घरकुल अपुले : स्वयंपाकघराचं नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kitchen house management
घरकुल अपुले : स्वयंपाकघराचं नियोजन

घरकुल अपुले : स्वयंपाकघराचं नियोजन

- मीनल ठिपसे

कुठलीही गोष्ट शिकताना, समजून घेताना ती का, कशासाठी, कशी या काही मूलभूत प्रश्नांची उकल होणं गरजेचं असतं. साधंसं उदाहरण घ्या- रंगभूमी! रंगभूमीवर फक्त अभिनय येऊन चालत नाही. त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या अनेक गोष्टी जाणून घ्याव्या लागतात, आत्मसात कराव्या लागतात..जसं की नेपथ्य, प्रकाशयोजना, कॉस्चुम्स, संहिता या आणि अशा अनेक गोष्टी जेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला समजायला लागतात, तेव्हा तो अभिनय फुलून प्रेक्षकांपर्यंत जाऊ शकतो. यासाठी कुठलीही गोष्ट समजून घेण्यासाठी त्याचा गाभा जाणून घेणं गरजेचं असतं.

घर म्हटलं, की डोळ्यांसमोर चार भिंती, घराला घरपण देणारी माणसं, त्यांचं भावविश्व, नातीगोती, सणसमारंभ, देवघर, माजघर, फुलापानांनी बहरलेली बाग अगदी सगळं येतं; पण घर या संकल्पनेचा गाभा म्हणजे स्वयंपाकघर! मग यात स्वयंपाक आला, त्याचं नियोजन आलं, पोषणमूल्यांचा विचार आला, स्वयंपाकघर कसं ठेवावं आलं, वेगवेगवेगळे मसाले, डाळी, कडधान्य, पदार्थांची सजावट, मेनू प्लॅनिंग आणि रोजचे डबेही आले.

मला अजून आठवतंय, मला तो अख्खा स्वयंपाक करता यायचा नाही; पण त्यासाठी क्रोकरी वगैरे मांडून छान टेबल सेट करायला खूप आवडायचं... नंतर तर हे समजलं, की मानसशास्त्रानुसार नव्वद टक्के जेवण आपण डोळ्यांनीच करतो. मग तर या गोष्टी आणखीनच आवडू लागल्या. जुन्या लोकांचं सोवळ्यातील स्वयंपाकामागचं शास्त्र कळलं आणि मनापासून पटलंखील. पूर्वीही फूड स्टायलिंगची पद्धत होतीच की. छान चौरंग, पाटावरच्या पंगती.. चांदीची ताटं...भोवती फुलापानांची रांगोळी... मसालेभातावर मस्त ताजा खोवलेला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर.

कुणाला अद्ययावत यंत्रं वगैरे असलेलं किचन आवडतं... कुणाचं अगदी लहान; पण शिस्तीत आणि नीटनेटकं असलेलं. कुणाला सगळ्या काचेच्या वस्तू आवडतात, तर कुणाचा जीव अजून त्या पाट्या-वरवंट्यात. स्वयंपाकघर नियोजन हा खूप मोठा विषय. आपलं आरोग्य नीट ठेवायचं असेल, तर उत्तम आणि ताजं अन्न खाल्लं गेलं पाहिजे. साधारण आठवड्याभराचं मेनू प्लॅनिंग तयार असेल, तर त्याप्रमाणे सर्व सामान आहे की नाही हे लक्षात ठेवणं सोपं जातं. काहींच्याकडे रोजच्या रोज ताज्या भाज्या, फळं आणली जातात.. तसं जमणार नसेल, तर आठवड्याच्या भाज्या नीट निवडून स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवणं सोयीस्कर!

स्वयंपाकघरातील नियोजनासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

  • स्वयंपाकघरातील कपाटं तीन महिन्यांतून एकदा तरी स्वच्छ आवरावीत. याचं कारण यात अनेक खाद्यपदार्थ असतात- जे लवकर खराब होऊ शकतात.

  • प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा. मसाले वगैरेसाठी काचेच्या बरण्या, लोणच्यांसाठी चिनी मातीच्या बरण्या, वाळवणाच्या पदार्थांसाठी स्टीलचे डबे यांचा वापर करावा.

