घरकुल अपुले : पावसाळा आणि खादाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rainy Foods

पावसाळा म्हटलं, की चारोळ्या सुचतात, गाणी आठवतात, जुन्या आठवणी नकळत रेंगाळतात; पण आमच्यासारख्या ‘खाण्यासाठी जगणाऱ्या’ लोकांना आधी आठवते ती खास पावसाळ्यातील खादाडी.

घरकुल अपुले : पावसाळा आणि खादाडी

- मीनल ठिपसे

हिरवाकंच शालू ल्यायलेली सृष्टी... ओल्या मातीचा सुवास... सळसळून निघालेलं चराचर... उतरत्या छपरावरून ओघळणाऱ्या सरी... छोट्याशा डबक्यात उत्साहाने कागदी होड्या सोडणारे बालचमू... एकाच छत्रीत फिरताना भावनांचा काहूर अलगद सामावून घेणारे प्रेमी जीव...कडकडणाऱ्या विजा आणि मनामनात चैतन्य निर्माण टाकणारा असा हा पावसाळा. बरोबर आठवणींचं सुखद गाठोडं घेऊनच येतो.

पावसाळा म्हटलं, की चारोळ्या सुचतात, गाणी आठवतात, जुन्या आठवणी नकळत रेंगाळतात; पण आमच्यासारख्या ‘खाण्यासाठी जगणाऱ्या’ लोकांना आधी आठवते ती खास पावसाळ्यातील खादाडी. सिंहगडावरील जोराचा वारा, दूर नजर जाईल तिथवर दिसणारी विहंगम दृश्यं आणि खास पावसाळ्यात तिथं जाऊन पिठलं-भाकरी, वांग्याचं भरीत, मटक्यातलं दही आणि कांदा भजी... अहा! नुसत्या विचारांनीसुद्धा सपाटून भूक लागते. कुरकुरीत खमंग भजी, त्याबरोबर सपासप चिरलेला कांदा आणि तेल, तिखट... कमाल जमून येतं गणित. बरं, तशी भजी घरी करायचा प्रयत्न केलात तर नाही जमत.

कटिंग चहा हा तर एक वेगळाच विषय. हलकेच पावसाचे थेंब अंगावर घेत प्यायला जाणाऱ्या टपरीवरच्या त्या चहाची अलगच अशी दुनिया असते. भरपूर ठेचलेलं आलं आणि किंचित वेलदोड्याची चव बेमालूमपणे मिसळून त्या पाणी आणि दुधाच्या मिश्रणाला एक खास ‘लय’ येते!...आता इथे ‘लय’ कुठून आली?... ज्यांना खायला आवडतं आणि मनापासून आवडलेल्या खादाडीला दाद देता येते, त्यांच्या शब्दकोशात ‘लय’, ‘फक्कड’, ‘झकास’, ‘काहीच्या काही भारी’, आणि सोफिस्टिकेटेड भाषेत ‘डिलिशियस’, ‘वॉव’ वगैरे आपोआप येतात. काहींना अशीच पावसाळी हवा आणि वाफाळती फेसाळलेली कॉफी यांची जोडी आवडते. मित्रांच्या मैफिली जमतात, गाण्यांचे फेरे होतात आणि ‘अख्खी दुधाची बनवलेली कॉफी कर गं’ अशा प्रेमळ आर्जवरूपी विनंतीत ‘अहो’ त्यांच्या ‘सौं’ना खास साद घालतात.

माझं आजोळ गुहागर आणि कोकणात काही पदार्थ म्हणजे निव्वळ स्वर्गसुख. उन्हाळ्यातील आंबे, फणस, सांदण, लोणची, आंबा पोळी यांना अतीव महत्त्व असलं, तरी पावसात खास मऊ भात, मेतकूट, कुळथाचं पिठलं, पोह्याचा पापड आणि आंबोशीचं लोणचं... असा काय फड जमतो!

पावसाळ्यात घराघरात भजी हा प्रकार सर्रास होतो. कुठे कांदा भजी, पातळ काप करून बटाटा किंवा घोसावळ्याची भजी, कुणाकडे मिरची किंवा पनीर पकोडे....अगदी ‘शास्त्र’ असल्यासारखा पाऊस आणि भजीचं खास नातं आहे. कुणाकडे बटाटेवडे किंवा साबुदाणा वडे करतात... खरं सांगू, लिहिताना नुसत्या विचारांनीसुद्धा रसनादेवी उदिप्त होताहेत.

कुठे खास काळ्या वाटण्याची उसळ- तीही अगदी खास वाटण वगैरे करून आणि बरोबरीला गरमागरम आंबोळी असा फक्कड बेत असतो. कुणाला मटकीची उसळ आणि भाकरी खावीशी वाटते, तर कुणी कांद्याची आमटी आणि पाहिल्या वाफेचा भात याची स्वप्नं पाहू लागतो. अव्वल स्थानावर अजून एक गोष्ट म्हणजे भाजलेलं कणीस, त्यावर मीठ, मिरची पावडर. आवडत असेल, तर किंचित तूप आणि लिंबाचा रस! काय अशक्य चव असते!

मिसळ... तुफान लोकप्रिय, भन्नाट प्रकार! या विषयावर अगदी कोणत्याही ऋतूत व्याख्यान देतील असे काही लोक आहेत. अनेक चर्चांना ऊत येतो. पदार्थ साधाच; पण मिसळ आवडत नाही असे हातावर मोजण्याइतपतच. तुम्हाला पटेल असं नाही; पण आम्हाला पावसाळ्यात आईस्क्रिम खायला प्रचंड आवडतं. कुणाकडे खास सूप्स बनवतात. पचायला हलकी आणि टेस्टी. टोमॅटो सूप, स्वीटकॉर्न सूपपासून ते ब्रोकोली आणि मशरूम.

...यादी इथंच संपत नाही. तर्रीदार शेव भाजी आणि भाकरी. ग्रील केलेलं आणि भरपूर चीज घातलेलं सँडविच, स्वीटकॉर्न चॅट (बटर घालून), खमंग भाजणी वडे आणि बरोबरीला खारातली मिरची; थालीपीठ, घरचं ताजं लोणी आणि लसणीची खमंग चटणी; गरमागरम टोमॅटोचं ऑम्लेट, तर कुठे पाऊस झाला, की आधी तिखटमिठाची पुरी करायला घेतात. गरमागरम सीझलर्सही आवडीने खातात लोक. जरा अजून विचार केलात तर छोले-भटुरे, कुर्मा-पुरी, खास गोडाचे पदार्थ म्हटलं तर अख्ख्या तुपात तळलेली खास जिलेबी... आणि आपल्याकडे गणपतीत नैवेद्यासाठी केले जाणारे वाफाळते उकडीचे मोदक!

माझ्यासाठी प्रत्येक पावसाळा अनंत खाण्याच्या आठवणी घेऊन येतो, आसमंत फुलवत जातो. लपलेल्या सूर्याशी ढगांचा चाललेला लपंडाव बघण्यासारखा असतो. खाद्यभ्रमंती किंवा खाद्यसंस्कृती आणि पावसाळा हे समीकरण अजब आहे. किंबहुना सर्वांत सुंदर खाद्यानुभव पावसाळ्यात अनुभवलेले आहेत. प्रत्येकाच्या गाठीशी ही खाद्यशिदोरी कायमचीच बांधलेली आहे...राहील!

Web Title: Minal Thipase Writes Rain Foods

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rainWomens Corner'food
go to top