ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : केकची ‘गोड’ गोष्ट

डिसेंबर महिना आला, की सगळ्यांना केक, कुकीज तयार करायचे वेध लागतात. या महिन्यात साधारणपणे खाण्यापिण्याची चंगळ असते.
Plum Cake
Plum CakeSakal

डिसेंबर महिना आला, की सगळ्यांना केक, कुकीज तयार करायचे वेध लागतात. या महिन्यात साधारणपणे खाण्यापिण्याची चंगळ असते. वर्ष संपत आलेलं असतं आणि वर्षाची सांगता अशी छान छान पदार्थ खाऊन करावी असं कोणाला नाही वाटणार? त्यातच ख्रिसमस जवळ आल्यानं केक, कुकीज असे बेक केलेले पदार्थ शिकणं, करून बघणं हे गृहिणींचं आवडतं काम. आपण दिवाळीची जोरदार तयारी करतो, अगदी तशीच तयारी या काळात ख्रिस्ती समाजात सुरू असते. ख्रिसमसकरता खास प्लम केक तयार केला जातो- ज्यात भरपूर सुकामेवा आणि काही मसाले वापरलेले असतात. याकरता रममध्ये मुरवलेला सुका मेवा लागतो. हा मुरवलेला सुकामेवा अनेक दिवस आधी तयार तयार करून ठेवला जातो आणि याला ‘फ्रूट मिक्सिंग’ असं म्हटलं जातं. हा एक सोहळा असतो- ज्यात मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र येऊन सुकामेवा, साखर, मसाले, रम एकत्र काचेच्या बरणीत भारतात. 

महिना-दोन महिने सुकामेवा जेव्हा रम, साखर आणि मसाल्यात मुरतो तेव्हा त्याची चव द्विगुणित होते. फ्रूट मिक्सिंग बऱ्याच घरांत ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केलं जातं; परंतु ते नाहीच जमलं तर डिसेंबरच्या सुरुवातीलादेखील करतात. 

ख्रिसमस केक हा इंग्लिश परंपरेचा भाग आहे. इंग्रजांनी भारतावर दीर्घकाळ राज्य केल्यानं भारतातदेखील केक, कुकीजसारख्या बेक केलेल्या पदार्थांची आवड भारतीय लोकांना लागली. त्यातून खास ख्रिसमसला तयार होणारा प्लम केक तर सर्वांत आवडता. सुकामेवा, खास मसाले बटर आणि कॅरॅमलयाच्या एकत्रित चवीमुळे हा केक भारतीयांनादेखील अतिशय आवडतो.

बऱ्याच देशात ख्रिसमस केक महिनाभर आधी तयार करून ठेवला जातो. तयार झालेला केक उलटा ठेवून त्यात दर आठवड्यास रम लावली जाते. याला ‘फीडिंग द केक’ असं म्हटलं जातं. यामुळे केकची चव छान लागतेच- सोबत केक दीर्घकाळ टिकतो. ख्रिसमस मेजवानीच्या आधी केक रॉयल आयसिंगनं सजवला जातो.

युरोपमध्ये पूर्वी साखर अतिशय महाग असल्याकारणानं साखर वापरून तयार केलेले पदार्थ हे शाही पदार्थात गणले जात असत. श्रीमंत लोक त्यांच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी मेजवानीमध्ये त्यांचे केक साखरेच्या घट्ट पाकानं सजवत असत. पिठीसाखर, एग व्हाईट आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करून रॉयल आयसिंग तयार केलं जातं. केकवर हे लावल्यानंतर थोड्याच वेळात घट्ट होतं आणि केक बर्फाच्छादित असल्याप्रमाणे दिसतो- यामुळे या शुगर सॉसचं नाव ‘आयसिंग’ असं पडलं आणि पुढे तेच नाव रुढ झालं.

गंमत म्हणजे प्लम केकमध्ये प्लम नसून मुख्यतः काळे पिवळे मनुके घातले जातात. परंतु इंग्लंडमध्ये पूर्वी मनुके, काळे मनुके, इत्यादी गोड सुक्या फळांना ‘प्लम’ असं म्हटलं जाई- त्यामुळे या केकचं नाव ‘प्लम केक’ असं पडलं. ब्रिटिश राजवटीत प्लम केक जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला आणि त्यानं प्रत्येक ठिकाणी त्या प्रदेशानुसार स्वतःचं रूपडं थोडाफार बदललं. प्रत्येक देश, प्रदेश आणि कुटुंबात याची वेगळी आवृत्ती तयार झाली. काही ठिकाणी रम, तर काही ठिकाणी ब्रँडी, शेरीमध्ये सुकामेवा मुरवला गेला, काही ठिकाणी तयार केकला रम ‘फीड’ केली जात होती, तर काही ठिकाणी अल्कोहोल अजिबात वापरली जात नाही. आजकालच्या सजावटीवर भर दिलेल्या कोणत्याही केकपेक्षा कोणतंही आयसिंग न केलेला प्लम केक हा सर्वांत छान लागतो. त्यातले मसाले, कॅरॅमल सॉस, सुक्यामेव्यानं प्लम केकच्या चवीपुढे इतर सर्व केक फिके वाटतात. चला तर मग प्लम केक कसा तयार करायचा ते पाहूयात.

प्लम केक

साहित्य : दीड कप मैदा (दोनशे ग्रॅम कप साइज), १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १ टेबलस्पून बेकिंग पावडर, पाव टीस्पून बेकिंग सोडा, एक अष्टमांश टीस्पून मीठ, पाऊण कप साखर, ३ अंडी, पाऊण कप बटर, पाव कप तेल, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स.

मसाला : दालचिनी २ इंच, ५ ते ६ लवंगा, ४ ते ५ मिरी, सुंठ पावडर २ टीस्पून भरून (हे सर्व खलबत्यात कुटून घ्या), दीड कप रम किंवा ऑरेंज ज्यूस, सुंठ पावडरमध्ये मुरवलेले मिक्स ड्रायफ्रूटस (बदाम, काजू, काळ्या मनुका, बेदाणे, क्रॅनबेरीज, चारोळी), अर्धा कप बारीक चिरलेला खजूर, २ टेबलस्पून कॅरॅमल सॉस.

कृती :

  • मिक्सिंग बाऊलमध्ये बटर, साखर, तेल क्रिमी होईपर्यंत मिक्स करा.

  • त्यात ३ अंड्याचा फक्त बलक टाका आणि मिश्रण मिक्स करा.

  • अंड्याचा पांढरा भाग निराळा फेसून घ्या. (अंडी वेगवेगळी बीट केली, की केक खूप हलका होतो.)

  • अंड्याचा पांढरा फेसलेला भाग बटरच्या मिश्रणात घालून मिक्स करून घ्या.

  • आता मुरवलेल्या ड्रायफ्रूट घेऊन ते गाळणीवर गाळून घ्या. त्यातील अर्धा कप लिक्विड केक या मिश्रणात टाका.

  • नीट मिक्स करून घ्या.

  • मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मसाला पावडर मीठ एकत्र किमान २ वेळा चाळून घ्या.

  • आता मैद्याचे मिक्स वरील केकच्या मिश्रणात ३ भागांत टाका आणि हळूहळू मिक्स करा.

  • व्हॅनिला इसेन्स टाका, मिक्स करा.

  • केक टिनमध्ये केकचे मिश्रण टाकून ५ मिनिटे तसेच ठेवून द्या. नंतर ओव्हनमध्ये मधल्या रॅकवर १८० डिग्रीवर ४५ ते ५० मिनिटे भाजून घ्या.

  • केक तयार झाल्यावर ओव्हनच्या बाहेर काढून रात्रभर झाकून ठेवा. हा केक आठवडाभरानंतर मुरल्यावर जास्त छान लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com