  • मसाल्याचा डबा अतिशय स्वच्छ आणि नीट भरून ठेवावा. साधारण दोन डबे असावेत. एकात रोजच्या स्वयंपाकात फोडणीसाठी लागणारी मोहरी, जिरे, तिखट, गोडा मसाला, कोरडी लाल मिरची, दुसऱ्या डब्यात मेथी दाणा, तीळ, ओवा, धने पूड, जिरे पूड असावी. हिंगाची डबी, आमसुलाची बरणी, किसलेल्या गुळाचा डबा वेगळा असावा. मिठाची वेगळी बरणी असावी.

  • पार्टीसाठी लागणारे ग्लास आणि क्रोकरी वेगळी ठेवावी. वेगळ्या बॉक्स किंवा पिशवीत जास्तीचे चमचे, काटे चमचे, डिस्पोजेबल डिश, ग्लास, टिशू पेपर, टूथपिक ठेवावेत.

  • फ्रीज जेवढा स्वच्छ आणि व्यवस्थित आवरलेला असेल, तेवढा स्वयंपाक करायला सोपा. चिंचेची चटणी, निवडून ठेवलेली कोथिंबीर, सोललेला लसूण, आल्याची पेस्ट, कढीपत्ता या गोष्टी फ्रीजमध्ये नेहमी असाव्यात. भाजलेले दाणे, दाण्याचे कूट, भाजलेला रवा, खोवलेलं खोबरं, फ्रोझन मटार, एखादा आयत्या वेळेस बनवता येईल असा फ्रोझन स्नॅकचा प्रकार या गोष्टी फ्रीझरमध्ये अवश्य असाव्यात.

  • प्रत्येक कुटुंबाला साधारण किती वाणसामान लागेल याचा अंदाजच असतो. कारण प्रत्येक घराच्या खाण्याच्या पद्धती वेगळ्या. येणारे-जाणारे, कमी-जास्त! नाष्ट्याचे पदार्थ, जेवणाचे पदार्थ, सणवार आणि गोडाचे पदार्थ, वर्षभरासाठी लागणारे पदार्थ, सरबतं, सॉस, कोरड्या चटण्या, खाऊसाठी कोरडे पदार्थ, ड्रायफ्रूटस,अख्खे मसाले असं वर्गीकरण करून त्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची नीट यादी असावी व त्याला अनुसरून वाणसामानाची यादी!

  • दुग्धजन्य पदार्थांची वेगळी काळजी घेतली गेली पाहिजे. रोजचं रोज दही लावावं. साय साठवणं आणि नंतर ताजं लोणी आणि तूप आणि त्याची नीट साठवण.

  • वेगवेगळ्या भांड्यांची नीट काळजी घ्यावी लागते. पितळी भांडी- ज्यात स्वयंपाक केला जाईल किंवा ज्यात आंबट पदार्थ ठेवले जातात त्यांना कल्हई करणं आवश्यक. नॉनस्टिक भांडी, स्पंजनं हलकेच घासावीत- नाहीतर त्यावर चरे जाण्याची शक्यता असते. चांदीची भांडी ‘रुपेरी’नं स्वच्छ करून, नीट पुसून मलमलच्या कपड्यात ठेवावीत. भांडी धुतल्यावर जाळीत किंवा कॉटनच्या कपड्यावर एखादा चमचा ठेवून त्यावर पालथी घालावीत म्हणजे त्यांना आतून डाग पडत नाहीत.

  • जागा असल्यास घरातच कडीपत्ता, गवती चहा, खायची विड्याची पानं, मायक्रोग्रीन्स, रोझमेरी, तुळस ही झाडे अवश्य लावावीत. फूड गार्निशिंगलाही त्याचा उपयोग होतो.

  • किचन ओटा आठवड्यातून एकदातरी स्वच्छ घासावा. ओट्यावर लिंबाचे डाग पडले असतील, तर त्यावर आल्याचा तुकडा घासावा.

वाचन, अनुभव आणि पारंपरिक प्रथा यामधून जास्तीत जास्त वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करून जीवनशैली अनुसरली पाहिजे. स्वयंपाकघर हा घराचा गाभा आहे आणि स्वयंपाक ही निगुतीनं करण्याची कला! जशी नाती जपावी लागतात तशी ही कलाही शिकावी लागते.

Web Title: Minal Thipase Writes Kitchen House Management

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :kitchenWomens Corner
go to top