सौंदर्यखणी : तेलंगणातील ‘नारायणपेठ’

हैदराबादजवळ असलेलं हे गाव तेलंगण आणि कर्नाटकच्या सीमेजवळ आहे आणि इथं विणल्या जाणाऱ्या साडीला ‘नारायणपेठ साडी’ असं नाव मिळालं.
सौंदर्यखणी : तेलंगणातील ‘नारायणपेठ’
सौंदर्यखणी : तेलंगणातील ‘नारायणपेठ’ sakal

नावावरून ‘नारायणपेठ’ साडी मूळची पुण्याची असावी असं वाटतं; पण ही साडी मूळची तेलंगणा राज्यातील ‘नारायणपेठ’ जिल्ह्यातील ‘नारायणपेठ’ गावची. हैदराबादजवळ असलेलं हे गाव तेलंगण आणि कर्नाटकच्या सीमेजवळ आहे आणि इथं विणल्या जाणाऱ्या साडीला ‘नारायणपेठ साडी’ असं नाव मिळालं. मूळच्या तेलंगणमध्ये विणल्या जाणाऱ्या या साडीला ‘महाराष्ट्र कनेक्शन’सुद्धा आहे.

सन १६७७ मध्ये मोठा लवाजमा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेकडे निघाले होते, वाटेत त्यांचा ‘नारायणपेठ’ गावी मुक्काम होता. त्यांच्या ताफ्यात महाराष्ट्रातील काही विणकरसुद्धा होते, परतीच्या प्रवासात त्यातील काही विणकर तिथंच राहिले आणि ते आपली कला तिथं फुलवून उपजीविका करू लागले. त्यांनी तिथल्या स्थानिक लोकांनाही आपल्या सोबत घेतलं आणि त्यातून तिथं वस्त्रोद्योग उदयाला आला. त्यांच्या पारंपरिक विणकामातून कॉटन आणि सिल्कच्या पारंपरिक साड्या तयार होऊ लागल्या आणि त्या गावाच्या नावावरून ही साडी ‘नारायणपेठ साडी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे या साडीच्या विणकामावर महाराष्ट्राचा मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. अलीकडच्या काळात कॉटनमध्येसुद्धा नारायणपेठ साडी बनू लागली आहे; पण ‘कॉटन नारायणपेठ’ साडी ‘सिल्क नारायणपेठ’ साडीपेक्षा खूप वेगळी असते.

आज आपण ‘सिल्क नारायणपेठ साडी’ची ओळख करून घेणार आहोत. हातमागावर विणली जाणारी ‘नारायणपेठ साडी’ सुरुवातीला नऊ वारात विणली जात असे; परंतु आता सहा वारांमध्ये नारायणपेठीचं विणकाम मोठ्या प्रमाणात होत आहे. मलबेरी सिल्कचा २ प्लायचा धागा वापरून विणलेल्या या साडीचा काठ-पदर ठराविक ढाच्याचा असतो. काठावर असलेली टेम्पल बॉर्डरची ‘जरी किनार’ आणि ‘रुई-फुल मोटिफ’ ही नारायणपेठ साडीची ओळख आहे. ‘रुई-फुलं’ म्हणजे कापसाच्या फुलांची छोटी प्रतीकात्मक फुलं. ही फुलं साडीच्या काठांवर फार सुंदर दिसतात. पूर्वीच्या पारंपरिक पट्ट्यांच्या ‘गंडेरी’ पदरासारखे, नारायणपेठीच्या पदरावर जरीचे पट्टे असून त्याला ‘तेणी’ पदर असंही म्हणतात. अलीकडच्या काळात पारंपरिक ‘तेणी’ पदरावर वैविध्य आणण्यासाठी विणकर, कोयऱ्या किंवा ‘चक्री-मंडळ’सुद्धा विणत आहेत. पूर्वी प्लेन ‘नारायणपेठ’ साड्या विणल्या जात असत; परंतु ग्राहकांना नवीन प्रकार देता यावा म्हणून साडीवर ‘कुडी-फुलांची’ सुंदर बुट्टीही विणली जात आहे.

काँट्रास्ट काठ-पदर असलेली ही साडी अनेक सुंदर रंगसंगतींत विणली जाते. मूळचे महाराष्ट्रातील असलेले विणकर जे खूप वर्षांपूर्वी नारायणपेठ इथं स्थायिक झाले, त्यांच्या पुढच्या पिढ्या आजही तिथं साड्या विणत आहेत. नारायणपेठ इथं राहणारे घनश्याम सरोदे भारतीय साड्यांचे अभ्यासक असून, ते नामशेष झालेल्या किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या विणींना पुन्हा तंतोतंत तसं विणकाम करून पुनरुज्जीवन देत आहेत. सरोदे म्हणाले, ‘‘नारायणपेठ साडीचा पदर ‘टोप तेणी’ प्रकारात मोडतो. आता त्यात, काळानुरूप थोडेफार बदल झाले आहेत. कॉटन नारायणपेठ साडीत तर, मी खूप प्रयोग केले आहेत. नारायणपेठ साडीची परंपरा टिकून ठेवण्यासाठी मी ग्राहकांपर्यंत ओरिजिनल नारायणपेठ साडी पोचवत आहे.’’

