मी मीटिंगमध्ये आहे!

रानी (राधिका) देशपांडे 
Saturday, 29 August 2020

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा प्रसंग ओढवेल,अशी कल्पनाच नव्हती.नवरा ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत बसला असला की,हमखास माझा एक टोमणा असायचा ‘काय घर वगैरे काही आहे का नाही?’सध्यातर तोही मारता येत नाही

मीटिंग मीटिंग मीटिंग. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेले. की नवऱ्याच्या मीटिंगवर मीटिंग सुरू असतात. मार्चपासून ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांचं घर म्हणजे ऑफिस आणि घरातली एक खोली म्हणजे मीटिंग रूम. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असा प्रसंग ओढवेल, अशी कल्पनाच नव्हती. नवरा ऑफिसमध्ये उशिरापर्यंत काम करत बसला असला की, हमखास माझा एक टोमणा असायचा ‘काय घर वगैरे काही आहे का नाही?’ सध्यातर तोही मारता येत नाही, कारण नवरा घरातच असतो. त्याचं असणं छान वाटतं, पण सारखं मीटिंगमध्ये असणं पचवता येत नाही. 

त्याच्याशी काही महत्त्वाचं बोलायला गेलो जसं की... ‘वरणाला फोडणी देऊ का साधं वरणच हवं आहे?’ तर त्याचं उत्तर ‘मी मीटिंगमध्ये आहे!’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

हल्ली मी त्याला ईमेल करायला लागले आहे. ‘जेवणावरची मीटिंग बाकी आहे. कधी करणार आहोत?’ मग ऑफिशियल होकार आला की बरं असतं. 

‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ आणि ‘मी मीटिंगमध्ये आहे’ यात फारसा फरक नाही, कारण दोन्ही वाक्यांमध्ये आपल्याला हेच सांगायचं आहे की, जरा थांब मी बोलतो तुझ्याशी पण आधी मला हे एक महत्त्वाचं काम संपवू दे. खरं तर या वाक्याचा एवढाच अर्थ होत नाही. त्याचे अनेक अर्थ तुम्ही कोण, कुठे आणि काय करता आहात यावर अवलंबून असतात. 

म्हणजे बघा, हे वाक्य कसंही वापरलेलं चालतं; कारमध्ये बसून, शॉपिंग, पूजा, शूट करताना, जेवताना, नाटक सिनेमा हॉलमध्ये, अगदी कधीही खपेल असं हे वाक्य आहे. समोरच्या माणसालाच कसंनुसं होऊन तोच सॉरी म्हणतो. 

अनेकदा आपण कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी नसतो, परंतु अत्यंत महत्त्वाच्या, लाडक्या, आवडत्या व्यक्तीबरोबर असतो. खूप जुनी मैत्रीण भेटते तेव्हा, गुरुंकडे असतो तेव्हा, बाळाशी खेळत असतो तेव्हा, एखाद्या रंजक पुस्तकाचं शेवटचं पान वाचत असतो तेव्हा. अनेकदा आपण हे वाक्य समोरच्या माणसाला टाळण्यासाठी, उगाच बोलायचा कंटाळा आला म्हणून, राग, इर्षा, अहंकार, चिडचिड, वैताग आला म्हणून वापरतो. मी मीटिंगमध्ये आहे, हे वाक्य कितपत खरं आहे हे आपणही समोरच्या व्यक्तीनं ते कसं घेतलं आहे यावर ठरवतो. मग आपल्याबद्दल अशीही वाक्यं पलीकडचा माणूस बोलतो. ‘तो खरंच मीटिंगमध्ये असेल का?’ ‘काही मीटिंग वगैरे नाही. खोटं बोलतो आहे तो.’ ‘सध्या त्याला वेळच नसतो, खूप मीटिंग सुरू असतात.’ ‘भलत्या वेळेला काय मीटिंग ठेवतात?’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

एकूण काय... या वाक्यावर आपला पूर्ण विश्वास नसतो किंवा असला तरी त्याचे अर्थ बदलत जातात. 

‘मी मीटिंगमध्ये आहे’ याचा अर्थ कसा लावायचा, सकारात्मक का नकारात्मक, हे तीन जणांवर अवलंबून असतं. समोरचा माणूस, सद्यपरिस्थिती आणि तुम्ही. मीटिंग म्हणजे भेट. भेट या शब्दामध्ये सकारात्मकता आहे. सद्यपरिस्थितीत माणूस माणसाशी भेटतो आहे, भेटून बोलतो आहे हे काय कमी आहे? अप्रत्यक्ष असो वा प्रत्यक्ष, पण भेटतो आहे आणि संबंध जोडतो आहे. काम वाढतं आहे. संवाद होतो आहे. यातच सगळं आलं नाही? 

आता माझं शूट सुरू झालं आहे आणि मी कामात व्यग्र आहे. अनेकांना भेटते आहे. गप्पा रंगत आहेत. आणि अचानक कोणाचा कॉल आल्यास मी ही सांगते, ‘मी मीटिंगमध्ये आहे, जरा वेळाने फोन करू?’ त्या क्षणी भेटलेली माणसं, झालेला संवाद, अनुभव, हे सगळे अनलॉक प्रक्रियेनंतर हवंहवंसं वाटत आहे. समोरचा माणूस हे ऐकुन खुश होतो आहे, की ही बिझी झाली आहे आणि तरीही माझा फोन दुर्लक्षित न करून हिने फोन उचलला आहे. मी कोणाला फोन लावला आणि समोरच्यानी सांगितलं, ‘मी मीटिंगमध्ये आहे,’ तर आनंदच होतो आहे कारण... तो सुखरूप आहे. तो परत कामात व्यग्र आहे. त्याचं व्यवस्थित सुरू आहे आणि त्याच्या अवतीभवती माणसं आहेत. तर हे चार शब्दांचं एक वाक्य सुखावणारं आहे, नाही का? मग त्याची मीटिंग संपली की, आपण त्याला किंवा तो आपल्याला भेटेलच. आणि आपल्याला भेटल्यावर तोही तिसऱ्या कोणाला तरी म्हणेलच, ‘मी मीटिंगमध्ये आहे.’ 

चला, माझी पण मी मीटिंग ठेवली आहे. वन ऑन वन की काय म्हणतात ना, ती. कोणाशी? गणपती बाप्पाशी. मीटिंगचा विषय मोठा आहे आणि बराच वेळ लागू शकतो. थोडक्यात काय, तेवढ्यात तुमचा फोन आला तर तुम्हाला काय उत्तर मिळेल हे कळलंच असेल तुम्हाला? ‘मी मीटिंगमध्ये आहे!’ भेटूच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One rooms in the house during work from home is the meeting room

Tags
टॉपिकस
Topic Tags: