ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : केळ्यांची ‘गोड’ कहाणी

भारतात फळांची अगदी मुबलकता असते. प्रत्येक मोसमात निरनिराळ्या फळांनी बाजार अगदी सजलेला असतो. परंतु काही बारमाही फळंदेखील तितकीच पसंत केली जातात.
banana split sundae
banana split sundaesakal
Summary

भारतात फळांची अगदी मुबलकता असते. प्रत्येक मोसमात निरनिराळ्या फळांनी बाजार अगदी सजलेला असतो. परंतु काही बारमाही फळंदेखील तितकीच पसंत केली जातात.

भारतात फळांची अगदी मुबलकता असते. प्रत्येक मोसमात निरनिराळ्या फळांनी बाजार अगदी सजलेला असतो. परंतु काही बारमाही फळंदेखील तितकीच पसंत केली जातात. 

बारमाही फळांमध्ये केळी हे सर्वांत आवडतं फळ आहे. केवळ भारतात नव्हे, तर केळी जिथं पिकत नाहीत, तिथं जास्त लोकप्रिय आहेत. ती इतकी पसंत केली जातात, की केळ्यांच्या चवीचे असंख्य पदार्थ तयार केले जातात. भारतात जास्तकरून केळी मधल्यावेळचा खाऊ म्हणून खाल्ली जातात- त्याशिवाय भरली के, शिकरण, फार फार तर पिकलेल्या केळ्यांची पुरी इतके मोजके पदार्थ तयार केले जातात. परंतु, युरोप अमेरिकेत जिथे केळी पिकत नाहीत, तिथं मात्र केळ्यांना म्हणजे खास एझॉटिक फ्रुट म्हणून मोठा मान आहे. केळ आणि कॅरॅमल सॉस वापरून केलेला बॅनोफे पाय आणि बनाना ब्रेड प्रसिद्ध आहेत. सोबत बनाना फ्लेवर्ड पदार्थदेखील लोक अतिशय पसंत करतात.

एक काळ असा होता, की जेव्हा आशिया आणि आफ्रिका खंडाव्यतिरिक्त इतर कुठं या फळाविषयी कोणाला ठाऊक नव्हतं. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी प्रथम हे फळ युरोपमध्ये नेलं. सुरुवातीची अनेक वर्षं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केळ्यांची लागवड करण्याचा प्रयत्न केला. परंतु उष्णकटिबंधीय वातावरणातील हे फळ तिथं रुजेना. 

पूर्वी युरोपमध्ये साखरेची तोंडओळखदेखील नव्हती- त्यावेळेस गोड फळं, सुकवलेली फळं, मध आणि झाडांचा गोड चीक यावरच त्यांची गुजराण होत असे. केळ पिकल्यावर अगदी मिट्ट गोड होतं- त्यामुळे तेथील लोकांना केळ अतिशय आवडलं असावं. त्यामुळे त्यापासून नवनवे पदार्थ तयार करून पाहू लागले असावेत.

आशिया खंडातून युरोप अमेरिकेत केळी नेण्याकरता तर प्रचंड यंत्रणा उभी केली गेली. अमेरिकेचा उभारणीचा काळ होता आणि त्याच वेळेस वाढत्या लोकसंख्येचं पोटभरीच अन्न उपलब्ध करून द्यावं या उद्देशानं केळी अमेरिकेत उपलब्ध करण्यात आली. खास अमेरिकन शैलीत त्याचं जोरदार मार्केटिंग केलं गेलं. केळ्याचं महत्त्व पटवण्यासाठी शाळांत, बाजारांत, वर्तमानपत्रांत माहिती प्रसारित केली. केळी अमेरिकेपर्यंत पोचवण्यासाठी जहाजात कोल्ड स्टोअरेज आणि बदरांवर शीतगृहं अशी यंत्रणा उभी करून त्यातून वाहतूक करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीनं इंग्रजांची समुद्रात त्यांची अन्नधान्याची जहाजं थांबवून कोंडी केली- त्यावेळेस इंग्रजांनी प्रथम केळी आयात करण्यावर बंदी घातली. त्याकाळातलं साहित्य वाचलं असता याचा उल्लेख वारंवार येतो. आज मुबलक साखर उपलब्ध असते, तशी युरोपियन जनतेकरता मात्र साखर आणि गोड पदार्थ ही एक चैनीची गोष्ट होती. साखरेवर खर्च करण्याऐवजी केळ वापरून गोड पदार्थ तयार करण्याकडे त्यांचा कल अधिक होता. त्यातच युद्ध छेडल्यामुळे अनेक वर्षं साखर आणि केळी मिळणे दुरापास्त होऊन बसलं. आणि भारतातून आयात होणाऱ्या या दोन्ही पदार्थांशिवाय त्यांचे सण त्यांना गोड वाटेनात. पुढे युद्ध संपून जनजीवन पूर्ववत झाल्यावर पुन्हा एकदा साखर आणि केळी मुबलक मिळू लागली आणि त्यानंतर हे दोन्ही पदार्थ वापरून अनेक प्रसिद्ध गोड पदार्थांचा जन्म झाला. अमेरिकन लोकांचा आवडता पदार्थ म्हणजे बनाना स्प्लिट. केळ्याचे उभे काप करून त्यांची होडी तयार करायची आणि त्यावर आईस्क्रीमचे अनेक स्कूप ठेवून वरून कॅरॅमल सॉसनं ते सजवायचे. अपल्याकरता तिरामीसु खाताना जो स्वर्गीय भाव असतो, अगदी तोच भाव ठेवून अमेरिकन लोक बनाना स्प्लिट खातात. आपल्या भारतात मुबलक प्रमाणात मिळणारं हे फळ विदेशात लोकप्रियतेच्या शिखरावर आहे हे वाचून तुम्हाला निश्चित आनंद होईल. चला तर आज या निमित्तानं ख्रिसमसच्या पूर्वसंध्येकरता बनाना स्प्लिट कसे तयार करायचे हे पाहू.

‘बनाना स्प्लिट संडे’

साहित्य - १०० ग्रॅम चॉकलेट, दोन केळी, ३ ते ५ फ्लेवर्सची आईस्क्रीम्स, कॅरॅमल सॉस, स्ट्रॉबेरी सॉस, सजावटीसाठी चॉकलेट गोळ्या, लहानसा झेंडा इत्यादी

कृती -

  • प्रथम चॉकलेट वितळवून घ्या.

  • केळी उभी कापून घ्या.

  • चॉकलेटमध्ये केळी बुडवून फ्रिजमध्ये गार करायला ठेवा.

  • चॉकलेट कव्हर्ड केळी बोटीच्या आकारात एका लांब सर्व्हिंग डिशमध्ये ठेवा आणि त्याच्या मधोमध आईस्क्रीम स्कूप ठेवा.

  • वरून चॉकलेट, स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट सॉसनं सजावट करा.

  • त्यावर चॉकलेट, गोळ्यांची सजावट करून एक लहान झेंडा बोटीवर लावतो त्याप्रमाणे लावून सर्व्ह करा.

हा पदार्थ पार्टीमध्ये सगळ्यानी एकत्र खायचा पदार्थ असल्यानं यात आईस्क्रीमचा मोठा टॉवर करूनदेखील सर्व्ह केला जातो. सजावटीसाठी चॉकलेट कव्हर्ड मुसलीचादेखील वापर करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com