esakal | ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : टाळेबंदीने घडवलेले ‘खाद्य-बदल’
sakal

बोलून बातमी शोधा

Veg Tehari

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : टाळेबंदीने घडवलेले ‘खाद्य-बदल’

sakal_logo
By
मधुरा पेठे

गेल्या दीड वर्षात जगभरात अनेक गोष्टी बदलल्या आहेत; तसेच त्याचा आपल्या रोजच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन, वस्तूंची कमतरता, दळणवळण याचा स्वयंपाकघरापर्यंत परिणाम झालेला दिसून आला. केवळ भारतच नाही, तर जगभरातील फूडट्रेंड्स यामुळे वेगळ्याच दिशेला वळल्याचे दिसून आले. यात सर्वांत मोठा भाग होता ते म्हणजे वस्तू कमतरतेचा. नेहमीच्या अनेक वस्तू उपलब्ध नसल्याने किंवा लॉकडाऊनमुळे विकत घेऊ न शकल्याने आपल्या नेहमीच्या जेवणात आमूलाग्र बदल झाला. अनेक पदार्थांनी पर्यायी पदार्थ म्हणून रेसिपीमध्ये जागा घेतली, तर अनेक घटकांशिवाय देखील पदार्थ तयार होऊ लागला. मोकळा वेळ हाताशी असल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात बेकिंगकडे या काळात वळला. निरनिराळे केक, बिस्किटे, खारी घरी तयार केली गेली; तसेच विदेशात या काळात निरनिराळे ब्रेड तयार केले गेले.

या काळात मोठ्या प्रमाणात बेकिंग पावडरचा वापर झाला. बेकिंग पावडर संपल्यावर त्यांनी इनोकडे आपला मोर्चा वळवला. केक, ब्रेड, ढोकळा याकरता मोठा प्रमाणात इनोची खरेदी झाली. पुढे बाजारातील इनोचा साठादेखील संपला आणि महिलावर्गाने इनो हवा म्हणून सोशल मीडियावर मागणी सुरू केली. ग्रहण सुटावे तसे लॉकडाऊन सुटले आणि सर्व जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आले. मागील वर्षी आलेला बेकिंगचा ट्रेंड अजूनही ओसरलेला नाही. त्या अनुभवांमुळे आजही भारतात होम बेकिंग जोरात सुरू आहे. याविरुद्ध पाश्चात्त्य देशात मात्र अचानक आलेल्या या वस्तू कमतरतेमुळे जनतेला हवालदिल होताना पाहिले. त्यांच्याकडे कॅन फूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. असे अनेक पदार्थांचे कॅन त्यांच्या कोठीघरात साठवलेले असतात. बरेचदा हे न वापरल्याने तसेच पडून वाया जातात. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेले अनेक कॅन याकाळात मोठ्या प्रमाणात वापरले गेले. 

त्याचसोबत घरात अन्न वाया जायचे प्रमाणदेखील खूप कमी झाले आहे. वेळेअभावी, बिझी लाइफस्टाइलमुळे घरात उरलेले अन्न वाया जात असे, लॉकडाउनमध्ये आणि नंतर त्याचे प्रमाण अनेक पटीने कमी झाल्याचे दिसून आले. ताजे पौष्टिक अन्न तयार करणे, ते शक्यतो लवकरात लवकर खाऊन संपवणे किंवा पुन्हा त्यापासून नवीन पदार्थ तयार करण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. घरातील सर्व मंडळी एकावेळेस घरी असल्याने गरजेपुरते शिजवणे आणि संपवणे गृहिणींकरता सोपे झाले आहे. जगभरात याच काळात फ्युजन फूडचा ट्रेंड वाढीस लागलेला दिसला. भारतीय, चायनीज, मिडल ईस्टन, जापनीज, मेक्सिकन, कोरियन असे सरमिसळ असणारे अनेक पदार्थ तयार केले गेले आणि या फूड ट्रेंडचा प्रभाव रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पदार्थांवर झालेलादेखील दिसून येतो. 

लॉकडाऊन आणि नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात निरनिराळी हर्ब्ज, मसाले, यांच्या वापराचा नव्याने विचार केलेला दिसून येतो. जुने पारंपरिक काढे, वनौषधी, आजीचा बटवा, घरगुती चाटण, औषधे याचा वापर वाढला- सोबत हे घटक रोजच्या जेवणात, पेयात कसे समाविष्ट करायचे यावरदेखील विचार केला गेला. अनेक नवीन पाककृती यामुळे प्रचलित झाल्या. पाश्चात्य देशात याच काळात मोठ्या संख्येने लोक शाकाहाराकडे वळले. सोबत तेथे रोजच्या अन्नात हळद आणि नारळाचे तेल हा वेगाने प्रसिद्ध झालेला फूड ट्रेंड आहे. एकूण तब्येत व्यवस्थित ठेवण्यासाठी नवीन बदल स्वीकारायला तयार असलेल्या या जनतेने जगभरातील अनेक उत्तम गोष्टी स्वीकारायला सुरुवात केली आहे. जगात उलथापालथ करणारे हे दीड वर्ष अनेक कारणांसाठी बदलाचे निमित्त ठरले. यातील काही बदल खरेच सुखद होते. वाईट पाठी सोडून, वेचक चांगले बदल घेऊन आपण पुढे जाऊयात. चला आज एक खास वन पॉट डिश पाहूयात.

अवधी व्हेज तेहरी 

साहित्य : २ वाटी बासमती तांदूळ, २ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून जिरे, ३ मोठे वेलदोडे, ३ लवंगा, ५ मिरी दाणे, २ इंच दालचिनी, ४ मध्यम तेजपत्ता, पाव चमचा बडीशेप, १ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, ४ हिरव्या मिरच्या, २ मध्यम कांदे, २ मोठे बटाटे, १ मध्यम गाजर, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फ्रेंच बीन्स कापून, १ टीस्पून हळद, १ टीस्पून तिखट, १ टीस्पून धने पावडर, अर्धे लिंबू, अर्धा चमचा केवडा जल/ केवडा इसेन्सचे ३ थेंब, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, १ टेबलस्पून तूप.

कृती :

  • तांदूळ धुवून अर्धा तास भिजवून ठेवा. तेलावर सर्व खडा मसाला टाकून त्यावर कांदा बारीक चिरून टाका. 

  • कांदा गुलाबी झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट आणि सर्व चिरलेल्या भाज्या टाका आणि नीट परतून घ्या. त्यात हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला पावडर, टाकून परतून घ्या. वरून तांदूळ, मीठ, साखर आणि लिंबू रस, आणि नीट परतून घ्या. यात ४ वाटी गरम पाणी आणि केवडा जल किंवा केवडा इसेन्स टाकून तेहरी शिजवून घ्या.

  • शेवटी चमचाभर तूप टाकून ५ मिनिटं झाकण ठेवून दम द्या आणि गरमागरम सर्व्ह करा. आवडत असल्यास यावर तळलेला कांदा आणि तळलेले काजू टाकून देऊ शकता. 

  • बिर्याणी आणि पुलाव यामधील हा पदार्थ आहे. अवधमध्ये शाही भोजनासाठी हा खास पदार्थ तयार केला जाई. वन डिश मिल म्हणून आवडीने उत्तरप्रदेशात ही चमचमीत तेहरी केली जाते.

loading image
go to top