घरकुल अपुले : भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Makar Sankranti
घरकुल अपुले : भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत

घरकुल अपुले : भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत

- मीनल ठिपसे

मकरसंक्रांत हा भारतीय पौष महिन्यात येणारा शेतीसंबंधित सण. सौर कालगणनेशी संबंधित असा महत्त्वाचा भारतीय सण! या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकींना देतात. ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. महिला उखाणे घेतात, संक्रांतीचे हळदीकुंकू खूप थाटामाटात करतात. अगदी रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू करतात... खास करून काळे कपडे घालण्याची प्रथा आहे.

भोगी हा मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा सण. या वेळेस मटार, गाजरे, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते, त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या भाज्या घालून भोगीची भाजी बनवली जाते. तीळ लावून बाजरीची भाकरी... मुगाच्या डाळीची किंवा बाजरीची खिचडी... वांग्याचे भरीत... घरचे ताजे लोणी असा सगळं स्वयंपाकाचा बेत असतो! बाजरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी उष्ण गुणधर्माचे प्रकार आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो.

महाराष्ट्रात व दक्षिण भारतात खास करून रांगोळी काढून घरे सजवली जातात. सूर्यदेवतेचे आभार मानले जातात. लोक- विशेषतः मुले पतंग उडवून तीळ व गूळ यापासून बनवलेल्या पदार्थांचा आनंद घेतात. महाराष्ट्रात घरच्या घरी ‘तिळगूळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगत एकमेकांना तिळगूळ देतात. जुन्या वाईट आणि कटू गोष्टी विसरून नवीन सुरुवात करू... सगळ्यांशी प्रेमाने बोलू व मैत्री टिकवून ठेवू असा त्यामागचा अर्थ!!

संक्रांतीचा दुसरा दिवस ‘किंक्रांत’ म्हणून साजरा करतात. या दिवशी संक्रांतीदेवीने किंकरासुर नावाच्या राक्षसाला ठार करून त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. पंचांगात हा दिवस ‘करिदिन’ म्हणून दाखवलेला असतो. माघ शुद्ध सप्तमीला ‘रथसप्तमी’ म्हणतात. हा सूर्याच्या उपासनेचा दिवस. या पूजनाने समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे.

Web Title: Minal Thipse Writes Bhogi Makarsankranti And Kinkranti

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top