esakal | सौंदर्यखणी : ‘पंख्याच्या घडीची’ प्लीटेड साडी
sakal

बोलून बातमी शोधा

सौंदर्यखणी : ‘पंख्याच्या घडीची’  प्लीटेड साडी

सौंदर्यखणी : ‘पंख्याच्या घडीची’ प्लीटेड साडी

sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

ख्रिस्तपूर्व काळात इजिप्तशियन राजे-महाराजांच्या अंगरख्यांच्या गळ्यांवर किंवा बॉर्डरवर, फॅशनचा भाग म्हणून कॉटन किंवा सिल्कच्या प्लीटेड फॅब्रिकची फ्रिल लावली जात असे आणि अशी फ्रिल अंगरख्यांवर असणं म्हणजे श्रीमंतीचं आणि समृद्धीचं लक्षण मानलं जात असे. अंगरख्याचे कारागिर ते प्लीटेड फॅब्रिक खूप निगुतीनं हाताने बनवत असत; परंतु अंगरखे धुतल्यावर मात्र ते प्लीट्स निघून जात असत. मग परत ते कारागिर वरची फ्रील काढून त्याला प्लीट्स घालत असत आणि याला खूप वेळ लागत असे. त्या काळी इजिप्त आणि ब्रिटनमध्ये गळयाभोवतीच्या ‘प्लीटेड फ्रील’ला प्रतिष्ठेचं लक्षण मानले जाई.

पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक बाजारपेठेत कल्पक वस्तूंची आवक वाढली. नायलॉन आणि पॉलीएस्टर या मानवनिर्मित धाग्यांच्या कापडावर ठराविक उष्णतेची प्रक्रिया करून कायमस्वरूपी राहणाऱ्या प्लीट्स घातल्या जाऊ लागल्या आणि प्लीटेड फॅब्रिक बनवलं जाऊ लागलं. नंतर भारतातही हे फॅब्रिक आलं आणि त्याचे स्कर्ट्‌स लोकप्रिय झाले. नंतर अलीकडच्या काळात भारतात, ‘फॅशन जगतात’ प्लीटेड फॅब्रिकचा उपयोग वेगवेगळ्या कॉस्च्युम्समध्ये कल्पकतेनं होऊ लागला. इतका कल्पकतेनं, की या प्लीटेड फॅब्रिकच्या चक्क साड्या तयार होऊ लागल्या!

हल्ली कॉस्च्युम डिझायनर्स, वेगवेगळ्या ब्लेंडेड फॅब्रिक्सवर प्लीट्सचे वेगवेगळे पॅटर्न करून ‘प्लीटेड कस्टमाज्ड साड्या’ बनवत आहेत. ब्लेंडेड सिल्क, सॅटिन-सिल्क, पॉलिएस्टर किंवा नायलॉन मिश्रित कापड, ऑरगॅन्झा, जॉर्जेट आणि टफेटा वगैरे फॅब्रिक्सवर प्लीट्स छान बसतात. प्लीटेड साडीसाठी आधी योग्य ते कापड निवडलं जातं, मग त्या कापडावर प्लीट्‌स करून घेतले जातात. पुठ्यांच्या पट्ट्यांचे मोल्ड्स वापरून हातानं किंवा मशिननं कापडाला प्लीट्‌स घातले जातात. पट्ट्यांचे मोल्ड्स वापरून हातानं प्लीट्स घालताना दोन सारख्या आकाराचे कार्डपेपर घेतले जातात आणि त्याला आपण लहानपणी घडीचा पंखा बनवायचो तशा घड्या घातल्या जातात.

त्यातील घड्या घातलेला एक कार्डपेपर टेबलवर पसरवून ठेवून त्याला मोठे चिमटे लावले जातात आणि त्यावर ज्या कापडावर प्लीट्स हव्या आहेत ते कापड ठेवलं जातं आणि परत वरून घड्या घातलेला दुसरा कार्डपेपर ठेवला जातो आणि हे हलू नये म्हणून त्यावर जड वजनं ठेवली जातात. मग ते तीन थर एकत्रितपणे घड्यांवर फोल्ड केले जातात आणि ते ‘बंडल’ मोठ्या ओव्हनमध्ये ठराविक तापमानात गरम करून घेतलं जातं. मशिनवर घातलेलं ‘प्लीट्‌स’चं ‘बंडल’सुद्धा असंच ओव्हनमध्ये तापवून घेतलं जातं. उष्णतेची प्रक्रिया होऊन त्या कापडातील धाग्यांवर प्रक्रिया होऊन ते धागे कायमस्वरूपी तसेच ‘सेट’ होतात आणि प्लीटेड फॅब्रिक तयार होतं. वैविध्यासाठी कापडावर वेगवेगळ्या पॅटर्नच्या आणि ‘रुंदी’च्या प्लीट्स घातल्या जातात. अशा साड्या तयार करताना बऱ्याचदा त्यांच्या निऱ्या प्लेन ब्लेंडेड सिल्कच्या ठेवून, कमरेपासूनचा पुढचा पदर प्लीटेड असतो. प्लीटेड साड्या जशा ड्रेप करू, त्या आकारात अंगावर तशाच राहतात. साडीला आधुनिक ‘टच’ देऊन ‘ग्लॅमरस रूप’ देणाऱ्या या ‘प्लीट्‌स’ला मोठा इतिहास नसला तरी भविष्यकाळ नक्कीच आहे!

