esakal | ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : ‘हवाई’ खाद्य-सफर I Food in Plane
sakal

बोलून बातमी शोधा

Mirch Ka Salan

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : ‘हवाई’ खाद्य-सफर

sakal_logo
By
मधुरा पेठे

विमानप्रवास म्हटलं, की ट्रेमध्ये मिळणारं गरमागरम जेवण, ते लहान प्रमाणात मिळणारे पाच-सहा पदार्थ, कॉफी, पाण्याची लहानशी बाटली असा सारा ‘तामझाम’ असतो. विमान कोणत्या शहरात जाणार आहे, त्यावरून शक्यतो त्या प्रवासात मिळणारे पदार्थ ठरवलेले असतात. उदाहरणार्थ, हैदराबादला जात असाल, तर ‘मिर्च का सालन’, दिल्लीला जात असाल तर बिर्याणी, फ्रान्सला जात असाल तर ‘क्रोसॉ’, ‘फ्रेंच चीज’ आणि उत्तम फ्रेंच वाईन इत्यादी पदार्थ मिळतील. विमानप्रवास जसा लहान-मोठा त्याप्रमाणे किती वेळा जेवण सर्व्ह केलं जाईल हे ठरतं. सोबत कोणत्या क्लासमधून प्रवास होणार आहे यावर हा तामझाम किती मोठा हेदेखील ठरतं. इकॉनॉमी, बिझनेस आणि फर्स्ट क्लास असे विमानात विभाग असतात आणि त्याप्रमाणे त्यातील सुविधा असतात.

नुकतीच शंभरी गाठलेल्या एअरलाईन फूड सर्व्हिसनं सर्वांत प्रथम सन १९१९ मध्ये हँडली पेजचं लंडन ते पॅरिस फ्लाईटमध्ये जेवण सर्व्ह केलं. त्यात एक्झॉटिक सँडविच आणि फळं दिली होती. पुढे काही वर्षांनी कमर्शियल फ्लाईट्स सुरू झाल्या. परंतु सुरुवातीला फ्लाईट अटेंडन्ट म्हणजे प्रवाशांची काळजी घेणारी नर्स असं त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. विमानप्रवास जिकिरीचा असे, विमान low altitude वरून उडत असल्यानं विमान सतत हलत असे आणि आवाजदेखील खूप मोठा येत असे. त्यामुळे अनेकांना चक्कर, मळमळणं इत्यादी त्रास होत. तेव्हा प्रवाशांना शांत करणं, त्यांना ॲस्प्रिनची गोळी देणं अशी त्यांची काळजी घेण्याची कामं अटेंडन्ट करत असत. पुढे विमानं अधिक प्रगत झाली आणि केबिन अधिक आरामशीर झाल्या. त्याच वेळी प्रवाशांना अधिकाधिक आकर्षित करण्यासाठी उत्तम जेवण, उंची मद्यं आदी द्यायची पद्धत रूढ झाली. त्या काळात विमानप्रवास केवळ अतिश्रीमंत लोकांपुरता सीमित होता. सन १९३६ पर्यंत विमानात थंड पदार्थ सर्व्ह केले जात. उदाहरणार्थ, सँडविच किंवा तळलेलं चिकन पॅक करून विमानात दिलं जायचं. सन १९३६ मध्ये युनायटेड एअरलाइन्सनं त्यांच्या फ्लाईटमध्ये सर्वांत प्रथम किचन तयार केलं. त्या वेळेस प्रवाशांना तळलेलं चिकन, Scrambled eggs दिले गेले. या बदलानं इतर विमान कंपन्या प्रोत्साहित झाल्या आणि पुढे अधिक शाही जेवण सर्व्ह करण्याची स्पर्धा सुरू झाली. 

