नो युवर डाएट : स्लिम होण्यासाठी ‘ड्युकन’! 

Diet
Diet

फ्रेंच फिजिशियन डॉ. पिअर ड्युकन यांनी २००० मध्ये आपल्या ‘ड्युकन डाएट’ या पुस्तकाद्वारे लोकांना उच्च प्रथिने व कमी कार्बोहायड्रेट्‌स असलेल्या, वजन कमी करण्याच्या आहारपद्धतीची ओळख करून दिली. त्यांचे हे पुस्तक ३२ देशांत प्रसिद्ध झाले व ड्युकन डाएट अल्पावधीतच जगभरात लोकप्रिय झाले. लीन प्रोटिन्स, ओट ब्रान, भरपूर पाणी आणि रोज कमीत कमी २० मिनिटे चालणे हे ड्युकन डाएटचे गमक आहे.

ड्युकन आहारपद्धतीचे चार टप्प्यांत विभाजन केलेले आहे. पहिले दोन टप्पे वजन कमी करण्याचे व दुसरे दोन टप्पे कमी झालेले वजन टिकवून ठेवण्याचे आहेत. प्रत्येक टप्पा हा किती दिवसांचा आहे, हे त्या त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर आणि त्याच्या वजन कमी करण्याच्या उद्दिष्टांवर अवलंबून असतो. ॲटॅक, क्रूझ, कन्सॉलिडेशन आणि स्टॅबिलायझेशन असे ते चार टप्पे असून, प्रत्येक टप्प्यात आहाराची खास पद्धत सांगितली आहे.

टप्पे पुढीलप्रमाणे
१) आहारात भरपूर प्रथिने खाण्यावर भर दिला जातो. प्रथिनांबरोबर दररोज १.५ टेबलस्पून ओट ब्रान खाण्याची मुभा असते. यात शरीराचा चयापचय दर वाढतो व आहारात अगदी कमी उष्मांक असल्यामुळे वजन जलद गतीने कमी होते. डॉ. ड्युकन म्हणतात की, पहिल्या आठवड्यात दोन ते तीन किलो वजन कमी झाल्यामुळे मनुष्यस्वभावानुसार डाएट करणाऱ्या व्यक्तीचा हुरूप वाढतो व दुसरा टप्पा तो अधिक गांभीर्याने करतो. 
२) प्रथिनांसोबत २ टेबलस्पून ओट ब्रान व स्टार्च नसलेल्या भाज्यांचा आहारात समावेश केला जातो.
३) प्रथिनांसोबत भाज्या, एखादे फळ, चीज व एक-दोन स्लाइस होल ग्रेन ब्रेड खाता येतो.
४) नेहमीचे जेवण घेता येते; पण त्यासोबत रोज ३ टेबलस्पून ओट ब्रान खाणे आणि आठवड्यातला एक दिवस फक्त प्रथिनयुक्त आहार घेणे आवश्‍यक आहे. चौथ्या टप्प्याला पोहोचेपर्यंत शरीरातील घेर्लीन (Gherlin) ही भुकेची हॉर्मोन्स कमी झालेली असतात व त्यामुळे कमी झालेले वजन वाढू न देता ते स्थिर ठेवणे खूप सोपे जाते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ड्युकन डाएट करून वजन कमी झाले, तरी आहारात तंतुमय पदार्थ कमी प्रमाणात असल्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन अशा पोटाच्या तक्रारी होण्याची शक्‍यता असते. अभ्यासाअंती असे दिसून आले आहे, की हा आहार पूर्णपणे शास्त्रशुद्ध नसला तरी खूपच परिणामकारक आहे. त्यामुळे हे डाएट करताना डॉक्‍टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

खिमा आणि ओट्स
ड्युकन डाएट करताना रोज ओट्स व लीन मीट खाण्याचा कंटाळा आल्यास बदल म्हणून हा पदार्थ करावा. 

साहित्य - १ कप मटण/ चिकन खिमा, १ मोठा कांदा, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, १ टीस्पून गरम मसाला, १ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टेबलस्पून ओट्स, १ टीस्पून तेल, चवीसाठी तिखट व मीठ.

कृती - कांदा बारीक चिरावा. प्रेशर कुकरमध्ये तेल घालून त्यात कांदा परतावा. कांदा लालसर झाल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ व तिखट मिसळावे. खिमा व ओट्स घालून तेल सुटेपर्यंत परतावे. जरुरीप्रमाणे पाणी घालून कुकरच्या दोन शिट्ट्या कराव्यात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com