
आषाढी एकादशी... पांडुरंगाच्या भेटीसाठी कोसच्या कोस पावसापाण्यात भिजत जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या दिंडीचा मनोरम सोहळा...
घरकुल अपुले : मनोरम सोहळा
- मीनल ठिपसे
आषाढी एकादशी... पांडुरंगाच्या भेटीसाठी कोसच्या कोस पावसापाण्यात भिजत जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या दिंडीचा मनोरम सोहळा... सर्व भेद दूर सारत भक्ती प्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणारा सोहळा. परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारे वारकरी!
पुराणांमध्ये सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे मोठे महत्त्व आहे. संपूर्ण वर्षात २४ एकादशी येतात. यामध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूसह देवी एकादशीची मनोभावे पूजा करते ती पापमुक्त होते आणि त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होते.
मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. आषाढ महिन्यात येणाऱ्या कर्क संक्रातीचे उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन चालू होते, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. म्हणून आषाढी एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हणतात.
तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने आकर्षित करण्याची क्षमता असते...म्हणून विठ्ठलचरणी तुळस वाहून मूर्तीतील चैतन्याचा लाभ होतो. आषाढीच्या या दिवशी आळंदीतून संत ज्ञानेश्वर महाराजांची, देहूमधून संत तुकाराम महाराजांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, शेगावमधून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी; तसेच उत्तर भारतातून संत कबीर यांची पालखी पंढरपुरी येते.
आषाढी एकादशी दिवशी सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. पंढरपूर सर्व भक्तांचे असे स्थान आहे, की जिथे अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. वैकुंठभूमीच्या आधीपासून पंढरपूर अस्तित्वात आले असावे, असाही समज प्रचलित आहे. वारीत भाग घेऊन भगवंत चरणीलीन होऊन मीपणा, अहंकार या गोष्टी कमी होतात व परमेश्वर चराचरात आहे, ही भावना बळावते.
पूर्वीच्या काळी अनेक व्यक्ती एकमेकांची भेट घेऊन आपले अनुभव, कथा, रचना, अभंग अथवा भजने यांची देवाणघेवाण करीत असत. तीच परंपरा आजदेखील या निमित्ताने सुरू राहिली आहे.
या व्रताची एक पौराणिक कथा अशी आहे, की एकेकाळी भगवान शंकराने प्रसन्न होऊन मृदुमान्य राक्षसाला इतर कुणाकडूनही मरण न येता केवळ एका स्त्रीच्या हातून मरण येईल असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य राक्षस भयंकर उन्मत्त झाला आणि अतिविश्वास बाळगून अनेक देवांवर स्वारी करू लागला. अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धाव घेतली; पण स्वतः शंकरही काही करू शकत नव्हते. यावेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली व तिने राक्षसाला ठार केले. या मंगलमयी दिवशी तुफान पाऊस पडला. सोनपावलांनी आलेल्या या देवीचे नाव होते एकादशी! या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा कायमस्वरूपी प्रघात आहे.
बरेच घरी तर ‘एकादशी दुप्पट खाशी’ असा सुंदर फराळ बनवला जातो. आम्ही नेहमीप्रमाणे सडारांगोळी, सोवळ्यात फराळ तयार करणे, यथासांग पूजा, छान अभंग ऐकणे आणि सुग्रास फराळाचा आनंद घेणे अशी साजरी करतो एकादशी.
Web Title: Minal Thipase Writes Manoram Sohala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..