घरकुल अपुले : हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Skin Care

हिवाळा म्हटलं, की गुलाबी थंडी, वेगवेगळे गरमागरम खाद्यपदार्थ, नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी, आहारात जास्त उष्मांक असलेले पदार्थ याबरोबरच त्वचेची काळजी घेणे हेदेखील महत्त्वाचे असते.

घरकुल अपुले : हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

- मीनल ठिपसे

हिवाळा म्हटलं, की गुलाबी थंडी, वेगवेगळे गरमागरम खाद्यपदार्थ, नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी, आहारात जास्त उष्मांक असलेले पदार्थ याबरोबरच त्वचेची काळजी घेणे हेदेखील महत्त्वाचे असते. बरेच जण उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासंबंधी जागरूक असतात. त्वचा जास्त टॅन होऊ नये यासाठी सनस्क्रीन लावणे, भरपूर पाणी, नारळपाणी, ताक, ताज्या फळांचा रस यांचा आहारात समावेश करणे. केमिकल फ्री साबणाने चेहरा धुणे, चेहऱ्याला थंडावा देणाऱ्या फेस मास्कचा वापर वगैरे... तशीच किंबहुना थोडी जास्तच काळजी हिवाळ्यात घ्यावी लागते.

थंड हवेमुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. त्वचा कोरडी तर पडतेच; पण काळजी न घेतल्यास रुक्ष व निर्जीव वाटू लागते. साधारणपणे थंडीत आपले पाणी पिण्याचे प्रमाण बरेच कमी होते आणि तरतरी यावी म्हणून चहा किंवा कॉफी पिण्याचे प्रमाण वाढते. आपले स्किन सेल्स हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी व तजेलदार राहण्यास मदत होते. चहा-कॉफीऐवजी हळद-दुधाचे किंचित मध घालून सेवन करावे. हळद-दूध त्वचेसाठी व तब्येतीसाठीसुद्धा लाभदायक आहे.

बऱ्याचदा असा समज असतो, की सनस्क्रीनचा वापर फक्त उन्हाळ्यात करायचा असतो; पण हिवाळ्यातही त्याचा नियमित वापर हवा. तुमच्या त्वचेसाठी योग्य अशा ब्रँड आणि एसपीफ असणाऱ्या सनस्क्रीनचा वापर केल्याने अतिनील किरणांपासून त्वचेला हानी पोचणार नाही. अर्थात थंडीत अगदी कोवळी सूर्यकिरणे अंगावर नक्कीच घ्यावीत!

हिवाळ्यात स्नानासाठी किंवा चेहरा धुण्यासाठी खूप गरम पाण्याचा वापर करण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. गरम पाण्याने त्वचा कोरडी व निस्तेज होऊ शकते. हिवाळ्यात बाहेर पडताना त्वचेची काळजी घेण्यासाठी व थंड वाऱ्यापासून बचाव कारण्यासाठी कानटोपी, हातमोजे, पायमोजे, शाल यांचा वापर करावा.

शरीराच्या इतर कोणत्याही भागाच्या त्वचेच्या तुलनेत हाताच्या त्वचेवर तैलग्रंथी कमी असतात. म्हणूनच हातातून ओलावा लवकर निघून जातो. त्यामुळे हाताला वारंवार मॉइश्चराइजर लावा. तसेच पायाच्या त्वचेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पायाच्या त्वचेसाठी ग्लिसरीन आधारित क्रीम आणि पेट्रोलियम जेलीचा वापर करू शकता. अधूनमधून पायाची त्वचा एक्सफॉलिएट करावी. कोमट पाण्याने धुवून, भेगा पडू नयेत म्हणून टाचांना क्रीम लावून, मोजे घालून झोपावे.

कोरडी त्वचा असणाऱ्यांना थंडीत ओठ फुटण्याची समस्या तीव्रतेने जाणवते. त्वचा खूप कोरडी असल्यास लीप ग्लॉस किंवा मॅट लिपस्टिक वापरणे टाळावे. व्हॅसलीन किंवा लिपबामचा वापर करावा. रसरशीत ताज्या फळभाज्यांचा रस आहारात घ्यावा. घरगुती उपाय म्हणून किंचित तुपाचा हात झोपण्यापूर्वी ओठांवर फिरवावा. हिवाळ्यात केसांचीही विशेष काळजी घेणे गरजेचे असते. कोमट तेलाने केसांना मसाज, केसांसाठी खास बनवलेल्या मास्कचा वापर, आठवड्यातून एकदा केसांना हलकीशी वाफ देणे, हीटिंग उपकरणांचा कमीत कमी वापर, हिवाळ्यात ड्राय एंडपासून सुटका मिळवण्यासाठी नियमित केस ट्रिम करणे, केमिकल असणाऱ्या गोष्टींचा वापर टाळणे या गोष्टी करा. थंडीत डीप कंडिशनिंग करू शकता आणि मसाजसाठी बदामाच्या तेलाचा वापर अवश्य करावा- कारण त्यात ई व्हिटॅमिन बरेच असते.

बाजारातही कित्येक प्रकारचे मास्क, क्रीम, सिरम उपलब्ध आहेत; पण त्वचेला खोलवर पोषणतत्त्वांचा पुरवठा करण्यासाठी नैसर्गिक उपाय करण्यावर भर द्यावा. चमकदार आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी नैसर्गिक फेस पॅकची मदत घ्यावी. घरच्या घरी फेसपॅक बनवण्यासाठी हळद, मलाई, मध, दूध, दही, लिंबू, गुलाबपाणी, बेसन, काकडी, संत्री यांचा वापर करू शकता. अर्थात ज्यांची त्वचा खूपच संवेदनशील आहे, त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसारच कोणत्याही गोष्टीचा वापर करावा.