या साडीचं विणकाम घट्ट असल्यामुळे या साड्या पिढ्यान्‌पिढ्या टिकतात. अशाच एका ५१ वर्षांपूर्वीच्या नारायणपेठ साडीला पुण्याच्या आर्टिस्ट पद्मजा भिडे-लाखे नव्या रंगरूपात आणत आहेत. त्या ५१ वर्षांपूर्वीच्या सुंदर चिंतामणी निळ्या रंगाच्या प्युअर सिल्क नारायणपेठ साडीत खऱ्या चांदीची जर आहे. या ‘चांदीच्या जरी’चं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आर्टिस्ट पद्मजा, या साडीवर वर्षानुवर्षं चांदीचे दागिने घडवणाऱ्या आणि स्वतः परिधान करणाऱ्या आदिवासी स्त्रियांची चित्रं काढणार आहेत. घसघशीत वजनाच्या दागिन्यांवर केलेलं बारीक कोरीवकाम पद्मजाताई त्या नारायणपेठ साडीवर उतरवणार आहेत. तेव्हाच्या आंध्रप्रदेशात विणलेल्या या साडीवर आदिवासी कलेची गुंफण घातली जाणार आहे. विविधतेने नटलेल्या भारतात जेव्हा दोन कलांचा संगम होतो तेव्हा एक तिसरीच अप्रतिम कलाकृती तयार होते. नुकताच एक ‘नारायणपेठ साडी’चा शेलाही बघण्यात आला. तीन पिढ्या जतन करून ठेवलेल्या सुंदर गोल्डन पिवळ्या प्लेन नारायणपेठ साडीचा ‘पणजी, आजी आणि आईची’ आठवण म्हणून ‘पणती’ला तिच्या लग्नात वापरण्यासाठी शेला केला आहे आणि त्यावर कशिद्यानं ‘कुडी-फुलं’ भरली आहेत. काळाच्या ओघात नारायणपेठ साडीचा वापर कमी झाला असला, तरी अशा काही प्रयोगांमुळे या साडीवर पुन्हा प्रकाश टाकला जात आहे.

त्रिवेणी संगम

मोठी स्वप्नं बघणारी आणि ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणारी राधिका हर्षे-विद्यासागर लहानपणापासूनच खूप महत्त्वाकांक्षी आणि स्वप्नाळू होती. राधिकाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या या अभिनयाची चुणूक शाळेत ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धेतच दिसली होती. मग तिनं नाट्यशिबिरं, एकांकिका करत कॉलेजमध्ये थेट ‘पुरुषोत्तम’मध्ये अभिनयाची पारितोषिकं मिळवली. राधिकानं ‘डबल ग्रॅज्युएशन’ आणि नंतर ‘मास्टर्स इन कम्युनिकेशन’ करून अभिनयाची आवडही जोपासली. या आवडीतूनच तिला मालिका, चित्रपट मिळत गेले आणि तिची ‘पॅशन आणि पेशा’ एकच झालं.

तिची अजून एक ‘पॅशन’ आहे, तिला देशभरातल्या वेगवेगळ्या ‘विव्ह्ज’च्या साड्यांचा संग्रह करायला खूप आवडतो. राधिका म्हणाली, ‘‘मला उपजतच साड्यांची समज आणि उमज आहे. मला साडी पाहिल्यावर तिचा प्रकार पटकन समजतो. माझ्यासारख्याच, साड्यांची जाण असणाऱ्या माझ्या काही मैत्रिणी आहेत, आम्ही ‘साडी’ या विषयावर कितीही तास बोलू शकतो. शिवाय माझं एक स्वप्न आहे, देशभरात वेगवेगळ्या प्रांतात फिरून तिथल्या खासियत असलेल्या ‘विव्ह्ज’च्या साड्या घ्यायच्या!’’

राधिकाने तिच्या लग्नातल्या साड्या घेतानासुद्धा, वेगवेगळ्या प्रकारांचा, पोतांचा आणि रंगांचा खूप विचार करून घेतल्या होत्या. त्या प्रकारांमध्ये ‘नारायणपेठ साडी’ हा प्रकार मात्र राहिला होता. राधिकाला ‘नारायणपेठ साडी’चे काठ जाम आवडतात म्हणून राधिकानं लग्नानंतरच्या तिच्या पहिल्या संक्रांतीच्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमासाठी प्युअर सिल्कची एक लाल काठपदराची सुंदर काळी ‘नारायणपेठ साडी’ घेतली. त्यावर तिच्या सासूबाईंनी मोठ्या हौशीनं त्यांच्या मैत्रिणीकडून- अगरवाल काकूंकडून लाल-काळ्या रंगात कर्नाटकी कशिद्यात मोर भरून घेतले. त्यानंतरच्या येणाऱ्या हळदी-कुंकवांना आणि तिच्या मुलीच्या बोरन्हाण्याला राधिका ही साडी आवर्जून नेसली होती. राधिकाला ही साडी इतकी आवडते, की तिच्या एका मालिकेतील, एका ‘मराठमोळ्या लूक’साठी काही सीन्समध्ये तिनं ‘प्रॉडक्शन’ची साडी न नेसता ही साडी नेसून शूट केलं. ‘आंध्र प्रदेशा’त विणली गेलेली- त्यावर काढलेला ‘कर्नाटकी’ शैलीतला कशिदा आणि अशी साडी नेसून राधिकानं साधलेला ‘महाराष्ट्रीय लूक’ म्हणजे तीन राज्यांचा ‘त्रिवेणी संगम’ असं गंमतीनं नक्कीच म्हणता येईल.

राधिकानं पंचवीस वर्षांपासून ही साडीसुद्धा खूप जतन करून ठेवली आहे. साडीवर कशिदा काढून देणाऱ्या अगरवाल काकू आता नाहीत; पण त्यांनी केलेली ‘कलाकुसर’, ‘सासूबाईंची हौस’ आणि लग्नानंतरच्या ‘लग्नाळू आठवणी’सुद्धा राधिकानं साडीबरोबर वर्षानुवर्षं जतन करून ठेवल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com