ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : रसरशीत, नेत्रसुखद मॉकटेल्स

हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थांसोबत किणकिणत्या ग्लासमध्ये मोहक कॉकटेल्स, मॉकटेल्स मिळतात. हॉटेलमधील मंद प्रकाशात ही पेये अधिकच उठून दिसतात.
Mocktails
MocktailsSakal

हॉटेलमध्ये चमचमीत पदार्थांसोबत किणकिणत्या ग्लासमध्ये मोहक कॉकटेल्स, मॉकटेल्स मिळतात. हॉटेलमधील मंद प्रकाशात ही पेये अधिकच उठून दिसतात. प्रत्येक पेयाची चव निराळी, रंग निराळा, गंध निराळा असतो.  

या पेयांत सर्वांत आवडते पेय म्हणजे ‘पिनाकोलाडा’. हे पेय लहान मुलांपासून सगळ्यांना अतिशय आवडते. अननस, शहाळ्याचे पाणी आणि शहाळ्याची मलई एकत्र करून तयार केलेले हे थंडगार पेय म्हणजे एखादे स्वर्गीय पेय वाटते. आजकाल व्हॅनिला आईस्क्रीमसुद्धा टाकले जाते; परंतु कोकोनट क्रीमपासून तयार केलेले सर्वांत उत्तम लागते. असेच सर्वांचे आवडते पेय म्हणजे ‘आईस टी’. भारतीय म्हणजे गरम चहा हे इतके घट्ट समीकरण आहे; परंतु आता त्यासोबत विदेशातून उशिरा आलेला हा आईस टीसुद्धा प्रचंड लोकप्रिय आहे. गरम पाण्यात चहा पावडर किंवा टी बॅग टाकून दहा मिनिटे ठेवतात, नंतर गाळून त्याला थंड करतात, ताज्या लिंबाचा रस आणि भरपूर बर्फ टाकून सर्व्ह करतात. आईस टी तयार करताना चहा उकळला, तर चहाचा कडवटपणा त्यात उतरतो. 

‘मोहितो’ ज्याचे इंग्रजी स्पेलिंग खरे तर बुचकळ्यात पाडणार आहे. त्याचे स्पेलिंग होते Mojito, परंतु उच्चारण होते ‘मोहितो’. पुदिना, लिंबाच्या फोडी साखर एकत्र हलके कुटून त्यात वरून सोडा किंवा लेमन कोल्ड्रिंक टाकले जाते, सोबत भरपूर बर्फाचे तुकडे. ऑक्टोबर हिटमध्ये या इतके थंडावा देणारे पेय नव्हे. याचसोबत ‘सनराईज’ नावाचे संत्री, मोसंबी आणि डाळिंबाच्या रसाचा सिरप घालून अतिशय देखणे मॉकटेल तयार होते. त्यात सूर्योदयाच्या रंगछटा दिसतात, म्हणून त्याचे नाव सनराईज. तसेच ‘ब्ल्यू लगून’ नावाचे पेय असते- ज्याचा रंग निळसर हिरवा असतो. लगून म्हणजे समुद्राचे पाणी किनाऱ्यावर थोडे आत येते. तिथे आसपास थोडी झुडपे तयार झालेली असतात, त्यामुळे लगूनचे पाणी निळेशार न दिसता हलका हिरवा रंग असल्याचे वाटते. कॅरिबियन पंच नावाच्या पेयाचा रंग निळाशार अगदी नीलमसारखा असतो. यात ‘ब्ल्यू कयुरॉसॉ’ म्हणजे निळ्या रंगाचे लिंबाचे सिरप टाकले जाते, तर मूळ रेसिपीमध्ये एक खास ऑरेंज त्या भागात मिळते. त्याची लिकर त्यात टाकली जाते. या पेयात बरेचदा लाल चुटूक चेरी सजावटीकरता टाकतात, त्यामुळे हे पेय अतिशय सुंदर दिसते.