ऊर्मिलाची ‘ट्रेंडिंग साडी’

‘कथक’ आणि ‘ओडिशी’ नृत्यात प्रावीण्य मिळवलेल्या ऊर्मिला कानेटकरनं नृत्यातच ‘एमए’ करून ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं आणि मग पुढे ‘दुनियादारी’, ‘टाईमपास’, ‘ती सध्या काय करते?’ यासारख्या अनेक चित्रपटांमधून ऊर्मिलानं अभिनयाची छाप पाडली. ऊर्मिला काम करत असलेल्या एका चित्रपटाचं आदिनाथ कोठारे दिग्दर्शक म्हणून काम पाहत होते आणि त्याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान उर्मिला आणि आदिनाथ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २०११ मध्ये ऊर्मिला, ऊर्मिला कानेटकर-कोठारे झाली. ऊर्मिलाला साड्यांची पहिल्यापासूनच आवड होती आणि लग्न झाल्यावर तर ऊर्मिला आवर्जून प्रसंगानुरूप साड्या नेसत असते आणि ती त्या साड्या अतिशय ग्रेसफुली ‘कॅरी’ करते. तिचं तिच्या आईच्या आणि सासूबाईंच्या साड्यांसोबत एक खास भावनिक नातं आहे. त्यातल्याच एका काळ्या कांजीवरम सिल्क साडीचा गाऊन शिवून, एका ‘ॲवॉर्ड फंक्शन’ला तिनं घातला होता. तिच्याकडे अतिशय सुंदर साड्यांचा संग्रह असून, ती त्याला तिचा ‘खजिना’ म्हणते.

तिची स्वतःची ‘डान्स ॲकॅडमी’ आहे. ‘लॉक-डाउन’मुळे तिचे सगळे कार्यक्रम जवळजवळ दीड वर्ष बंद होते. परंतु एप्रिलमध्ये या वर्षीचा ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा’ होता. त्या कार्यक्रमासाठी खूप वेगळा पेहराव करायचा ऊर्मिलानं ठरवलं; पण साड्यांच्या अतिशय प्रेमात असल्यामुळे ऊर्मिलानं तिच्या ड्रेस डिझायनरला समीरा दळवीला (मोरेशा), एखादी छान वेगळीच साडी डिझाईन करायला सांगितली. समीरानं ऊर्मिलाला साड्यांचे काही पर्याय सुचविले, त्यातली ही ‘प्लीटेड साडी’ ऊर्मिलाला खूपच आवडली. समीरानं आसामच्या ‘मेखला-सादोर’प्रमाणे ही प्लीटेड साडी दोन ‘पार्ट्‌स’मध्ये बनवली.

सुंदर ‘मेटॅलिक-शॅम्पेन-अँटीक-गोल्ड’ रंगाच्या आणि ‘सिल्क ब्लेंडेड’ फॅब्रिकच्या त्या साडीचा वरचा भाग मोठ्या दुपट्ट्यासारख्या आहे आणि त्या भागावर समीरानं बारीक प्लीट्स बनवून घेतल्या. खालचा स्कर्टसारखा भाग मात्र प्लेन ठेवला आहे. वरच्या प्लीटेड दुपट्ट्यासारख्या भागाची एक बाजू कंबरेभोवती गुंडाळून दुसरी बाजू साडीच्या पदरासारखी घ्यायची म्हणजे झाली साडी तयार! कंबरेभोवती गुंडाळलेल्या प्लीटेड दुपट्ट्यामुळे खालच्या स्कर्टला आपोआप साडीच्या निऱ्यांसारखा एक छान फ्लो तयार झाला. ऊर्मिलाला ती साडी प्रचंड आवडली. सोहळ्याला निघताना ती नेसून ऊर्मिला तयार झाली, तेव्हा तिचं ते रूप पाहून आदिनाथ परत एकदा तिच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्या सोहळ्यामध्येही ऊर्मिलाला साडीसाठी खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या होत्या आणि सोशल मीडियावरही ही साडी खूप ‘फ्लोट’ झाली होती. मुळातच सुंदर असणाऱ्या ऊर्मिलाचं सौंदर्य ‘मोरेशा’च्या त्या प्लीटेड साडीमुळे अधिकच खुललं हे मात्र नक्की.

मेंटेनन्स सोपा

या साड्यांचा मेंटेनन्सही सोपा असतो, या साड्यांना इस्त्री किंवा स्टार्च लागत नाही. शिवाय धुतानाही ही साडी न पिळता फक्त अलगद पाण्यात बुडवून वाळवायची असते.

loading image
go to top