esakal | ‘पॉवर’ पॉइंट : असेन मी ...नसेन मी?
sakal

बोलून बातमी शोधा

power point

‘पॉवर’ पॉइंट : असेन मी ...नसेन मी?

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

आपल्यालाच वाटत असतं आपण वेगळे आहोत, आपण विशेष आहोत, आपल्यासारखं कुणी दुसरं करूच शकत नाही; पण वास्तव आपल्या ‘वाटण्यापेक्षा’ खूप वेगळं असतं. प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. ‘माझ्याशिवाय हे शक्यच नाही,’ असं नोकरीच्या ठिकाणी ठासून म्हणणाऱ्या, या भ्रमात कायमस्वरूपी जगणाऱ्या लोकांना साष्टांग नमस्कार.

एखाद्याला आपल्या नसण्याची सल असणं वेगळं आणि एखादा आपल्यावाचून पुढे जाऊच शकत नाही, माझ्यासारखा मीच, या भ्रमात असणं वेगळं. कामाच्या ठिकाणी खूप माणसं भेटतात. एकत्र काम करतात. आपलं नाणं खणखणीत असेल, तर समोरच्याची आपल्यावरची डिपेन्डन्सीही वाढते आणि समोरच्यानं केलेल्या कौतुकात आपण रममाण व्हायची शक्यताही वाढते. हीच ती वेळ असते जेव्हा ‘आपल्यावाचून काहीही अडत नाही,’ हे शंभर वेळा स्वत:ला समजावून सांगून मेंदू भानावर ठेवावा. कारण जर समोरचा आपल्याआधी भानावर आला, तर जमिनीपासून जरा हवेत गेलेली व्यक्ती अपेक्षेपेक्षा जोरात आपटण्याची शक्यताच अधिक.

‘आपण खरंतर पर्यायच होतो,’ पण असं आधी भासवलं गेलं नाही; ही जाणीव उशिरा होणं खरंचच त्रासदायक असतं; पण ही गोष्ट सतत डोक्यात ठेवूनच प्रोफेशनल आयुष्यात उडी घेतली तर नंतरचे मानसिक ड्रामे जरा कमी होतात. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सतत स्वत:च्या कौतुकाचे सोहळे करणं काही जणांना आवडतं. समोरच्याला फायदा दिसेपर्यंत या सोहळ्याचे आयोजकही ते होतात; पण हे सगळं फार तात्पुरतं असतं हे नक्की. ‘मी कशी भारी’ हे दाखवण्याचा सोस दिसू लागला, की आपलं हसं होण्याचीच शक्यता जास्त. प्रोफेशनल आयुष्यात स्वतला भारी ठरवण्यासाठी फार ऊर फुटेस्तोवर धावण्याची गरज नसते. आपल्या कामाकडे, आपल्या असण्याकडे, आपल्या धावण्याच्या वेगाकडे एकदा बर्ड व्ह्यूनं, म्हणजे थर्ड अँगलनं बघायला लागूयात. कदाचित आपली जागा अजून नीट पारखता येईल. कदाचित आपल्या बरोबरीची माणसं आणखी सुस्पष्टपणे आपल्याला दिसतील.

‘माझ्याशिवाय पर्याय नाही’ म्हणण्यापेक्षा, आपल्यासारखे दहा लोक घडवून दाखवण्याला ताकद लागते. ‘आपल्याशिवाय अडतं,’ या विचारापेक्षा, माझ्याशिवायही सिस्टिम कशी चालू शकेल, असा विचार करणाऱ्या व्यक्ती खऱ्या अर्थानं कणखर आणि कॉन्फिडन्ट असतात. ‘मी नसेन तेव्हा यांना कळेल,’ म्हणणाऱ्यांपेक्षा, मी असताना इतरांना शिकवेन, अशा विचारांच्या व्यक्ती अधिक मोटिव्हेटेड असतात.आपल्या मागे राहिलेल्या व्यक्तींना पुढे नेताना, प्रसंगी आपली जागाही देणाऱ्या व्यक्ती, कधीच म्हणणार नाहीत की माझ्याशिवाय अडत होतं. स्पर्धात्मक वातावरण ठेवण्याच्या नादात वैयक्तिक कौतुक सोहळ्यांच्या आहारी गेला असाल तर वेळीच सावरा.

आपल्या नोकरीच्या ८ तासांच्या बाहेर एक खूप मोठं जग आहे. त्या सोळा तासात आपण खूप पर्यायांमध्ये जगत असतो. अगदी घरी जातानाचा रस्ताही अनेकदा वेगळा निवडला जातो. नात्यात एकसुरीपणा येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो. खाण्यातला तोचतोचपणा टाळत असतो. कपड्यांमध्ये पर्याय शोधत असतो, उत्तम आरोग्यासाठी अनेक पर्याय आजमावण्याचीही आपली तयारी असते. मग कामाच्याच ठिकाणी माझ्याशिवाय कुणीच नाही या विचारांत का राहावं? कुणाचं माझ्याशिवाय का अडावं? आणि अशा विचारांनी आत्मिक समाधान तरी का मिळावं? एकदा स्वत:ला हे प्रश्न विचारून बघुया. कदाचित याची अनेक उत्तरं सापडतील.

loading image
go to top