
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्यतृतीया येते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. नरनारायण या देवतांनी या दिवशी अवतार घेतला असे समजले जाते.
घरकुल अपुले : चैतन्याचा ‘अक्षय’ स्रोत
- मीनल ठिपसे
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्यतृतीया येते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. नरनारायण या देवतांनी या दिवशी अवतार घेतला असे समजले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कार्याचे फळ अक्षय्य (न संपणारे) असे मिळते. या दिवशी आपण ज्या गोष्टी दान करतो, त्या अक्षय्य म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्यालाच मिळतात म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पाणी दान करण्याचादेखील प्रघात आहे. मातीच्या घागरीत वाळा घालून सुगंधित केलेले थंड पाणी दान केल्यास ते पितरांना मिळते, अशी समजूत आहे.
पुराणकथेनुसार या दिवशी महाभारताचे युद्ध संपून महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करण्यास प्रारंभ केला व लिखाणाचे कार्य श्रीगणेशाने केले, असे नमूद आहे.
या दिवसाबाबत अनेक पौराणिक कथा सांगण्यात येतात. एका आख्यायिकेनुसार याच दिवशी सुदामा आपल्या बालमित्राला- श्रीकृष्णाला भेटावयास त्याच्या घरी गेला. सुदामा त्याच्या परिस्थितीनुसार भेट म्हणून मुठभर पोहे घेऊन गेला होता. श्रीकृष्णाचे ऐश्वर्य पाहून त्याला त्याची भेट देण्यास संकोच वाटला... भगवान श्रीकृष्णाने दिव्यदृष्टी आणि असीम मित्रप्रेमामुळे सुदाम्याच्या मनातील घालमेल ओळखली आणि हट्ट करून ते पोहे खाल्ले. घरी परत येताच श्रीकृष्णाच्या किमयेने सुदाम्याची परिस्थिती बदलली होती. तेव्हापासून सुख आणि समृद्धीचा वर्षाव करणारा दिवस अक्षय्यतृतीया या नावाने साजरा केला जाऊ लागला.
या दिवशी सत्ययुग संपून त्रेतायुग सुरू झाले असे मानले जाते. यासाठीदेखील या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
मागच्या वर्षीपासून आमची कन्याही पूजा करू लागली. एक वर्ष भातुकलीमध्ये केले होते सर्व! मागच्या वर्षीपासून रागरंगच वेगळा. मोठी पूजा आणि छोटी पूजा तिनेच केली. छान अंघोळ करून भल्या पहाटे लेकरू तय्यार! स्वयंपाकात जमेल ती सगळी मदत. मग पूजेची तयारी. छान टोपलीत आंबे मांडले. भाजी आणि फळे कोरून ठेवली आम्ही. साग्रसंगीत पूजा, पुन्हा सगळा नैवेद्य वाढायला मदत.
हा दिवस माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे, अशी मान्यता आहे. या दिवशी अन्नपूर्णादेवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख आणि समृद्धी नांदते. मग काय!!... सगळे अगदी शिस्तीत करतो आम्ही. आमरस, पुरी, बटाटा भाजी, तळण, वरणभात, मसालेभात, कैरीची डाळ, पन्हे असा थाट असतो.
‘सणवार’ चैतन्य घेऊन येतात. घराची स्वच्छता साफसफाई केली जाते. धूपदीप प्रज्वलनाने आसमंत सुगंधित आणि पवित्र होतो. आयुष्यात सकारात्मकतेची किती गरज आहे याची जाणीव होते. ऋतुमानानुसार स्वयंपाक होतो आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ही संस्कारांची शिदोरी पुढच्या पिढीकडे नकळत जात राहते. सणवारांनिमित्ताने एकमेकांकडे येणे-जाणे होते. नातीगोती जपली जातात. म्हणूनच स्तोम माजवू नका; पण श्रद्धा ठेवा. आयुष्यातल्या या अनमोल ठेव्याची जपणूक करा.
Web Title: Minal Thipase Writes Akshay Tritiya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..