esakal | मेमॉयर्स : आई-बाबांनी व्यक्त व्हायला शिकवलं!
sakal

बोलून बातमी शोधा

neha-mahajan

अभिनयात येईपर्यंत मी सुंदर आहे का, हा प्रश्‍न कधीच पडला नाही. उलट, मला काय करायचं, कुठं जायचं, काय व्यक्त करायचं या सवयी मला आई-बाबांनी लावल्या.

मेमॉयर्स : आई-बाबांनी व्यक्त व्हायला शिकवलं!

sakal_logo
By
नेहा महाजन

अभिनयात येईपर्यंत मी सुंदर आहे का, हा प्रश्‍न कधीच पडला नाही. उलट, मला काय करायचं, कुठं जायचं, काय व्यक्त करायचं या सवयी मला आई-बाबांनी लावल्या. त्याबद्दल मी खरोखरच ग्रेटफुल आहे. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे आहात, हे मला आई-बाबांनीच शिकविलं. माझी आई केवळ मैत्रीण, प्रेरणास्रोत नसून, आनंद अन् विचारांचा झरा आहे. तिच्याकडून असंख्य गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तिने पीएच.डी. केली असून चाकण (पुणे) येथील महाविद्यालयात इंग्रजी साहित्य विषयाची प्राध्यापिका आहे. ती आपल्या विद्यार्थ्यांना नाटक, कथा, कविता शिकवते. आम्ही सर्व जण रात्रीच्या वेळी एकत्र जेवण करायचो, त्या वेळी ती कविता आणि नाटकांबद्दल भरभरून बोलायची. आम्हीही तेवढंच समरस होऊन ते ऐकायचो. त्यामुळे अनेक कवी, नाटककार, लेखक आम्हाला शाळेत जाण्यापूर्वीच माहिती असायचे. त्यामुळंच आम्हाला कविता, कथा, नाटक आणि वाचनाची गोडी लागली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रवासात एखादा किस्सा घडला, की आई रात्री जेवणाच्या वेळी तो रंगवून सांगायची. कधी कधी अभिनय, मिमिक्रीही करायची. खरं तर माझी आई अभिनेत्रीच आहे. तिच्यामुळंच मला अभिनयाची आवड लागली असावी. तिला बागकामाचीही आवड आहे. तिचं लिखाण अनेक ठिकाणी प्रसिद्धही झालं आहे. तिच्यामुळंच मीही व्यक्त व्हायला, लिहायचा प्रयत्न करते. कलेची विद्यार्थिनी म्हणून तिच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. ती विद्यार्थ्यांशीही अगदी मैत्रिणीसारखं वागते. त्यामुळं विद्यार्थीही तिच्याशी भरभरून बोलतात, गप्पा मारतात. त्यामुळं महाविद्यालयात आनंददायी वातावरण राहतं. 

आईचं फिटनेसवरही खूप प्रेम आहे. माझ्या लहानपणी आम्ही तळेगावमध्ये राहत होतो आणि माझी आई पहिली महिला होती जिनं स्वीमिंग ड्रेस घालून पोहायला सुरुवात केली. तिच्यामुळं मी आणि आजीही पोहायला जाऊ लागलो. खरंतर तिच्यामुळंच मला पोहायची आणि जिमला जायची आवड लागली. आईनं सौंदर्याकडं मात्र फारसं लक्ष दिलं नाही. उलट, आपण काय वाचतो, काय विचार करतो, भाषेवर आपलं किती प्रेम आहे या गोष्टींकडं लक्ष दिलं. आईचं मेकअप, लिपस्टिक, कपडे कोणते असावे याकडं फारसं लक्ष नव्हतं. हीच संस्कृती आमच्या कुटुंबात रुजली. मी त्यातच वाढले. सुंदर दिसलं पाहिजे, हेच कपडे घाल, असाच मेकअप कर हे आईनं मला कधीच सांगितलं नाही. त्यामुळं अभिनयामध्ये येईपर्यंत मी सुंदर आहे का, हा प्रश्‍न मला कधीच पडला नाही. उलट, मला काय करावं, कुठं जावं, काय व्यक्त करावं याची सवय आई-बाबांनी लावली. त्याबद्दल मी खरोखरच कृतज्ञ आहे. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही कसे आहात, हे मला आई-बाबांनीच शिकविलं. त्यामुळेच मुंबईत आल्यानंतर मला कंफर्टेबल वाटतंय. 

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

loading image