ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : बर्गर... बस नाम ही काफी है! | Veg Burger | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Veg Burger
ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : बर्गर... बस नाम ही काफी है!

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : बर्गर... बस नाम ही काफी है!

sakal_logo
By
मधुरा पेठे

बर्गर म्हणजे समस्त तरुणाईचा आवडता पदार्थ. कुरकुरीत पॅटी, मऊ ब्रेड, चविष्ट मेयोनीज सॉस, चीज स्लाईस आणि हिरवेगार कुरकुरीत आईस सॅलड यांचे एकमेकांवर लेअर करून तयार केलेला पदार्थ. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाला साधारण बर्गर तयार झाला असावा. भारतात आपण ‘बर्गर’ म्हणत असलो, तरी ‘हॅमबर्गर’ हे त्याचे नाव अधिक प्रसिद्ध आहे. औद्योगिकीकरणामुळे वेगाने बदलत असलेल्या समाजाच्या गरजांतून जे बरेच मोठे बदल घडले, त्यातील एक महत्त्वाचे उत्पादन होते ते म्हणजे हॅमबर्गर. कामगारवर्ग आणि मध्यमवर्गाच्या उदयामुळे घराबाहेर खाऊ शकणाऱ्या परवडणाऱ्या अन्नाची मागणी होती आणि बर्गर हे त्याकरता अगदी योग्य उत्तर होते.

हॅमबर्गरच्या उत्पत्तीबद्दल काही विवाद आहेत. जर्मनीमधील हॅमबर्ग आणि अमेरिकेतील काही ठिकाणे या दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हॅमबर्गर तयार होत असत. त्याकाळातील बर्गर म्हणजे ब्रेड आणि त्यामध्ये ग्रील केलेले मांस इतपतच असे. कालांतराने त्यात पिकल्स, चीज, सॅलड, सॉस असे निरनिराळे जिन्नस आले आणि त्याचा आधुनिक बर्गरकडे प्रवास सुरू झाला. आज एकट्या बर्गरमध्ये हजारो प्रकार मिळतात. प्रत्येक देशात तेथील स्थानिक जिन्नस आणि मसाले वापरून तरतऱ्हेच्या चवीचे बर्गर तयार केले जातात. बहुतांशी भारतीय जनता शाकाहारी असल्याकारणाने भारतात व्हेज बर्गरचे असंख्य प्रकार आहेत. आजकाल विदेशात प्लांट बेस्ड डाएट, व्हेजिटेरीयन, व्हेगन चळवळ वाढल्याने व्हेज बर्गर भलताच ट्रेंडमध्ये आहे. जागतिकीकरणाचा उत्तम नमुना म्हणजे बर्गरसारख्या पदार्थांची जगभरातील लोकप्रियता.

अमेरिकेतील हॅमबर्गरच्या विवादित शोधाच्या आधी, युरोपियन खाद्यसंस्कृतीमध्ये तत्सम पदार्थ आधीपासूनच अस्तित्वात होते. प्राचीन रोमन पाककृतींचा संग्रह एपिसियस कूकबुकमध्ये बर्गरसदृश पदार्थाचा तपशील आढळतो. साधारण चौथ्या शतकाच्या सुरूवातीस तयार होणारे ‘इसिसिया ओमेंटाटा’ हे हॅमबर्गरचे सर्वांत जुने रूप असू शकते.

बर्गरचा जन्म अशा काळात झाला जेव्हा लोकांना ‘जलद’ आणि ‘स्वस्त’ पदार्थांची गरज होती. अन्न संरक्षणाच्या क्षेत्रातील तांत्रिक प्रगती, कृषी उत्पादन आणि वाहतुकीतील सुधारणांमुळे हॅमबर्गरच्या निर्मितीपासूनच शहरी रहिवाशांचा हा सोईस्कर आणि आवडता पदार्थ झाला. आणि त्यातूनच बर्गर चेन जॉइन्ट्स अमेरिकेत सर्वत्र उघडली गेली. विसाव्या शतकात सरासरी अमेरिकन जे त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीही रेस्टॉरंटमध्ये जेवले नव्हते, त्यांच्याकरता शहरांमध्ये दिसणारे फास्ट फूड जॉइन्ट्स हे रेस्टॉरंटचे पर्यायी स्वरूप झाले.

आज भारतातदेखील बर्गरकरता मोठे मार्केट तयार झाले आहे. लहान मुले आणि तरुणांचा आवडता पार्टी मेन्यू म्हणजे बर्गर, फ्राईज, कोल्ड्रिंक. अनेक प्रयोग करत भारतीय चवीचे नवीन बर्गर तयार झाले आहेत. आशियामध्ये जसे बर्गर ब्रेडच्या जागी राइस बन किंवा स्टीम बन आले, तसे भारतात ब्रेडऐवजी नान किंवा डोसा बनसारखे प्रयोग यशस्वीरीत्या होत आहेत. मुळात स्वस्त आणि मस्त अशा पदार्थांची कायम चलती असते. त्यामुळे पुढे कित्येक वर्षे या पदार्थाची जादू जनमानसावर कायम राहणार.

आज भारतीयांना आवडेल अशा सोप्या व्हेज बर्गरची रेसिपी देते.

व्हेज बर्गर

साहित्य :

चार बटाटे, एक कप मिक्स भाजी (गाजर, मटार, फ्रेंच बीन्स), एक कांदा, पाच मिरच्या, दोन टीस्पून आलं-लसूण पेस्ट, एक चमचा तिखट, अर्धा टीस्पून एमएसजी, एक टीस्पून काळी मिरी पावडर, अर्धा टीस्पून पांढरी मिरी पावडर, मूठभर कोथिंबीर, मीठ, चार स्लाईस ब्रेड, पाव वाटी कॉर्नफ्लोअर, एक कप ब्रेडचा चुरा, अर्धा कप मैदा. बर्गरकरता बर्गर बन्स, बटर सॅलड आणि कांदा.

कृती :

  • बटाटे उकडून थंड झाल्यावर हाताने कुस्करून घ्या. त्यात मिरची पावडर, हिरवी मिरची बारीक चिरून, मीठ, एमएसजी (सोडियम ग्लुटामेट), काळी आणि पांढरी मिरी पावडर टाकून मिक्स करून घ्या.

  • पॅनमध्ये थोड्या तेलावर कांदा आणि बारीक कापलेल्या मिक्स भाज्या वाफवून घ्या. त्यात बटाट्याचे मिश्रण टाकून त्यातील ओलसरपणा जाईपर्यंत परतून घ्या.

  • मिश्रण एका ताटात घेऊन थंड करून घ्या. थंड झाल्यावर त्यात कोथिंबीर आणि ब्रेड टाकून नीट मिक्स करा.

  • आता यातील एक डाव मिश्रण हातात घेऊन त्याची पॅटी तयार करा. अशा साधारणपणे दहा पॅटी तयार करा.

  • नंतर कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी घेऊन स्लरी तयार करा.

  • प्रत्येक पॅटी स्लरीमध्ये आणि एकदा ब्रेडच्या चुऱ्यात बुडवून तयार करून घ्या. थोड्या तेलावर पॅनमध्ये खरपूस फ्राय करा.

  • बर्गर तयार करण्यासाठी बर्गर बन्समध्ये थोडं बटर लावून भाजून घ्या. बनवर पॅटी, कांदा, सॅलड, मेयोनीज लावून बर्गर फ्रेंच फ्राईज आणि थंडगार सरबतासोबत सर्व्ह करा.

loading image
go to top