुरुवातीला बराच काळ ‘मॅक्डोनाल्ड’मध्ये सॉस, मेयोनीजचे सेल्फ सर्व्हिंग काउंटर असत- जिथे तुम्हाला हवा तितका सॉस, मेयोनीज घेता येई. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की सॉस आणि मेयोनीज झपाट्याने संपत आहे आणि पुनःपुन्हा त्यात भरावे लागत आहे. हे पाहून त्यांनी ‘सॉस आयलँड’मधून प्रथम मेयोनीज बंद केले आणि कालांतराने सॉससुद्धा. यावरून भारतीयांना सॉस प्रकार किती आवडतात बघा. 

मेयोनीज सर्वांत कधी तयार केले गेले याबाबत वदंता आहेत. फ्रन्स आणि स्पेन हे दोन्ही देश दावा करतात, की या सॉसचे कूळ त्यांच्या देशातील. त्याही आधी मेयोनीजसदृश काही सॉस तयार केले जात असत; परंतु मेयोनीज जास्त चविष्ट असल्याने ते जास्त लोकप्रिय झाले. मेयोनीजच्या नावविषयी बऱ्याच गमतिशीर गोष्टी आहेत.

जसे की, इंग्लंडकडून फ्रान्सने भूमध्य सागरातील महत्त्वाचे माहोन बेट ताब्यात घेतले, त्याचा विजय साजरा करण्यासाठी म्हणून मेजवानीमध्ये काही पदार्थ तयार केले गेले- त्यात हा सॉस तयार केला गेला किंवा मेजवानीमध्ये क्रीम सॉस कमी पडला म्हणून त्या जागी अंडी, क्रीम, तेल,व्हिनेगर वापरून सॉस केला आणि त्याचे नाव ठेवले ‘माहोनीज.’ अशीही समजून आहे, की हा सॉस मूळ माहोना बेटावरील असावा. परंतु हा दावा फ्रेंच लोकांनी खोडून काढत म्हटले, की माहोना बेटावर फार काही चविष्ट पदार्थ तयार होत नसत, त्यामुळे हा सॉस त्यांनी तयार केलाय यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. फ्रेंच लोकांना त्यांच्या खाद्यसंस्कृतीचा इतका अभिमान आहे, की त्यामुळे अशी बरीच विधाने त्यांच्याकडून होतच असतात.

‘माहोनीज’ हे नाव फ्रेंच वाटत नसल्याचे कारण सांगत त्याचे नाव ‘बेयॉनिज’ असावे असे एका प्रसिद्ध फूड समीक्षकाने सुचवले. हे नाव त्या काळातील अनेक पदार्थांचे उगमस्थान असणाऱ्या बेयॉन शहरावरून दिले गेले. खरे तर बेयॉनीज हे एका जेली सॉसचे नाव होते; परंतु पुढे काही काळ मेयोनीजकरता ‘बेयॉनीज’ हे नाव प्रचलित झाले. नाव काही असो आज जगभरात ‘मेयोनीज’ हा टोमॅटो सॉसखालोखाल आवडता सॉस आहे. रशियामध्ये तर मेयोनीजने टोमॅटो सॉसलादेखील मागे टाकले आहे. मेयोनीज अंड्यापासून तयार होणारा हा पदार्थ असला, तरी भारतीय लोक धार्मिक कारणांमुळे व्हेज मेयोनीज खाणेच पसंत करतात आणि त्यामुळे व्हेज मेयोनीजचा सर्वाधिक खप हा भारतात होतो. चला तर मग, आज आपण एक खास रेसिपी पाहुयात.

व्हेज मेयोनीज

साहित्य : २ कप सोया दूध, अर्धा कप व्हिनेगर, २ टीस्पून राईची पावडर, १ लिटर सूर्यफूल तेल, १ टीस्पून मीठ, ३ टेबलस्पून पिठीसाखर.

कृती :

मोठ्या भांड्यात सोया मिल्क, व्हिनेगर, राईची पावडर एकत्र करून घ्या.

त्यात तेलाची बारीक धार सोडत इलेक्ट्रिक ब्लेंडरने मध्यम स्पीडवर मिक्स करत रहा. यात हँड ब्लेंडरच वापरा, हँड मिक्सर नको. हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागेल.

सर्व तेल मिक्स झाले, की ब्लेंडर वापरणे थांबवा. त्यात मीठ आणि पिठी साखर घालून हलक्या हाताने मिक्स करा.

पिठीसाखर आणि मिठाचे प्रमाण चवीनुसार कमी-जास्त करा.

तयार मेयोनीज प्लॅस्टिक किंवा काचेच्या बरणीत भरून किमान २ तास फ्रीजमध्ये ठेवा. दोन तासानंतर ते वापरण्यायोग्य होईल. वापरानंतर फ्रीज मध्ये ठेवा.

हे मेयोनीज बाजारात मिळणाऱ्या मेयोनीजप्रमाणेच चवीला लागते आणि यात साधे दूध वापरले, तर काही दिवसानंतर सैल पडते तसे सोया मिल्कपासून तयार केलेल्या मेयोनीजचे होत नाही, म्हणून सोया मिल्क वापरावे. मेयोनीज रोल्स, सँडविच, तळलेल्या चमचमीत पदार्थांसोबत सर्व्ह करा.

loading image
go to top