सन १९५० ते ६० चं दशक हे विमानप्रवासाकरता गोल्डन एज मानलं जातं. या काळात ‘इन फ्लाईट फूड सर्व्हिस’चा जवळपास अतिरेक झाला. प्रत्येक कंपनी आपल्याकडे ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी शक्य तितका प्रयत्न करत होती आणि या चढाओढीत खानपान व्यवस्थाही अगदी राजेशाही थाटाची असे. आरामशीर मोठ्या चेअर, टेबलक्लॉथ, सिल्व्हर कटलरी, आकर्षक प्लेट्स आणि एकापेक्षा वरचढ खाद्यपदार्थ यांची रेलचेल सुरू झाली. ‘पॅन ऍम एअरवेज’ तर अशा शाही भोजनाकरता अतिशय प्रसिद्ध होती. ‘पॅन ऍम’चा २० जुलै १९३९ रोजीचा इन फ्लाईट मिल प्लॅन पुढीलप्रमाणे होता : सुरुवातीला ट्रॉपिकल फ्रुट कॉकटेल, क्रिम ऑफ टोमॅटो सूप, हाफ ब्रॉइल्ड चिकन विथ वाईन सॉस, वॅक्स बीन्स आणि डेलमोनिको पोटॅटोज. डेझर्टकरता बोस्टन क्रीम पाय आणि ब्ल्यू माऊंटन कॉफी सर्व्ह केली गेली. सोबतच जगातल्या उत्तम वाईन आणि स्पिरिट्स यात समाविष्ट होते. एकूणच पदार्थ आणि पेयांची रेलचेल असे त्याकाळी.

पुढे स्वस्तात विमानप्रवास सुविधा देणाऱ्या कंपन्या आल्यावर जुन्या प्रस्थापित विमान कंपन्यांना त्यांच्या अनेक सुविधांवर कात्री लावावी लागली. यात सुरुवातीला मद्य, पदार्थ कमी केलं गेलं. सत्तरच्या दशकात जागतिक विमानप्रवास वाढला आणि त्यानुसार प्रवासाची किंमत कमी करणं गरजेचं झालं. पूर्वी सर्व्हिसवर पूर्णतः भर होता. तो बदलून नंतर स्पीडवर लक्ष केंद्रित झालं. परिणामी ‘इन फ्लाईट डाईन’ची पूर्ण संकल्पना बदलावी लागली. साऊथवेस्ट एअरलाईन्सनं तर फ्लाईटमध्ये कोणतेही पदार्थ देणं बंद केलं आणि त्याऐवजी खारे शेंगदाणे देत असत. त्यामुळे लोकांनी त्यांना उपहासानं ‘पिनट्स एअरलाईन्स’ असं नाव ठेवलं.

गंमत म्हणजे विमानात जिथं आपण साधारण ३५,००० फुटांवरून उडत असत त्यामुळे पदार्थांची चव बऱ्यापैकी निराळी लागते. आर्द्रता आणि कमी दाबामुळे आपली गोड खारट चव घेण्याची क्षमता जवळपास ३० टक्यांनी कमी होते. त्यामुळे विमानातील जेवणाला काही खास चव नसते, असं बरेचदा वाटलं तरी बिचाऱ्या शेफला नाव ठेऊ नका बरं का!! तर अशा शंभरी गाठलेल्या फ्लाईट फूडमधील माझ्या आवडत्या पदार्थाची रेसिपी आज दिली आहे.

मिर्च का सालन

साहित्य : २ टेबलस्पून शेंगदाणे, २ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून सुकं खोबरं, २ पळी तेल, १ कांदा, १ टीस्पून आलं, लसूण पेस्ट, ७ ते ८ जाड्या मिरच्या, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, ७ ते ८ पान कढीपत्ता, अर्ध्या लिंबाएवढी चिंच, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, १ टीस्पून लाल मिरची पावडर, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ.

कृती :

शेंगदाणे खमंग भाजून घ्या. गॅस बंद करून त्याच कढईत तीळ आणि खोबरं टाका.

कुरकुरीत झाल्यावर बाजूला काढून ठेवा.

थोड्या तेलावर कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. त्यात आलं लसूण पेस्ट टाकून परता.

गॅस बंद करून थंड होऊ द्या.

कांदा, शेंगदाणे, तीळ, खोबरं थोड्या पाण्यासहित एकत्र वाटून घ्या.

मिरच्यांना उभे काप देऊन थोड्या तेलावर परतून घ्या.

तेलावर मोहरी, जिर, कढीपत्ता टाकून परता. त्यात वाटण, गरम मसाला पावडर, हळद, तिखट, मीठ टाकून छान परतून घ्या.

तळलेल्या मिरच्या त्यात टाका आणि वरून कपभर पाणी टाका आणि एक उकळी आली, की त्यात कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

loading image
go to top