‘कॉकटेल्स’ म्हणजे ज्यात मादक द्रव्य टाकले आहे असे पेय आणि ‘मॉकटेल्स’ म्हणजे मादक द्रव्याशिवाय तयार केलेले पेय- ज्यात चवीचे साधर्म्य साधण्यासाठी निरनिराळ्या सायट्रस फ्रूटसचा वापर केला जातो- ज्यामुळे या पेयांची चव द्विगुणित होते. मॉकटेल्सना ‘सोबर ड्रिंक्स’ असेही म्हटले जाते. सोबर म्हणजे गुणी, साधी आणि आणि खरेच या सोबर ड्रिंक्समध्ये ताज्या फळांचा रस वापरल्याने चव आणि गुणांच्या दृष्टीने सरस असतात. घरी ही सोबर ड्रिंक्स तयार करणे अतिशय सोपे आहे, फक्त त्यातील माप नीट लक्षात घ्यायचे. ही ड्रिंक्स तयार करण्याच्या काही पद्धती आहेत, जसे की, एकावर एक ओतणे- जेणेकरून त्याची रंगसंगती छान साधता येईल. (जसे की, सनराईज किंवा सनसेट मॉकटेल्स), काही ड्रिंक्स मिक्सर किंवा मिक्सिंग जारमध्ये तयार केली जातात, यात बरेचदा तीन फ्लेवर्स ब्लेंड केले जातात जसे पिनाकोलाडा किंवा मार्टिनी, स्लश ड्रिंक्स. काही ड्रिंक्समध्ये काही पदार्थ एकमेकांमध्ये मिक्स करून वरून सोडा टाकला जातो- ज्याने दोन चवी आणि रंग मिळतात. एकूणच सोबर ड्रिंक तयार करणे म्हणजे कला आहे, तुम्ही जितके प्रयोग कराल तितकी नवीन पेये तयार करू शकाल. मोसमी फळे, काही विशिष्ट पदार्थ यांचा मेळ घालून अतिशय चविष्ट पेये तयार करता येतात. आपल्याकडे सरबते आवडीने प्यायली जातात. मोसमात आंबा, लिंबू, आवळा, कोकम इत्यादी फळांची सरबते उन्हाळा सुसह्य करतात. त्याचसोबत चमचमीत पदार्थांचा स्वाद वाढवायचा असेल, तर त्याला परफेक्ट मॅच होणार एखादे पेय पाहिजे. भारतीय जेवणासोबत लिंबू, संत्री, पुदिना, चहा असलेली पेये अतिशय छान लागतात. आज चमचमीत टिक्का किंवा तंदूर पदार्थांसोबत परफेक्ट मॅच होणाऱ्या मॉकटेलची रेसिपी देते.

कॅप्टन मॉर्गन पंच

साहित्य : अर्धा कप पायनॅपल ज्यूस, पाव कप मँगो ज्यूस, १ टीस्पून आल्याचा ज्यूस, १ टेबलस्पून लिंबाचा रस, २ टेबलस्पून साखर, १५ ते १७ पुदिन्याची पाने, अर्धा कप लिम्का, १२ ते १५ बर्फाचे तुकडे, उंच ग्लास, सर्व्ह करण्यासाठी

कृती :

  • मिक्सरमध्ये पायनॅपल, मँगो ज्यूस, आले, लिंबू रस, साखर, पुदिना आणि बर्फाचे तुकडे एकत्र घेऊन फिरवावे.

  • पुदिना बारीक झाला, की लगेच ग्लासमध्ये भरून त्यावर लिम्का ओतावे आणि सर्व्ह करावे.

  • कॅरेबियन समुद्रातील पायरेट हेन्री मॉर्गन याच्या नावावरून या मॉकटेलला हे नाव पडले आहे. हे मॉकटेल जहाजावरील शेवाळ आलेल्या पाण्यासारख दिसते; पण चव मात्र कॅरेबियन आयलँडच्या सफरीवर घेऊन जाईल अशी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com