ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : कुरकुरीत, चविष्ट पापड

भारतीय जेवण पापडाशिवाय अपूर्ण आहे. तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड जेवणाला रंगत आणतो.
ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : कुरकुरीत, चविष्ट पापड

भारतीय जेवण पापडाशिवाय अपूर्ण आहे. तळलेला किंवा भाजलेला कुरकुरीत पापड जेवणाला रंगत आणतो. सणाच्या दिवशी तळलेल्या पापडाचे विशेष महत्त्व, त्या दिवशी तळलेल्या पदार्थात पापड हवाच. त्यातून भारतीय पापडाचे प्रकारदेखील किती. उडीद, मुगाचे, नाचणी, ज्वारी पापड, तांदळाच्या फेण्या, गव्हाची कुरडई, साबुदाण्याच्या चिकवड्या, बटाटा पोह्याचे पापड आणि पोह्याची मिरगुंडे, खिच्चे हे निव्वळ महाराष्ट्रातील पापडाचे प्रकार.

भारतात इतर राज्यांत तेथील खास पापड आहेतच. दक्षिणी पापडम, सिंधी मुगाचे पापड, भरपूर मिरी घातलेले खास अमृतसरी तिखट उडीद पापड, उत्तरेतील राज्यात बटाटे जास्त तयार होतात म्हणून बटाट्याच्या पापडाचे अनेक प्रकार, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश तर पापड आणि त्याच्या निरनिराळ्या पदार्थांकरता ओळखले जातात. राजस्थानमधील पापडाची भाजी प्रसिद्ध, तर गुजरातमधील ‘पापड चुरा’ हा भाजीसोबत तोंडीलावणे म्हणून सर्वांत आवडता पदार्थ. पापडावरील भारतीयांचे प्रेम हे आगळेवेगळे आहे. जेवणात लज्जत वाढवणारा हा हलकाफुलका पदार्थ नाश्त्यातदेखील चपखल बसतो बरंका. पोहे, उपमा, गोडा शिऱ्यासोबत पोह्याचा भाजलेला पापड हवाच. तसेच हॉटेलमध्ये भलामोठा मसाला पापडदेखील लहानथोरांचा आवडता पदार्थ.

केवळ भारतीय उपखंडातच पापड खाल्ले जातात, असे समजू नका बरे. सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, कोरिया, हॉंगकॉंग, चीन, मेक्सिको, नॉर्वे या देशांतही पापड आवडीने खाल्ले जातात आणि हे पापड भारतीय पापडापेक्षा थोडे निराळे असतात. आशियामध्ये तयार होणाऱ्या पापडांत चवीकरता मासे टाकले जातात. त्याला ‘फिश क्रॅकर’ म्हणतात. मेक्सिकोमध्ये ‘ड्युरिटोज’ म्हणजेच एक प्रकारचे पापड अतिशय आवडीने खाल्ले जातात. आपल्या मसाला पापडासारखे त्यावर साल्सा म्हणजे कांदा, टोमॅटो, कोथिंबिरीचे सॅलड त्यावर टाकले जाते. आपण शेव पेरतो, तसे अनेक प्रकारे हे डोरितोज सजवले जातात. पण शेवटी ते पापडच, त्यावर काहीही टाका, छानच लागणार! माझ्या सिंगापूरच्या ट्रिपमध्ये मी ‘फिश क्रॅकर’ पहिल्यांदा खाल्ले आणि खरेच अगदी प्रेमात पडले. आपल्या तांदळाच्या फेण्या लागतात- अगदी तशीच चव; परंतु त्यात निरनिराळ्या माशांची चव- उदाहरणार्थ, कोलंबी, बांगडा इत्यादी.

पापडामधील एक वेगळाच पदार्थ मी थायलंडमध्ये खाल्ला. एका बाजारात एक आजोबा तांदळाचे पापड तळून त्यावर चॉकलेट, कॅरॅमल सॉस टाकून विकत होते. त्यातील कच्चे पापड न शिजवलेल्या तांदळाचे असावेत असे दिसत होते आणि तेलात टाकल्याक्षणी फुलून मोठे होत होते. चॉकलेट किंवा कॅरॅमल सॉससोबत ते पापड अतिशय छान लागत होते.

आजकाल लहान मुलांचे सर्वांत आवडते स्नॅक्स म्हणजे निरनिराळे तळलेले कुरकुरीत पदार्थ. हेदेखील पापडाचेच भाऊ. मानसशास्त्राचे प्राध्यापक चार्ल्स स्पेन्स यांच्या संशोधनानुसार, आवाज करणारे पदार्थ ताजेपणाशी संबंधित आहेत. आवाज करणारे पदार्थ खाताना माणसाला अवचेतन मनात सुरक्षेची भावना जागृत होते आणि आनंदाची अनुभूती होते म्हणून कुरकुरीत पदार्थाकडे माणसांची ओढ असते.कारणे काही असोत; परंतु पापडासारखा कुरकुरीत चविष्ट पदार्थ भारतीयांना अतिशय आवडतो. विदेशातदेखील पापड प्रसिद्ध आहे.

पापडाची भाजी

साहित्य : ४ उडीद पापड, १ मोठा कांदा, १ मोठा टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, मीठ. १ टीस्पून तिखट, १ टीस्पून आले किसून, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून गरम मसाला, २ टेबलस्पून दही, २ टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून कसुरी मेथी

कृती :

  • प्रथम कांदा आणि टोमॅटोची वेगवेगळी प्युरी करून घ्यावी.

  • तेलावर मोहरी, हिंग टाकून त्यावर कांदा प्युरी टाकावी.

  • कांदा परतून झाल्यावर त्यात धने पावडर, तिखट, हळद, आले, हिरवी मिरची, मीठ टाकून परतून घ्यावे.

  • त्यात टोमॅटो प्युरी टाकून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यात दही फेटून घालावे आणि परतून घ्यावे.

  • पापड हलके भाजून घ्यावेत आणि त्याचे तुकडे करून मसाल्यात टाकावेत.

  • वरून आवश्यकता असल्यास थोडे पाणी टाकून पापड शिजू द्यावेत.

  • वरून कसुरी मेथी चुरून टाकावी. आवडत असल्यास चमचाभर तूप घालावे आणि गरम बाजरीच्या रोटल्यासोबत (भाकरी) सर्व्ह करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com